नगारखाना
कोल्हापूर शहराच्या मध्यभागी असणाऱ्या छत्रपतींच्या राजवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून छत्रपती बुवासाहेब महाराजांनी सन १८२८ ते १८३८ या दहा वर्षांच्या काळात हि भव्य इमारत बांधली.या इमारतीच्या बांधकामासाठी जोतिबाच्या डोंगरावरुन दगड आणण्यात आले होते, तर उत्तर भारतातून पाथरवट बोलावले होते. या वास्तूमध्ये नगारे वाजवले जात असत त्यामुळे “नगारखाना” या नावाने या वास्तूला ओळखले जायचे.तत्कालीन करवीर राज्यातील सर्वात उंच इमारत अशी नगारखान्याची ख्याती होती. ब्रिटिश काळातही नगारखान्यावर स्वराज्याचा भगवा ध्वज डौलाने फडकायचा, छत्रपतींच्या सार्वभौमत्वाचे ते एक प्रतीक होते.हा नगारखाना करवीर राज्याच्या अनेक बऱ्यावाईट घटनांचा साक्षीदार आहे.
छत्रपतींच्या गौरवशाली इतिहासाचा व कोल्हापूरच्या वैभवशाली संस्कृतीचा भागीदार आहे. आजही हा नगारखाना कोल्हापूरचा केवळ भौगौलिकच नव्हे तर सांस्कृतिक व राजकीय केंद्रबिंदू आहे.गेल्या काही वर्षांपासून अंबाबाई मंदिराचे प्रवेशद्वार, भवानी मंडप या नावांखाली लपलेली या वास्तूची “नगारखाना” हि खरी ओळख या ऐतिहासिक वास्तूला परत मिळवून देण्याची गरज आहे.