अजून काही

 

कोल्हापुर चप्पल हे कोल्हापूर शहराच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे.कोल्हापूरी  चपला या भारतीय व भारताबाहेरील अनेक ग्राहक वापरतात.या चप्पलांची ठळक वैशिष्टे म्हणजे त्यांचा सुबक आकार,नक्षीकाम आणि त्यांचा टिकाऊपणा.कोल्हापूरी चप्पल पूर्णत: कातड्याची असल्याने उन्हाळयात या चप्पलांना थंडपणा जाणवतो. शिवाय चालताना या चप्पलचा त्रास होत नाही.या चप्पला पूर्णपणे हाताने बनविलेल्या असतात. त्या बनविण्याचे ९० ते ९५ टक्के काम महिला कामगार करतात. चप्पल खरेदी करण्यासाठी तुम्हाला बरीच पादत्राणेची दुकाने कोल्हापूर मध्ये  सापडतील पण कोल्हापुर चप्पल लाईन छ.शिवाजी महाराज पुतळ्याशेजारी अनेक दुकाने आहेत यामुळे कोल्हापुर चप्पल जास्त प्रमाणात विकल्या जातात आणि त्या ओरिजिनल असतात.

 

नऊवारी ही महाराष्ट्राची पारंपारिक साडी. आजच्या आधुनिक काळात पाचवारी साडया वापरायला सोयीच्या असल्या तरी पण महाराष्ट्रातल्या गावांमध्ये आणि अपवादाने शहरांमधेही प्रौढ स्त्रिया नऊवारी साडयाच नेसतात. किंबहूना तरुण मुलीही मंगळागौरींना, लग्नात, मुंजीत अगदी कॉलेजच्या ‘साडी डे’ ला ही ठेवणीतली आजीची जुनी पण खास नऊवारी साडी नेसतात. अशी ही नऊवारी साडीची जादू वर्षानूवर्ष टिकून आहे. ‘नऊवारी’ चा शब्दशा अर्थ आहे नऊ-वार सलग कापड. न शिवलेले / कापलेले सलग कापड पुराण काळापासून अतिशय पवित्र मानले गेले आहे. हे कापड सुती, रेशीम असे विविध पोत आणि विविध रंगात असणारे असते. नक्षीकामाने पदर आणि काठाचे सौंदर्य अधिक उठून दिसते. राजा-महाराजांच्या जमान्यात तर सोन्या-चांदीच्या तारांनी नक्षीकाम केले जायचे.

 

कोल्हापूरी चपला बरोबर महत्वाचा असणारा एक घटक म्हणजे कोल्हापुरी फेटा.कोल्हापुरी फेटा हा सामाजिक प्रतिष्ठा म्हणून पहिला जातो.राजकीय कार्यक्रम लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमामध्ये कोल्हापुरी फेटाचा आवर्जून वापर केला जातो.कोल्हापुरी फेटा हा विविध रंगामध्ये उपलब्ध असतो. विशेषतः गुलाबी व भगव्या रंगाचा फेटा वापरण्याकडे लोकांचा कल असतो.साधारण फेट्याची लांबी हि ३.५ ते ६ मीटर असते तर रुंदी हि १ मीटर पर्यन्त असते.फेटा खरेदी साठी बिंदू चौक येथे अनेक दुकाने पाहायला मिळतील.

 

कोल्हापूर जिल्ह्या मध्ये ऊसाचे ऊत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.यामुळे कोल्हापूर जिल्यामध्ये मोठयाप्रमाणामध्ये गुळाचे उत्पादन होते .कोल्हापूर जिल्हा  हा गुळ ऊत्पादनामध्ये अग्रेसर आहे.उसाचा रस  काढून तो  रस मोठ्या काहिलींमध्ये उकळला जातो त्यानंतर तो रस थंड झाल्यानंतर साच्यामध्ये ओतला जातो. या प्रमाणे गुळाच्या ढेपा तयार होतात.ज्या ठिकाणी उसाचा रस काढून त्याचा गूळ तयार करतात त्या जागेस 'गुऱ्हाळ' असे म्हणतात.साधारण १,२,५,१० किलो मध्ये गुळाच्या ढेपा तयार करण्यात येतात,याचबरोबर ३० किलोच्या ढेपा व्यापारासाठी वापरण्यात येतात.खाद्यपदार्थास गोड चव येण्यासाठी गुळाचा वापर करतात. साखरेचा शोध लागण्यापूर्वी,पक्वान्ने बनविण्यासाठी भारतात गूळ वापरला जाई.आजही,भारतीय स्वयंपाकघरांत गूळ ही एक आवश्यक बाब आहे.सध्या मोठ्या प्रमाणामध्ये गुळाचा चहा केला जात आहे.तसेच जेवणानंतर गुळाचा एक खडा खाल्ल्यास पचनशक्ती सुधारते.गुळ खरेदीसाठी लक्ष्मीपुरी व मार्केट यार्ड येथे मोठी बाजारपेठ आहे.

 

सुवासिनीचे लेणे समजला जाणारा साज हा फक्त येथेच तयार होतो म्हणून त्याला ‘कोल्हापुरी साज’ असे नाव पडले.कोल्हापूरी साज हा खूपच प्रसिद्ध आहे.कोल्हापुरी साज हा दागिना असून तो लाखेपासून बनवला जातो. लाखेवर सोन्याचा पत्रा मढवलेला असतो.या साजाच्या सुरुवातीला चाफेकळी नंतर पाचपानाडी ( विविध औषधी वनस्पतींची पाने आणि विड्याचे पान ), बेलपान, दोडका, कारले, सूर्य, माणिक पानाडी, मत्स्य, कूकर्म, नृसिंह (अवतार), फूल, भ्रमर, चंद्र, पाचू पानाडक्ष, गंडभैरी, मोरचेल, मयूरपंख, शंख, वाघनख, नाग आणि शेवटी ताईत असे नक्षीकाम प्रत्येक पानावर केलेले असते.नक्षीकामानंतर पाने जवमण्यांमध्ये गुंफली जातात. प्रत्येक दोन पानांत एक पान गुंफले जाते. हे मणी डमरूसारखे असतात. पानाला घागऱ्यांचे घोस लावतात. ते तीन ते पाचदरम्यान असतात.शेवटी साज हिरव्या रेशमी सुतात गुंफून त्याला लाल रेशमी भरजरी गोंडा लावला जातो. घागऱ्यांकडची बाजू सोन्याच्या अखंड बारीक तारेत गुंफलेली असते.जुन्या काळात १२ पानांचा साज असायचा.या साज मध्ये मासा, कमळ, कारले, चंद्र, बेलपान, शंख, नाग, कासव, भुंगा असे अनेक प्रकार येतात.कोल्हापूरी साज खरेदीसाठी महाद्वार रोड वर गुजरी येथे मोठी बाजारपेठ आहे.

ज्या कोल्हापुरी ​झणझणीत पदार्थांची तारीफ कोल्हापूर प्रेमी,पर्यटक करतात आणि मांसाहारी कोल्हापुरी चवीला विशिष्ट ठसका मिळतो त्याचे सगळे सार आहे ते कोल्हापुरी मसाल्याच्या तिखटामध्ये.मिरची, मिरची पूड, खडा मसाला, मसालेपूड, कांदा, लसूण, कोथिंबीर व इतर महत्त्वाच्या पदार्थांचा वापर करून कोल्हापूरी चटणी बनवली जाते.मिरचीची शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या लक्ष्मीपुरी धान्य बाजार, शिवाजी मार्केट येथे मिरची खरेदी केली जाते, तसेच संकेश्वर, आजरा, चंदगडसह कर्नाटकमधूनही खास मिरची खरेदी करण्याकडेही कल आहे. ब्याडगी, जवारी, काश्मीरी ब्याडगी, प्युअर जवारी प्रकारच्या मिरचीचा वापर तिखट बनवण्यासाठी प्रामुख्याने केला जातो.चटणीला ज्यांना तिखटपणा जास्त हवा असेल ते जवारी मिरची खरेदीला प्राध्यान्य देतात. तर ब्याडगी मिरचीचा ठसका कमी असतो.तिखटासाठी लागणाऱ्या मिरची पूडसाठी जवारी आणि ब्याडगी मिरचीची एकत्र पूड वापरण्याकडेही कल आहे. लालभडक रंग दिसायला हवा आहे, पण तिखटपणा जास्त नको आहे, अशा ग्राहकांकडून काश्मीरी ब्याडगी मिरचीला पसंती दिली जाते.

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top