कोल्हापुरातील सण - उत्सव

सण हा शब्द क्षण ह्या संस्कृत शब्दापासुन तयार झाला आहे. क्षण-छण-सण अशी या शब्दाची उत्पत्ती झाली आहे. भारतातील सर्व सण आणि उत्सव पुराण कथेवर आधारित आहे. तसे पाहिले तर प्रत्येक सण हे वेगवेगळे कारणांनी साजरे करतात. भारतात फक्त एकच धर्माचे लोक नसून विविध धर्माची आणि पंथाची लोक या ठिकाणी आहे. त्यामुळे सण आणि उत्सव हे देखील विविध धर्माची आहेत.यातील काही सण पौराणिक कथेवर आधारित आहे तर काही लोकपरंपरा तर काही सण राष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा दिवस म्हणून साजरा करतात.यामध्ये प्रामुख्याने गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, परशुराम जयंती, आषाढी एकादशी, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, कृष्णजन्माष्टमी (गोकुळ अष्टमी),बेंदूर या सणांचा समावेश होतो.त्याबरोबरच गणेश चतुर्थी, रक्षाबंधन, घटस्थापना, दसरा (विजयादशमी), कोजागरी पौर्णिमा, दीपावली, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज, कार्तिकी एकादशी,दत्त जयंती, मकरसंक्रांत, दुर्गाष्टमी, महाशिवरात्र, होळी, रंगपंचमी हे देखील सण साजरे केले जातात.

शिवजयंती हा महत्वाचा सण आहे.महाराष्ट्र बरोबरच इतर राज्यातही मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो.कोल्हापुरातील शिवजयंतीची मिरवणूक हि कोल्हापूर शहरातच नव्हे तर राज्यभरात या मिरवणुकीचे नाव घेतले जाते.आजही डॉल्बीच्या धिंगाण्यात शिवजयंतीच्या मिरवणुकांना जोर चढला असला तरी १९ फेब्रुवारीला शिवाजी तरुण मंडळाच्या मिरवणुकीने पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देत झांझपथक, धनगरी ढोल, मर्दानी खेळ, आणि प्रबोधनपर फलकांची परंपरा कायम ठेवली आहे.शिवजयंतीच्या निमित्ताने प्रबोधनपर व्याख्यानमालेची परंपरा मंडळाने ठेवली आहे व ऐतिहासिक देखाव्याचा प्रतिकृती दरवर्षी उभारली जाते.

चैत्र पौर्णिमा हस्त नक्षत्रावर हा जोतिबा यात्रेतील मुख्य दिवस.पहाटे पाच ते सहा वाजता जोतिबाचा शासकीय महाअभिषेक होतो.साधारण सकाळी नाथांची महावस्त्र व अलंकारिक पूजा केली जाते.दुपारी एक ते दीड च्या दरम्यान मुख्य यात्रेचा प्रारंभ होतो.सर्व विधी झाल्यानंतर शासन काठ्यांची मिरवणूक सुरू होते.संध्याकाळी पाच वाजता नाथाची आरती होऊन नाथांची पालखी श्री यमाई देवी कडे प्रस्थान करते.सूर्यास्तानंतर हिलाल दिवटीच्या प्रकाशात नाथांची पालखी यमाई मंदिराकडे प्रस्थान करते.साधारण सात वाजेच्या सुमारास यमाई मंदिरासमोर सदरेवर नाथांची पालखी विराजमान होते.यानंतर जगदग्नी चे स्वरूप कट्यारीसोबत श्री यमाई ( रेणुका ) देवीचा विवाह सोहळा संपन्न होतो.विवाह सोहळा संपूर्ण झाल्यानंतर नाथांची पालखी परत मंदिराकडे प्रस्थान करते.प्रदक्षिणा करून नाथांची पालखी सदरेवर विराजमान होते.यानंतर डवरी हे नाथांची गायन सेवा करतात.श्री कालभैरवाच्या येथे सर्व सासनकाठी मानकर्यांना मानाचे विडे दिले जातात. यानंतर तोफेची सलामी होऊन यात्रेची सांगता होते.

श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई मुख्य उत्सवांपैकी एक उत्सव म्हणजे रथोत्सवाचा दिवस.श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेनंतर दुसर्या दिवशी रथोत्सव असतो.जोतीबा डोंगरावरील भाविक गावी जाताना आई अंबाबाई चे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात.चोपदारांच्या ललकारीनंतर देवीची उत्सवमूर्ती सनई ताशांच्या निनादात श्री पूजक रथामध्ये घेवून येतात.त्यानंतर उत्सव मुर्तीची पूजा बांधण्यात येते.पुढे महाद्वाराचा मुख्य मार्गावर रथ येतो.भाविकांनी काढलेल्या भव्य रांगोळ्या वरून रथ जातो.काही मंडळाच्या वतीने श्री महालक्ष्मी च्या मूर्ती आरास केली जाते व पारंपारिक देवीचा फुटाणे व खडीसाखरेच्या प्रसादाचे वाटप होते. आई अंबाबाई प्रदक्षिणा करून रथ महाद्वारात प्रवेश करतो.कापूरारती शंखतीर्थ व शेजारती होऊन रथाची सांगता होते.

महाराष्ट्र भूमीचं जे वैभव आज टिकून आहे ते छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने.छत्रपती घराण्याच्या करवीर शाखेचा मुकुटमणी म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. चौफेर आणि बहुश्रुत ज्ञानाने सक्षम अशा राजर्षींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि स्वराज्या बद्दल असलेला अभिमान आणि आदरभाव त्यांच्या चरित्रात ठिकठिकाणी दिसून येतो. हाच अभिमान आणि वारसा आपल्या प्रजेतही रूजावा वाढावा म्हणून शिवराय आणि ताराबाई या देवतुल्य व्यक्तिमत्वांच्या समारंभांना धार्मिक उत्सवाचे स्वरूप देऊन १९१४ साली महाराजांनी एक रथोत्सव केला.ज्योतिबा यात्रेनंतर दुसऱ्या दिवशी करवीर निवासिनी चा रथोत्सव संपन्न होत असतो.याच रथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी महाराजांनी हा शिवाजी महाराज व ताराराणी सरकारांचा रथोत्सव सुरू केला.या रथोत्सवात अनेक शिवप्रेमी सहभागी होवून रथ ओढतात.तसेच दरवर्षी कोल्हापुरातील शिवशक्ती प्रतिष्ठान च्या वतीन भव्य रांगोळी साकारण्यात येते.

गणेशोत्सव अगोदर कोल्हापूकर मोठ्या उत्सुकतेने त्र्यंबोली यात्रेची वाट पाहत असतात.आषाढ महिन्यातील दर मंगळवारी आणि शुक्रवारी त्र्यंबोली देवीला शहरातील सर्व तालमी व अनेक पेठांमध्ये नवीन पाणी नेऊन त्याचे पूजन करण्याची प्रथा कोल्हापुरात आहे.प्रथेनुसार शहरातील पेठांतून तसेच उपनगरातील गल्‍ली- बोळातून देवीची आषाढातील सार्वजनिक यात्रा साजरी केली जाते.पावसानंतर नदीला येणारे नवे पाणी कावडीतून तसेच कुमारी मुलींच्या डोईवरून वाजत - गाजत त्र्यंबोली देवीला अर्पण केले जाते.यावेळी पारंपरिक वाद्य असलेले पी-ढबाकच्या गजरात मिरवणूक काढली जाते.नदीचे पाणी मंदिरापर्यंत नेले जाते व आंबील-घुगर्‍याचा नैवेद्य दिला जातो.शहरातील पेठांमध्ये त्र्यंबोली यात्रा म्हणजे मोठ्या उत्साहाचा सोहळा असतो.अनेक मंडळे परंपरेनुसार नारळीच्या झावळ्यांनी सजवलेल्या बैलगाडीतून कलश घेऊन यात्रेला येतात.गुलालाची उधळण करत मोठ्या भक्तिभावाने यात्रा साजरी केली जाते.कोल्हापुरातील तालीम संस्था,पेठापेठांतून ही यात्रा उत्साह व भक्तीपूर्ण वातावरणात साजरी केली जाते.कोल्हापूर पोलीसांतर्फेही त्र्यंबोली यात्रा साजरी करण्याची परंपरा आहे.देवीला पाणी वाहल्यानंतर परंपरेने बकऱ्यांचा बळी दिला जातो.

कोल्हापूरामध्ये साजरा होणारा गणेशोत्सव हा राज्यात लक्षवेधी ठरत असतो.अनेक सामाजिक उपक्रम राबवत येथील सार्वजनिक मंडळे राज्यात आदर्श निर्माण करतात.कोल्हापुरातील सार्वजनिक गणेशोत्सवाला देखील एक वेगळी परंपरा आहे.विशेषत पेठा - पेठांमधील मंडळे हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.गणेशोत्सवात विधायक उपक्रमांत बरोबरच जंगी विसर्जन मिरवणूक यांचे परंपरा देखील इथल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जपली आहे.घरगुती गणपती विसर्जनाच्या दुसर्या दिवशी पासून सजीव देखावे पाहण्यासाठी रांगा लागतात.कसबा बावडा,शिवाजी पेठ,मंगळवार पेठ येथे सुंदर ऐतिहासिक देखावे सादर केले जातात.अनंत चतुर्थी दिवशी प्रथम मानाचा श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्या श्री च्या मूर्तीचे पूजन होवून विसर्जन मिरवणूकीला सुरवात होते.नेत्रदीपक लेसर च्या प्रकाश झोतामध्ये अनेक मंडळ मिरवणूक मध्ये सहभागी होतात.अनेक तासामध्ये चालणारी हि मिरवणूक शांततेत व उत्सवात पार पडते.

साडेतीन शक्ती पीठांपैकी एक असलेल्या कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी अर्थात आई ( अंबाबाई ) मंदिरातील नवरात्रोत्सव मोठ्या उत्सावात साजरा करण्यात येतो.नवरात्रात नऊ दिवस देवीची विविध रुपामध्ये पूजा बांधण्यात येते. पाचव्या दिवशी देवीची गजारूढ व आठव्या दिवशी महिषासुरमर्दिनी रूपामध्ये पूजा बांधण्यात येते.पंचमी दिवशी आई अंबाबाई ची पालखी त्र्यंबोली भेटीसाठी टेंबलाई मंदिराकडे प्रस्थान करते.तिथे पारंपारिक पद्धतीने कोहळा फोडला जातो व अष्टमी दिवशी आई अंबाबाई ची पालखी नगर प्रदक्षिणा साठी बाहेर पडते.दसरा च्या दिवशी देवीची पालखी भवानी मंडप,शिवाजी पुतळा,कोमनपा,सीपीआर मार्ग,दसरा चौक,सिद्धार्थ नगर,जुना बुधवार,पंचगंगा घाट,शुक्रवार पेठ,महाद्वार रोड गुजरी मधून मंदिरात येते.अश्विन पोर्णिमा दिवशी महाप्रसाद होवून शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता होते.

कोल्हापुरातील जसा गणेशोत्सव साजरा केला जातो या प्रमाणामध्ये मोहरम साजरा केला जातो.कोल्हापुरात आजही संमिश्र वस्ती आहे.या एकोप्याचे एक प्रतीक म्हणजे मोहरम.कोल्हापुरात बाबूजमाल,घुडणपीर,बाराईमाम, काळाईमाम,वाळव्याची स्वारी,आप्पा शेवाळे,सरदार तालीम,अवचीत पीर,जुना बुधवार,नंगीवली तालीम,खंडोबा तालीम,भुई गल्ली,नारायण मोढे तालीम,असे मोठे पंजे आहेत.तत्कालीन परिस्थितीत तालीम संस्था म्हणजे आदर आणि जरब असणारे ठिकाण होते.अनेक सामाजिक, राजकीय चळवळीचे केंद्र तालीमच होते.त्यामुळेच सर्वधर्मसमभाव राखण्याचा संदेश तालमीतून दिला गेला.कोल्हापुरातल्या बहुतेक सर्व तालमीत पंजाची विधीपूर्वक प्रतिष्ठापना केली जाते.पंजे भेटीच्या कार्यक्रमाला तर गणेश उत्सव सोहळ्यासारखे लखलखाटाचे स्वरूप येते.येथे प्रतिष्ठापना केले जाणारे काही पंजे पन्हाळा,विशाळगड, औरवाड,गौरवाड,वाळवा,शिरोळ या भागात त्यांच्या मूळ स्थानी भेटीला नेले जातात.बाबूजमाल, घुडणपीर व बाराईमाम दर्ग्यातील पंजांना या मोहरमच्या काळात विशेष महत्त्व आहे.खत्तल रात्र म्हणून पाळल्या जाणाऱ्या रात्री शहरातले बहुसंख्य पंजे या तीन ठिकाणी भेटीस येतात.तेथे भेटीचा सोहळा होतो व दुसर्या दिवशी उत्सवाची सांगता होते.

कार्तिक पौर्णिमा हा दिव्यांचा, प्रकाशाचा उत्सव आहे.या पौर्णिमेला देव - दिवाळी,त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा सुद्धा म्हणतात.कोल्हापुरातील विविध सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या सहभागातून दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमे मोठ्या उत्सवात साजरी केली जाते.यानिमित्ताने पंचगंगा नदीवर हजारो पणत्या प्रज्वलित करून आनंदोत्सव साजरा केला जातो.नदीवरील सर्व घाट,ब्रह्मपुरी,महादेव मंदिर,पिकनिक पॉइंट,परिसरातील दीपमाळांवर नागरिक पहाटे साडेतीनच्या सुमारास दिवे प्रज्वलित करण्यास सुरुवात करतात.नदीपात्रात असलेल्या समाधी मंदिरांवर विविधरंगी प्रकाशझोत टाकण्यात येतात.नेत्रदीपक लेसर च्या प्रकाश झोतामुळे येथील परिसर खूपच सुंदर दिसतो.दीपोत्सवाबरोबरच पंचगंगाकाठी रांगोळीचे प्रदर्शन भरलेले असते.यामध्ये कोल्हापूरच्या विविध प्रश्नांवर काढलेल्या रांगोळ्यांनी संपूर्ण कोल्हापूरकराचं लक्ष वेधून घेतात.तसेच त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त अनेक स्मारकाच्या ठिकाणी अनेक संस्था दीपोत्सव साजरे करतात.त्रिपुरारी पौर्णिमाचे अजून एक विशीष्ट म्हणजे खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेला चंद्र स्वर्गमंडपाच्या बरोबर मध्ये येतो हे दृश्य वर्षातून एकदाच दिसते

कोल्हापुरच एक महत्वाच दैवत म्हणजे ओढ्यावरील श्री रेणुका देवी ‘उदं गं आई उद’ च्या नामघोषामध्ये ओढ्यावरील रेणुका देवीची आंबिल यात्रा पार पडते.पहाटे साडेतीन वाजल्यापासून नैवद्य देण्यासाठी भाविकांनी गर्दी असते.मंदिराचा परिसर हा दिवसभर गजबजून जातो.कोल्हापूर शहर व परिसरातून कर्नाटकातील सौंदती येथे भरणाऱ्या रेणुका यात्रेसाठी हजारो भाविक जात असतात.येथील यात्रा संपल्यानंतर शहरातील जवाहरनगर येथील रेणुका देवीच्या मंदिरात आंबिल यात्रा भरली जाते.सकाळी विधीवत अभिषेकानंतर देवीची बैठी पूजा बांधण्यात येते.त्यानंतर मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात येते.पहाटे साडेतीन वाजता छत्रपती मधुरिमाराजे आणि संयोगिताराजे यांनी नैवेद्य दाखविल्यानंतर आंबिल यात्रेला प्रारंभ होतो.पहाटे साडेतीन- चार वाजल्यापासूनच देवीच्या दर्शन आणि नैवेद्य देण्यासाठी भाविकांनी गर्दी असते.देवीचे दर्शन सुलभरीत्या होण्यासाठी पुरुष व महिलांच्या स्वतंत्र दर्शन रांगा लावण्यात येतात.देवीला भरलं वांग, मेथीची भाजी, वडी,गाजर,कांदापात,लिंबू, केळ आणि भाकरीचा नैवेद्य देण्यासाठी भाविकांची गर्दी असते.मंदिराच्या परिसरात विविध प्रकारची खेळणी,खाद्य पदार्थ व प्रसादाचे स्टॉल उभारण्यात येतात.अनेक भाविक नैवेद्य अर्पण केल्यानंतर ओढयाच्या बाजूलाच सामूहिक भोजन करतात.रात्री ९ वाजता जगाची आरती झाल्यानंतर यात्रेची सांगता झाली.

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top