कोल्हापूर जिल्ह्यातील फारसा कोणास माहिती नसलेला, किल्ल्याचे अगदी तुटपुंजे अवशेष शिल्लक असलेला पण सुंदर जंगल भटकंतीचे अपरंपार सौख्य मिळवून देणारा हा किल्ला. कोल्हापूर-कळे-बाजारभोगाव ते पडसाळी हा गडाकडे जाण्याचा मार्ग. पडसाळी या छोटय़ा गावात कोणी वाटाडय़ा मिळाला तरच ही गडयात्रा शक्य होते. पडसाळी गावातून यासाठी जवळजवळ दोन तासांची जंगलयात्रा करावी लागते. गडमाथ्यावर फेरफटका मारण्यासाठी मोकळी जागाच नाही. सगळे जंगलच जंगल. तेही घनदाट. या गडाचा फारसा इतिहास ज्ञात नाही, फक्त 1748 च्या पेशव्यांच्या अधिकार्याने पाठवलेल्या पत्रात याचा उल्लेख आढळतो. पडसाळी येथे झालेले धरण, घनदाट जंगलातील भटकंती यासाठी जर का इकडे वाट वाकडी केली तर अविस्मरणीय आनंदाची प्राप्ती मात्र नक्कीच होते
Related