कोल्हापूर जिल्ह्याचे राधानगरीच्या पुढे पश्चिमेकडचे शेवटचे टोक आणि तेथून कोकणला जाऊन भिडणारी फोंड्याची खिंड या दरम्यानचा परिसर म्हणजे दाजीपूर .दाजीपूर म्हणजे फोंडा घाटाची सुरवात.दाजीपूर म्हणजे तुफान पाऊस.दाजीपूर म्हणजे घनदाट जंगल .अशी जरूर ओळख ; पण दाजीपूरची खरी ओळख आजही लपलेली आहे.’दाजीपूर’हे नाव म्हणजे दाजीराव अमृतराव विचारे.या संस्थानकालीन कर्तृत्ववान बांधकाम अधिकाऱ्याची स्मृती आहे.राजर्षी शाहू महाराजांच्या खास विश्वासातले जे चार – पाच अधिकारी होते,त्यापैकी एक दाजीराव विचारे होते.आज अभयारण्यामुळे दाजीपूर हे नाव सर्वांना माहिती आहे.पण दाजीराव विचारे यांची ओळख फक्त इतिहासालाच आहे.दाजीपूरची चर्चा सर्व स्तरावर आहे.या पार्श्वभूमीवर दाजीपूर म्हणजे नेमके काय या स्मृतींनाही उजाळा मिळाला आहे आता जो दाजीपूरचा परिसर आहे तो ओलवण या ग्रामपंचायतीचाच मूळ भाग आहे.किंबहुना दाजीपूर जंगलही ओलवणच्याच हद्दीत आहे.दाजीराव विचारे हे नाव त्यांच्या कर्तृत्वामुळे या परिसराशी जोडले गेले आहे.दाजीराव विचारे हे मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीस होते.ती नोकरी सोडून शाहू महाराजांनी त्यांना करवीर संस्थानच्या नोकरीत घेतले.ब्रिटिश अभियंता आर. जे. शानन यांच्या नंतर त्यांच्या जागी कार्यकारी अभियंता म्हणून दाजीराव विचारे यांची नियुक्ती झाली.ते बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ होते.राधानगरी धरण, साठमारी , खासबाग कुस्ती मैदान, पॅलेस थिएटर, सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवमंडप उभारणीत दाजीराव विचारे यांचे मोठे योगदान राहिले.बहुजन समाजातील मुलांनी शिकून मोठे व्हावे म्हणून होतकरू मुलांना त्यांनी दत्तक घेतले होते.त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी स्वतःचा पैसा खर्च केला.दाजीराव विचारे,शाहूपुरीतील पाच बंगल्यापैकी एका बंगल्यात राहत होते.त्याकाळी हे पाच बंगले म्हणजे शान आणि मानाचे स्थान होते.आता त्यातल्या चार बंगल्यांच्या जागी मोठ्या अपार्टमेंट उभ्या आहेत.फक्त दाजीराव विचारे यांचा बंगला शिल्लक आहे.या विचारेंनी एस . टी . स्टॅंडजवळ आता जे जेम्स स्टोन आहे ,ती जागा शाळेसाठी नगरपालिकेला दान केली . विचारे विद्यालय म्हणून तेथे शाळा होती . काळाच्या ओघात ही शाळा पाडली . शाळेच्या मैदानावर बीओटी तत्त्वावर जेम्स स्टोन हे व्यापारी संकुल उभे राहिले . ज्यांनी जागा दान केली , त्यांचे नाव या संकुलाखाली गाडले गेले .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top