श्री महालक्ष्मीचे स्वरूप

   करवीर निवासिनी आदिशक्ती श्री महालक्ष्मी ही जगातील सर्व संप्रदायांना आपली माता वाटते याचे कारण म्हणजे तिचे रूप आणि नाव ! एकनाथांचे नातू श्री मुक्तेश्वर यांनी म्हटल्याप्रमाणे “तारा अगम्य शाक्ता शिवभजका गौरी सांख्यासी प्रकृती निर्गुण निजधारी गायत्री निजबीज निगमागम सारी प्रकटे । पद्मावती श्री जिनधर्मचारी” असे तिचे विलोभनीय रूप आहे.

         महालक्ष्मी म्हणजे करवीरच्या तमाम भोळ्या भक्तांची आई अंबाबाई. अंबा म्हणजे माता! आम्हा करवीरकरांसाठी ती सर्वश्रेष्ठ आई जगतजननी या नात्याने तिचे अंबाबाई हे लोकाचारातले नाव फार प्रसिद्ध आहे. पण शास्त्रानुसार श्री दुर्गा सप्तशती ग्रंथात वर्णन केलेले

मातुलुंग गदा खेटम् पानपात्रमच बिभ्रती

नागम् लिंगमच योनींच विभ्रती नृप मूर्धनी

          ही सर्वस्याद्या श्री महालक्ष्मी म्हणजे जिने स्वतःतून महाकाली महासरस्वती यांना प्रकट केले. त्या तिघींनी स्वतःहून श्री ब्रह्मा, सरस्वती, विष्णू लक्ष्मी, शिवगौरी यांना प्रकट केले. अशा या सर्वस्याद्य म्हणजे जगातल्या पहिल्या सगुण मूर्तीचे वर्णन सांगताना या ग्रंथात म्हटलय –

     “जिने आपल्या चार हातात म्हाळुंग हे फळ, गदा ढाल आणि पानपात्र (वाटी) धारण केली आहे. मस्तकावर नाग ब्रह्म प्रतिक) लिंग (पुरुष / शिवप्रतिक) आणि योनी (प्रकृती / विष्णू) प्रतिक धारण केली आहेत ती ही आदिशक्ती जगदंबा आहे.आज आपण गाभाऱ्यात उभ्या मुर्तीचे जर वर्णन पाहिले तर 1000 वर्षे जुनी असून स्थानिक बेसाल्ट पाषाणात घडवली असून ती शिवलिंगाकार चौथर्यावर उभी आहे. 2फूट 9 इंच उंचीची ही मूर्ती चतुर्भुज म्हणजे चार हाताची आहे.उजव्या खालच्या हातात म्हाळुंग (citrus in medica ) हे बीजफल जे कर्मवृंद किंवा ईच्छाशक्तीच प्रतिक; वरच्या हाताशी लांबसडक नाजूक बोटानी सावरून धरलेली क्रिया शक्तीची सूचक अशी गदा; डाव्या वरच्या हातात माग फीरवून धरलेली ढाल जी ज्ञानशक्ती रूप आहे.तर डाव्या खालच्या हातातल पानपात्र (वाटी) हे तिची तुरीया अवस्था दर्शवत.अंगावर भरपूर कोरलेले दागिने आणि घोट्या पर्यंत नेसलेल वस्त्र तीची संपन्नता दाखवतात.तर पुष्ट स्तन तिचा जगाबद्दलचा मातृभाव दाखवतात.कमरेला नाजूकपणा इतका की कटीच मापदंड असणारा सिंह लाजून मुकाट्यान पायाशी बसला( हे वर्णन संत दासगणू यानी पायाशी असलेल्या वामावर्ती म्हणजे डावीकडे मुख असलेल्या सिंहाच केलय)समचरण त्यात तोडे पैंजण.कपाळ रूंद चाफेकळी नाक ओठावर निरागस पण गूढ स्मित आकर्ण नेत्र त्यात वत्सलतेचा सागर.कानात असलेली मयुर कुंडल,माथ्यावर कपाळपट्टी त्यावर समोर फणा  धरून बसलेला साडेतीन वेटोळ्याचा नाग त्या काल रूपी नागाच्या फण्यामाग विश्वाच सृजन करणारे पुरूष प्रकृती सयोनी लिंग रूपात विराजमान आहे अशी ही आदिशक्ती  ना विष्णूपत्नी ना शिवपत्नी  तरी सर्व देवतांच्या भक्ताना उपास्य वाटणारी कोल्हापूरकरांची आई अंबाबाई तर मार्कंडेयांची सर्वस्याद्या श्री महालक्ष्मी आहे.

मंदिराचा इतिहास

कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे सर्वसाधारणपणे १७०० ते १८०० वर्षे जुने आहे. मंदिराचा पहिला उल्लेख संजान (ठाणे) येथे सापडलेल्या शके ७९३ (इ. स. ८७१) च्या ताम्रपटामध्ये राजा अमोघवर्ष याने आपल्या डाव्या हाताची करंगुळी कापून श्री महालक्ष्मीला अर्पण केली असा उल्लेख आहे. यावरून सातव्या शतकात कोल्हापुरची महालक्ष्मी या ठिकाणी होती असा अर्थ करता येतो.यानंतर शिलाहार, सिंद, चालुक्य, यादव अशा अनेक राजवटी या भागावर राज्य करत होत्या. त्यापैकी सर्वच राजवटींनी या मंदिराचा आपआपल्या पद्धतीने विस्तार केला. मंदिराच्या बाबतीत एक आख्यायिका प्रचलित आहे की, देवळात असणाऱ्या द्वारपालांच्या दोन भव्य मूर्ती या असुरांच्या (राक्षसांच्या) असून त्यांनी या मंदिराची निर्मिती केली. त्याकरता त्यांना केवळ एका रात्रीचा कालावधी लागला.पण खरी गोष्ट ही आहे मंदिर बांधण्याकरता पाच ते सहा शतकांचा कालावधी गेला व हे सर्व बांधकाम राजे रजवाड्यांनी कलावंतांच्या हातून घडवले.विशेष सांगायचे तर तैलण नावाच्या व्यक्तीने शके ११४० मध्ये देवीपुढे तोरण (महाद्वार ?) बांधल्याचा उल्लेख मिळतो.पाठीमागचा पूर्व दरवाजा सरदार दाभाडेंनी बांधल्याचा काळ आजही त्या द्वारावर नमूद आहे.

           महालक्ष्मी समोरचा गरुड मंडप हा १८३८-४२ च्या दरम्यान दाजी पंडीत या पोलिटिकल एजंटच्या काळात बांधण्यात आला.आदिलशाहीचा काळ हा देवीच्या अज्ञातवासाचा काळ होता. या काळात श्री महालक्ष्मी मूर्ती लपवून कपिलतीर्थ येथे पुजाऱ्यांच्या घरी ठेवण्यात आली होती.२६ सप्टेंबर १७१५ रोजी सावगावकर प्रधान, गजेंद्रगडकर घोरपडे सरकार, छत्रपती श्री पूजक यांनी विजयादशमी दिवशी तिची पुन्हा स्थापना केली.

देवीचे नित्यापचार

पहाटे 4.15
घंटानाद
पहाटे 4.45
हक्कदार श्रीपूजक येऊन देवीचे दार उघडतात.पद्यपूजा, मुख प्रक्षालन करून काकडारती होते. यावेळेस भक्तगण भूपाळ्या म्हणत असतात. लोणी साखरेचा नैवेद्य दाखवतात. नरकचतुर्दशी, कार्तिक पौर्णिमा या दिवशी रात्री 1.30 ला तर मधल्या पंधरा दिवसात पहाटे 3.30
ला दार उघडले जाते.
सकाळी 8.30
महापूजेच्या सूचनेचा घंटानाद व महापूजा प्रारंभ
सकाळी 9.30
मंगलारती, खिरीचा नैवेद्य, 16 पानी तांबूल.फक्त आषाढी कार्तिकी एकादशी व महाशिवरात्री पारणा यादिवशी यावेळेस पुरणपोळीचा महानैवेद्य.
सकाळी 11.30
पाद्यपूजेच्या सूचनेचा घंटानाद व पाद्यपूजा.
दुपारी 12.30
भोग आरती. शुक्रवार व इतर उपवासाचे दिवस वगळता रोज पुरणपोळीचा नैवेद्य व तांबूल
दुपारी 1.30
अलंकार पूजा – श्रीपूजक जरुरीप्रमाणे हवालदार खांडेकरांकडून खजिन्यावरील दागिने घेतात व देवीची सुंदर अलंकार पूजा बांधतात.
रात्री 10.00
शेजारती, नैवेद्य – दूध आणि विडा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top