दक्षिण काशी आणि दख्खनचा राजा म्हणून प्रसिद्ध असणारे महाराष्ट्र व कर्नाटक प्रांतातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजेच ‘केदारनाथ’ उर्फ ‘जोतिबा’. यालाच ज्योतिबा, ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ असेही म्हणतात.असे हे ज्योतिबा क्षेत्र कोल्हापूरच्या वायव्य दिशेला बावीस कि.मी. वर असून या ज्योतिबा डोंगराला ‘वाडी रत्नागिरी’ असेही म्हणतात. तो 333 मी.मी. उंच असा सोंडेसारख्या वर गेलेल्या भागावर आहे. तो अलग आणि वेगळा दिसत असला तरी सह्याद्रीच्या माथ्यापासून पन्हाळ्यावरून कृष्णा नदीकडे जो फाटा गेला आहे त्याचाच एक भाग आहे. त्याच्या माथ्यावर वाडी रत्नागिरी या नावाने गाव वसले आहे. येथेच प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले ज्योतिबाचे मंदिर आहे.
श्री जोतिबा मूर्ती
श्री जोतिबा मंदिरातील श्री ज्योतिबाची मूर्ती निळसर पाषाणाची तीन फूट उंचीची असून चार हात असलेली,जानवे धारण केलेली आहे.मूर्तीच्या हातात अनुक्रमे खडग (तलवार),अमृतपात्र, त्रिशूल, डमरू आहे.मूर्तीचा पेहराव धोतर,अंगरखा,पगडी,टोप किंवा फेटा असून,नित्य वापरासाठी दागिने असतात.पोषाख दिवसातून दोन वेळा बदलला जातो.पूजेसाठी चांदीचे साहित्य वापरले जाते.श्री जोतिबाचे मुख्य वाहन घोड़ा व उपवाहन शेष आहे.कोणत्याही देवाची मूर्ती दक्षिणाभिमुख असत नाही,पण ही मूर्ती मात्र दक्षिणेकडे तोंड करून उभी आहे.श्री जोतिबाने रत्नासुराचा वध केल्यामुळे श्री-महालक्ष्मी अंबाबाईच्या मनातील भीती नाहीशी झाली म्हणून अंबाबाईने श्री जोतिबाला विनंती केली की तुमची दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे.श्री जोतिबा ही विनंती मान्य करून आपले मुख अंबाबाईकडे वळवले.तेव्हापासून ते दक्षिणेकडे आहे.(इति श्री केदार विजय).श्री जोतिबा मूर्तीचा सन 1935 व 1985 साली वज्रलेप करण्यात आला होता. तशाच प्रकारचा वज्रलेप मार्च 2006 मध्येही करण्यात आला.या वज्रलेपामुळे पूर्वीचे हुबेहून रूप मूर्तीला प्राप्त झाले.श्री जोतिबा वाहन घोडा,जोतिबा देवालयाकडे असणारा घोडा म्हातारा झाला होता.वज्रलेपाच्या निमित्ताने नवा तरुण घोडा मार्च 2006 मध्ये खोदी करण्यात आला.हा घोडा पांढऱ्या शुभ रंगाचा, मानेवर झुबकेदार केस, अनेक खोडी म्हणजे सर्वगुण संपन्न असणारा हा दुर्मिळ घोडा आहे. या घोड्याचे नाव ‘आदित्य’ आहे.श्री जोतिबाचे पालखी सोहळ्याचे उंट,घोडे जून महिन्यापासून पोहाळेतील ‘घट्टी’ या ठिकाणी ठेवले जातात. डोंगरावर थंडीवान्याचे प्रमाण जास्त असते. त्यापासून प्राण्याचे संरक्षणासाठी त्यांना पोहाळ्यात ठेवले जाते.गेल्या ५०-६० वर्षापासून ही परंपरा सुरू आहे.जूनमध्ये ठेवलेले हे उंट व घोडा नवरात्र उत्सव सुरू करण्यासाठी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात पुन्हा डोंगरावर आणले जातात.
मंदिर परिसर
श्री जोतिबाचे आज जेथे मोठे देवालय आहे.तेथे पूर्वी छोटेसे देवालय होते.आजचे देवालय सन 1730 मध्ये ग्वाल्हेरचे राणोजीराव शिंदे यांनी बांधले.हे देवालय उत्तम बांधणीचे असून देवळाचे दगड उत्तम निळ्या बासाल्ट खडकाचे आहेत.हे देवालय 57 x 37 x 77 फूट असे आहे.देवळाची रचना व कलाकृती मनोवेधक आहे. दुसरे देवालय केदारेश्वराचे असून ते सन 1808 मध्ये दौलतराव शिंदे यांनी बांधले असून 49 x 22 x 89 फूट असे आहे. ज्योतिबा व केदारेश्वर मंदिराच्या मध्यभागी चोपडाईचे मंदिर असून ते प्रीतिराव चव्हाण हिंमतबहादुर यांनी बांधले असून 52 × 46× 80 फूट असे आहे. चौथे रामेश्वराचे देवालय असून हे मंदिर सन 1780 मध्ये मालोजी निकम पन्हाळकर यांनी बांधले असून हे १३x१३ x ४० फूट असे आहे.केदारेश्वराच्या समोरील चौथऱ्यावर दोन काळ्या दगडाचे नंदी असून ते दौलतराव शिंदे यांनी बसविले आहेत.देवालयाच्या पूर्वेकडील बाहेरील बाजूस सटवाई, दत्तात्रय आणि उत्तरेकडे काळभैरव आहेत.
एकूणच मंदिर परिसर २३४ X २७० फूट आहे. या परिसरात उत्तरेस १३ व पूर्वेस १७ ओवऱ्या आहेत. त्यांपैकी काही ओवऱ्या व महादेव मंदिर, गायमुख तलाव, दक्षिण दरवाजा, देवबाव व यमाई मंदिर ग्वाल्हेरकर शिंदे यांनी बांधले आहे. ज्योतिबा आवारात पालखी सदर, नगारखाना, हत्तीमहाल व एक मोठी घंटा आहे. हत्तीमहालात ऐश्वर्याचे लक्षण असणारा ‘सुंदर’ गजराज श्री. विनय कोरे (आमदार, पन्हाळा-शाहूवाडी) यांनी श्री जोतिबा चरणी अर्पण केला आहे. ही घंटा चिमाजी अप्पांनी ज्योतिबाला अर्पण केलेली आहे. देवालयास उत्तर, दक्षिण व पश्चिम असे दरवाजे आहेत. दक्षिण दरवाजापुढे बगाडाचा चौधरा आहे. एकूण मंदिर परिसर हा तटबंदीने बंदिस्त असून परिसरात दगडी फरशी आहे.