कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज या तालुका मुख्यालयापासून आग्नेयेस १० कि.मी.अंतरावरील सह्याद्रीच्या एका अलग फाटय़ावरील दीर्घ वर्तुळाकार टेकडीच्या माथ्यावर शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधलेला हा दक्षिणेचा राखणदार म्हणजे किल्ले सामानगड. समुद्र सपाटीपासून 792 मीटर उंचीवरील या किल्ल्याने स्वराज्याच्या उभारणीत आपल्या वैशिष्टय़पूर्ण भूरचनेमुळे फार मोठे योगदान दिले आहे. वाहतुकीस सुलभ पण तरीही सुरक्षित असलेल्या या किल्ल्यावरून इतर गडांना किंवा सैनिकांना लागणारे सर्व युध्द साहित्य व इतर आवश्यक साहित्यांचा पुरवठा केला जात असे. इ.स. १६७६ मध्ये छत्रपतींनी या किल्ल्याची दुरुस्ती केली होती. सामानगडाच्या सर्व बाजूंनी कातळ तासून काढला असून त्यावर १० ते १५ फूट उंचीची तटबंदी व जागोजागी बुरुज बांधले आहेत.
सामानगडावर जाण्यासाठी वरपर्यंत डांबरी रस्ता आहे. पर्यटकांनी सामानगड आवर्जून पाहण्याचे महत्वाचे कारण म्हणजे गडावरील वैशिष्टय़पूर्ण रचनेच्या जांभ्या दगडात कुशलतेने खोदून काढलेल्या विहिरी. अन्य कोणत्याही गडावर इतक्या संख्येने न आढळणारी विहीर संकुले म्हणजे सामानगडाची खरीखुरी आभुषणे आहेत. विहिरीत उतरण्यासाठी खोदलेल्या कातळकोरीव पायर्‍या, पायर्‍यांच्या वरच्या बाजूच्या सुंदर कमानी, विहिरीतील भुयारे, पाण्याची कुंडे सारेच काही अप्रतिम आहे. किल्ल्यातील सोंडय़ा बुरुजासमोर मुघल टेकडी आहे. किल्ल्यावर तोफ डागण्यासाठी मोघलांनी ती निर्माण केल्याचे सांगतात. गडभटकंतीबरोबरच हनुमान मंदिर, कातळ खोदून काढलेली लेणी, गडाच्या दक्षिणेकडील उतरणीवरील भीमशाप्पा नावाच्या सत्पुरुषाची समाधी व वनभोजनासाठी स्वच्छ पाण्याचे कुंड, ‘भीमसासगिरी’ हा मंदिर समूह यांच्या भटकंतीमुळे सामानगडाची सहल आनंददायी होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top