वैभववाडी तालुक्याच्या वैभवात अधिक भर टाकणा-या पर्यटन स्थळामध्ये करूळ घाट मार्गाचे आग्रहाने नाव घेतले जाते. सह्याद्रीच्या पायथ्याशी नागमोडी वळणाचा घाट ५० वर्षापूर्वीच्या स्थानिक मजुरांच्या अंगमेहनतीने व अथक परिश्रमाने अस्तित्वात आला आहे.आजूबाजूने नैसर्गिक साधनसामग्रीने नटलेल्या या घाटमार्गातून हजारो वाहनांची वर्दळ सुरू आहे. कोकणातील एकूण घाटमार्गापैकी करूळ घाट पर्यटकांना व या मार्गे येणा-या प्रवाशांना अधिक मोहिनी घालणारा घाट असा उल्लेख केला जात आहे. सिंधुदुर्ग व गोवा या ठिकाणच्या बहुतांश बाजारपेठा कोल्हापूर मार्केटवर अवलंबून आहेत. तब्बल ५० वर्ष हा घाटमार्ग सिंधुदुर्ग व कोल्हापूर या दोन जिल्ह्यामध्ये देवाण-घेवाणची महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
सन १९५८ तत्कालीन बांधकाम मंत्री बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते या दोन्ही घाटांचा शुभारंभ करण्यात आला. अखेर दहा वर्षाच्या अथक परिश्रमानंतर सन १९६८ मध्ये या घाटातून वाहतुकीला प्रारंभ झाला.करूळचे सुपुत्र माजी आमदार ए. पी. सावंत यांचे हा घाटमार्ग सुरू होण्यास मोठे योगदान आहे.प्रवासाच्या दृष्टीने सोयीस्कर मार्ग म्हणून कोल्हापूर- विजयदुर्ग या मार्गाकडे पाहिले जाते. याच मार्गावर वैभववाडी व गगनबावडा तालुक्याच्या हद्दीवर १३ कि.मी. अंतराचा हा करूळ घाट आहे. घाटातील नागमोडी वळणे, उंचावर असलेला किल्ले गगनगड, खोल दरीत दिसणारी टूूमदार घरे, सकाळच्या वेळी दरीतून उसळी मारणारे धुके यामुळे या मार्गे प्रवास करणारे पर्यटक घाटमार्गात मनमुराद आनंद घेतात.पर्यटकांना मोहिनी घालणारा घाट असाही या घाटाचा उल्लेख केला जातो. सिंधुदुर्ग व गोव्याकडे जाणारी सऱ्हास मालवाहतूक याच मार्गे होत असते.