करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या वास्तव्याने पावन असलेलं शहर म्हणजे आपलं कोल्हापूर. या आपल्या कोल्हापुरात अनेक अशी सुंदर व प्राचीन मंदिरे पाहण्याजोगी आहेत प्रत्येक मंदिराची महती , इतिहास व एक वेगळीच ओळख आहे अशाच मंदिरांपैकी कोल्हापूच्या मध्यवस्तीत वसलेले एक सुंदर असं मंदिर म्हणजे कैलासगडची स्वारी मंदिर. या मंदिरात असणारी सुंदर अशी चित्रे हि तर या मंदिराची खासियतच आहे जणू. गुढीपाडवा व मराठी नववर्ष या निमित्ताने माझी पावले या मंदिराकडे वळालीत. सकाळी जोतिबा दर्शन करून येत असतानाच अचानक या मंदिरात जाण्याचा विचार मनात आला. तसेही या आधी मी बऱ्याच वेळा येथे गेलो आहे पण काल मात्र या मंदिराची संपूर्ण माहिती जाणून घेण्याच्या उद्देशाने तसेच तेथील काही छायाचित्रे टिपण्याच्या निमित्ताने तिकडे जावयाचे ठरवले. सोबत असलेल्या बंडू माळी या साथीदारास या मंदिराकडे जाण्याचे आहे अशी कल्पना दिली. तो हि लगेच तयार आणि निघालो सरळ मंगळवार पेठेत. कोल्हापूरच्या मध्यवस्तीत असलेल्या मंगळवार पेठ या ठिकाणी हे मंदिर आहे मंगळवार पेठेतील पाटाकडील तालीम मंडळ या शेजारच्याच एका गल्ली मध्ये हे सुंदर असे मंदिर उभे आहे. काही वेळातच आम्ही पोहोचलो मंगळवार पेठेत. पाटाकडील तालमीस लागूनच असलेल्या डाव्या बाजूच्या वळणाने आम्ही मंदिराच्या परिसरात गेलो प्रथमदर्शनीच उभी आहे ती भव्य व सुंदर अशी दगडी कमान. मंदिराच्या दक्षिण दिशेस उभी असलेली हि जांभ्या दगडातील सुंदर अशी कमान ३० फूट उंच व २० फूट रुंद अशा स्वरूपाची आहे. या कमानीवर श्री गणेशाची सुंदर अशी पितळी मूर्ती विराजमान आहे. मंदिराच्या पश्चिमेस देखील एक लहान अशी दगडी पाषाणाची सुंदर कमान आहे.आम्ही कमानीतून आत मंदिर परिसरात पोहोचलो. समोरच होते कैलासगडची स्वारी हे भव्य असे मंदिर. मंदिराच्या बाहेरील भाग अतिशय सुंदर असा आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूस कलाकुसरीने नटलेले प्रत्येकी दीड टन वजनाचे दोन दीपस्तंभ उभे असून हे दीपस्तंभ तब्बल २२ फूट उंचीचे आहेत. सायंकाळच्या वेळी हे दीपस्तंभ विदुत रोषणाईने प्रज्वलित केले जातात. त्यामुळे एक आगळी वेगळी आभा मंदिराच्या शिल्पात भर घालते. तसेच या भव्य दिव्य समई बाबतचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र लवकरच या मंदिरास मिळणार आहे अशी माहिती तेथून मिळाली. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर डाव्या बाजूस ब्रॉन्झचा सूर्य असून उजवीकडे चंद्र कलाकृती आहे. डाव्या बाजूच्या सूर्याच्या प्रतिकृतीशेजारीच एक लहान चौकट आहे. या चौकटीवर पितळेचे सुंदर असे कीर्तिमुख असून चौकटीचे दरवाजे देखील पितळी असून त्यावर सुंदर अशी कलाकुसर करण्यात आली आहे. या चौकटी शेजारीच भिंतीवर शिवाची सत्यम शिवम सुंदरम हि तीन निर्मल वचने संगमरवरी पाषाणात कोरलेली आहेत. त्याखालीच पितळी ओम ची प्रतिकृती असून त्याखाली काळ्या पाषाणातील नंदी कोरण्यात आला आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजाची चौकट दगडी पाषाणात बनवली आहे. 

मंदिराच्या मुख्य दरवाजावर दगडी पाषाणाची अडीच फूट अशी छपरी बाहेर काढलेली असून छपरीवर दगडी पाषाणाची प्रभावळ असून ती कमलाकारात कोरलेली आहे. कमळामध्ये संगमरवरात गणपतीची मूर्ती कोरली असून बाजूच्या दगडी पाषाणात बेलाची पाने , शंख कोरले आहेत. मुख्य दरवाजाच्या छपरी खाली नक्षीकामाची पाषाणाची चौकट असून या चौकटीमध्ये नागराज असून बाजूस हत्ती मुखाचे सुंदर असे कोरीव काम केले आहे. तसेच चौकटीच्या खालील दोन्ही बाजूस जय – विजय यांच्या सुबक अशा मूर्ती आहेत. मंदिराच्या मुख्य दरवाजासमोर एक टन वजनी पितळी धातूचा नंदी असून त्यावर आकर्षक अशी कारागिरी आहे. नंदीच्या बाजूसच कलशाकृती असे दोन दगड देखील आहेत व ह्या बाहेरील परिसरात पितळी पाईपचे ग्रील बसवण्यात आले आहे. मंदिराची भव्यता दक्षिण हिंदुस्थानामध्ये असलेल्या जोतिर्लिंग म्हणजे जोतिबा डोंगर येथील काळा पाषाण वापरून कलाकुसर केली आहे. मंदिराच्या वरील बाजूस शिवधनुष्याची आकृती दगडी पाषाणामध्ये कोरली आहे. आदीशक्ती ( शिवालय ) कैलासगडची स्वारी मंदिराचे नाव देखील दगडी पाषाणामध्ये कोरले आहे. मध्यभागी धनुष्यामधे सोनेरी त्रिशूल रूपात भगवा ध्वज दिमाखाने फडकतो आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यावर संगमरवरी शिखर असून शिखरावर सोनेरी कळस आहे. मंदिराच्या उजव्या बाजूस नगारखाना व डाव्या बाजूस घंटी वंदन डमरू आहेत. दोन्ही घुमटावर सोनेरी कळस बसवले आहेत. मंदिराच्या शेजारीच धार्मिक ग्रँथालय असून त्यामध्ये सर्व धर्माची ग्रंथसंपदा मोफत वाचण्यास उपलब्ध करून दिली आहे. या मंदिरात पूर्वापार पहाटे ५ वाजता नगारा, त्यानंतर पूजा, मंगल आरती, धूप दीप व रात्री ८ वाजता आरती, मंत्र पुष्पांजली आणि रोज सायंकाळी साडेसहा वाजता ग्रंथवाचन , श्रवण असे दैनंदिन कार्यक्रम पार पडत असतात. प्रतिवर्षी मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यात आध्यात्मिक विषयावर व्याख्याने, प्रवचने, कीर्तन, पारायणे, सुगम संगीत असे १५ दिवस सांस्कृतिक कार्यक्रम असतात. हुताशनी पोर्णिमेदिवशी महाअभिषेक , पूजा , पालखी व महाप्रसाद वाटप केले जाते या कार्यक्रमास हजारो लोक उपस्थित राहतात. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचा दरवाजा हा पितळी धातूच्या आवरणाने बनवला असून त्यावरील नक्षीकाम देखील तितकेच उत्तम खास करून त्यावर सिंहाच्या मस्तकाच्या कोरलेल्या मुद्रा. मंदिरामध्ये व गाभार्यात बसवलेले शुभ्र संगमरवर जणू हिमालयातील कैलास शिखराचा आभास निर्माण करते. मंदिरात प्रवेश करताच आपले लक्ष वेधले जाते ते थेट मंदिराच्या गाभाऱ्याकडे. गाभार्याबाहेरील भाग, चौकट व गाभाऱ्याचा दरवाजा हे सर्व चांदीचे बनवले असून त्यावर करण्यात आलेले नक्षीकाम काम मात्र अप्रतिम असेच आहे

मुख्य गाभाऱ्यात शिवलिंग असून गणेश मूर्ती, भवानी देवीची मूर्ती, नंदी , शेषनारायण स्वारीची काठी , स्वारीच्या पादुका, पाठ, त्रिशूल, राजदंड काठीव हनुमंताची मूर्ती या सर्व गोष्टी चांदीच्या आहेत. अतिशय सुंदर अशा स्वरूपात पूजा मांडलेली असते. मागच्या बाजूस असलेले श्री शंभू महादेवाचे तैलचित्र मात्र क्षणभर का होईना आपल्या नजरेस खिळवून ठेवते. हे समुद्रमंथनाच्या प्रसंगाचे तैलचित्र असून यामध्ये भगवान शंकरानी हालहाल विष प्राशन करतानाच प्रसंग देखील कोरण्यात आला आहे. गाभाऱ्याच्या बाहेर पितळी स्वरूपातील मोठ्या समया प्रज्वलित केलेल्या असून उत्सवकाळात काढण्यात येणारी चांदीची पालखी देखील तिथे ठेवण्यात आली आहे. या मंदिराची एक सर्वात वेगळी ओळख म्हणजे या मंदिरामध्ये असलेले अतिशय सुंदर अशी तैलचित्रे. ईथे येणाऱ्या प्रत्येकाला हि चित्रे थोड्या वेळासाठी का होईना थांबवून ठेवतातच. संपूर्ण मंदिरात उत्कृष्ट अशा लाकडी फ्रेम मध्ये सजावट करून अतिशय सुंदर अशी तैलचित्रे आहेत हीच खरी खासियत आहे या मंदिराची हे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हॉलंडच्या म्युझियम मध्ये उपलब्ध असलेल्या अस्सल रेखाचित्रावरून शिवाजी महाराजांचे तैलचित्र कलायोगी जी.कांबळे यांनी या मंदिरास तयार करून दिले व मंदिरामार्फत शासन दरबारी त्यास मान्यता मिळवली ते चित्र दि. २ मार्च १९७० रोजी मंदिरामार्फत शासनास बहाल केले. या अस्सल चित्रावरूनच छ. शिवरायांची चित्रे भारतभर लावली जातात. या चित्रात छत्रपती शिवाजीराजे यांचा चेहरा, डोळे, दाढी हे वैशिष्ट्यपूर्ण असून त्यांचा पेहराव अत्यंत साधा आहे. दागदागिने मोजकेच व मराठी पद्धतीचे असून गळ्यामध्ये कवड्याची माळ आहे. त्यांच्या जिरेटोपामध्ये मोत्याचा तुरा असून त्या तुऱ्यात पक्ष्यांची पिसे आहेत. ते छत्रपती शिवरायांचे तैलचित्र गाभार्याच्या बाहेरील डाव्या बाजूस ( चांदीच्या पालखी वर ) लावण्यात आले आहे. तर उजव्या बाजूस छत्रपती शिवराय चिरनिद्रा घेत असलेल्या दुर्ग रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे अतिशय सुंदर असे चित्र येथे लावण्यात आले आहे.या चित्रात मावळत्या रश्मीची सुंदर अशी किरणे या समाधीवर पडतानाचे सुंदर दृश्य रेखाटण्यात आले आहे. गाभार्याच्या वरच्या बाजूस ध्यानस्थ बसलेल्या श्री शंभू महादेवाचे सुंदर असे तैलचित्र असून या चित्राच्या दोन्ही बाजूस ( डाव्या व उजव्या ) श्री गणरायाचे नृत्य स्वरुपातील व सरस्वती मातेचे वीणा वादन स्वरूपातील एक भव्य तैलचित्र तर एका बाजूस भगवान श्री शंकराचे तांडव नृत्य स्वरूपातील सुंदर असे तैलचित्र आहे. गाभार्याच्या आतील बाजूस अतिशय सुंदर असे समुद्रमंथनाच्या प्रसंगाचे तैलचित्र असून यामध्ये भगवान शंकरानी हालहाल विष प्राशन करतानाच प्रसंग देखील कोरण्यात आला आहे. मंदिराच्या हॉल मध्ये दोन्ही बाजूस भिंतीवर भव्य व सुंदर अशी दोन तैलचित्र आहेत त्यातील एक श्री कृष्ण अर्जुनास रणांगणावर गीता उपदेश करीत असताना श्रीकृष्णाने दाखवलेल्या विराट स्वरूपाचे भव्य तैलचित्र आहे तर एका बाजूस छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगाचे सुंदर असे तैलचित्र आहे या दोन्ही चित्रांच्या फ्रेम देखील तितक्याच सुंदर व आकर्षक आहेत. मंदिराच्या या दरबार हॉल मध्ये ऐतिहासिक संस्थान काळातील पूर्वीचे दुर्मिळ असे झुंबर देखील आहे तसेच या सर्व चित्रांशिवाय १९६० पासून मंदिराची सर्वव्यापी जबाबदारी घेऊन श्रद्धा, भक्ती हि मूल्ये जोपासून या शक्तीची खडतर तपश्चर्या करून सर्व भक्तांच्यासाठी तन , मन , धन देऊन आपले जीवन मंदिरासाठी समर्पित केलेल्या निस्सीम भक्तांची तैलचित्रे देखील लावण्यात आली आहेत.या मंदिराची थोडक्यात माहिती- प्राचीन काळापासून करवीर क्षेत्र हे श्री महालक्ष्मीचे देवस्थान म्हणून प्रख्यात आहे. त्याचबरोबर कोल्हापूरला दक्षिणकाशी असेही म्हणतात इतके या क्षेत्राचे मोठे माहात्म्य आहे. शतकानुशतके या हिंदुस्थानात मंदिरे उभारली जात आहेत सामान्य माणसाला ज्या मंदिरात प्रवेश करताच परमेश्वरी अस्तित्वाचा साक्षात्कार होतो अशा काही मंदिरांपैकी श्री ( शिवालय ) कैलासगडची स्वारी हे मंदिर. काशीचा जसा काशी विश्वेश्वर तसा या दक्षिण काशीचा कैलासेश्वर.

श्री क्षेत्र दक्षिण काशीच्या वैभवात भर घालणारी हि वास्तू जागृत व भाविकांचे श्रद्धांस्थान आहे. महालक्ष्मी मंदिरानंतर भक्तांना व पर्यटकाना आकर्षित करणारे हे मंदिर ” कैलासगडची स्वारी ” असा शिवाचा उल्लेख फक्त येथेच होतो. येथे हिंदू – मुस्लिम व इतर धर्मीय लोक या मंदिराच्या उत्सवात सहभागी होऊन उत्सव साजरा करतात १९६० पासून मंदिराच्या नवीन पिढीच्या भक्तांनी श्रद्धेने व भक्तीने नीतिमूल्ये जोपासून याची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली कालांतराने मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प करण्यात आला व मंदिराचा विस्तार वाढून शिवस्वारीच्या आशीर्वादाने हे कलाशिल्प इ . सण १९७२ साली अवघ्या आठ महिन्यात पूर्ण करण्यात आले. हि वास्तू उभी करताना जुन्या मंदिराची जागा अपुरी पडत होती तेव्हा मंदिराचे भक्त कै. श्रीपतराव विचारे बंधू व कै. महादेव भोसले बंधू यांनी आपली थोडी थोडी जागा श्रींच्या चरणी अर्पण करून मंदिर मोठे होण्यास हातभार लावला. या मंदिर उभारणीत तसेच सेवेत अनेक व्यक्तींचे भक्तांचे योगदान आहे. या मंदिरासाठी पूर्वीपासून कोणतेही वर्गणी पुस्तक नाही व कोणत्याही कार्यक्रमासाठी कोणाकडे वर्गणी मागितली जात नाही. असे हे आगळे वेगळे मंदिर आहे. या मंदिरात अनेकांना वेगवेगळे साक्षात्कार अनुभवण्यास आल्याचे बोलले जाते. तसेच मंदिराच्या संपूर्ण माहितीचे एक छोटे पुस्तक देखील आपणाला मंदिरात मिळते. असे हे सुंदर मंदिर गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्हाला जाणून घेण्यास मिळेल हे भाग्य. हे मंदिर कोल्हापूरकरांनी तर पाहावेच पण बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना, पर्यटकांना तसेच आपल्या स्न्हेजनांना, परिवाराच्या मंडळींना , मित्र मंडळींना देखील हे मंदिर पाहण्यास नक्की सांगावे हीचआशा.आपल्याला कैलासगडची स्वारी मंदिर हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
Keep This In Mind Before Visit Places

________________________

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top