चंदगड तालुक्यातील चंदगड-नेसरी राज्यमार्गावर चंदगडपासून 10 कि.मी. अंतरावर वळकुळी गावाचा फाटा लागतो. तेथून साधारण 3 कि.मी. अंतरावर गंधर्वगड आहे. गडाला लागूनच गाव आहे. सभासद बखरीप्रमाणे हा शिवनिर्मित गड आहे. पण शासकीय गॅझेटियरमध्ये मात्र याच्या निर्मितीचे श्रेय सावंतवाडीच्या थोरल्या फोंड सावंताच्य नाग सावंत या मुलग्यास दिले आहे. गॅझेटीयरमध्ये 1724 मध्ये नाग सावंतानी हा किल्ला बांधल्याचे म्हटले आहे. इतिहासात मात्र 15 जानेवारी 1687 मध्ये शिवराय स्वत: चार हजार सैन्यानिशी गंधर्वगडाच्या परिसरात असल्याचा उल्लेख आहे. गडावरील चाळोबाचे प्रशस्त मंदिर प्रसिद्ध आहे. मंदिराच्या भोवताली जुन्या काळातील मूर्त्या व नक्षीकाम केलेले दगड आढळतात. इतिहासकालीन आजही वापरात असलेली विहीर आहे. गडाची काही तटबंदी सुस्थितीत असून त्यामध्ये चोर दरवाजे पाहता येतात. गडावर फेरफटका मारताना मुजलेली विहीर व जुन्या इमारतींच्या चौथर्यांचे अवशेष दिसतात.