शिलाहार राजा भोज दुसरा याने साधारण इ. स. ११०० मध्ये हा किल्ला बांधला. समुद्रसपाटीपासून याची उंची २६०० फूट आहे. असून याच्या तीन बाजूंस तुटलेला कडा आहे. किल्ल्याची लांबी १६०० मीटर असून, रुंदी ९०० मीटर आहे. इ. स. १४७०मध्ये तो महंमद गावानने जिंकला. त्या वेळी ‘अल्लाच्या कृपेने रांगणा ताब्यात आला’ असे उद्गार महंमद गावानने काढले होते. त्यानंतर किल्ला विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. त्याने सावंतवाडीकरांच्या ताब्यात तो सोपविला होता. छत्रपती शिवरायांनी कोकणातील हा किल्ला घेतला. आदिलशहाने परत किल्ला घेतला, त्या वेळी महाराज आग्र्याला कैदेत होते. त्या वेळी स्वत: जिजाबाईंनी खास मोहीम काढून १५ ऑगस्ट १६६६ रोजी रांगणा जिंकला. १४ एप्रिल ते १२ मे १६६७ या काळात रांगण्याला बहलोलखान व व्यंकोजी भोसले यांनी वेढा दिला होता. परंतु शिवरायांनी जातीने येऊन हा वेढा मोडून काढला. शिवरायांनी या गडाच्या मजबुतीकरणासाठी सहा हजार होन खर्च केल्याचा पुरावा सापडतो. हा किल्ला अतिशय दुर्गम आहे. औरंगजेबालाही दख्खन मोहिमेत हा किल्ला जिंकता आला नाही. इतर किल्ले खालून वर चढून जाता येतात. हा किल्ला मात्र दरीच्या एका टोकाकडून खाली उतरत यावे लागते. युद्धशास्त्रातील ‘रणमंडळ’ या संज्ञेप्रमाणे प्रवेशद्वार परिसराची रचना आहे. ती घटकाभर थांबून समजून घ्यावी अशी आहे. या किल्ल्यावर इमारतीचे अवशेष दिसून येतात. बारमाही पाणी असलेला तलावही आहे. रांगणाई देवी, तसेच गणपतीचे मंदिरही येथे आहे. पदभ्रमण, ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी हे उत्तम ठिकाण आहे. येथे कोल्हापूर, पाटगाव, तांबडेवाडी, चिक्केवाडी या मार्गाने बसने जाता येते; पण पावसाळ्यात हा मार्ग बंद असतो. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमार्गे नारुरला येउन तिथून मस्त जंगलभ्रमंतीचा आनंद घेत गडावर जाता येते.मात्र गड विस्तृत असल्याने एक मुक्काम आवश्यक आहे.