पन्हाळगड । Panhala


पन्हाळा किल्ला हा पन्हाळगड म्हणूनही ओळखला जातो. कोल्हापूरच्या वायव्य दिशेला पन्हाळा आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगाच्या हा प्राचीन दुर्ग वसला आहे, विजापूर ते कोकण किनारपट्टीकडे जाणार्‍या रस्त्यावर देखरेख करण्यासाठी याची उभारणी झाली. त्याच्या मोक्याच्या स्थानामुळे, मराठे, मोगल आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात पन्हाळ्याचा ताबा मिळवण्यावरुन संघर्ष झाला, त्यातील पावन खिंडची लढाई सर्वात उल्लेखनीय होती. कोल्हापूर शहराची महाराणी ताराबाई यांनी तिची सुरुवातीची वर्षे घालविली. किल्ल्याचे अनेक अवशेष आजही सुस्थितीत आहेत.

                      सिद्दी जौहरने घातलेला वेढा व त्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांची सुटका, तसेच शिवा काशीद व बाजीप्रभूंच्या बलिदानाने पन्हाळा किल्ला अजरामर झाला आहे. पन्हाळा किल्ल्याचा उल्लेख इतिहासात १२व्या शतकापासून दिसून येतो. राष्ट्रकूट राज्य लयाला गेल्यावर शिलाहार प्रबळ झाले. त्यापैकी राजा भोज नृसिंह याने सन ११७८ ते १२०९ या कालावधीत हा किल्ला बांधला. त्याच्या पश्चात हा भाग सिंधणदेव या देवगिरीच्या राजाच्या अमलाखाली आला. बिदरच्या बहामनी सुलतानाचा वजीर महमूद गावान याने भर पावसाळ्यात सन १४६९मध्ये हा किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर याचा ताबा विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. या कालावधीत आदिलशहाने हा किल्ला बळकट केला. अरब जगाशी संबंध ठेवण्याच्या, तसेच व्यापाराच्या दृष्टीने या किल्ल्याचे आदिलशहाला खूप महत्त्व वाटत होते. याच वेळी इंग्रजांनी कोकणात राजापूर येथे पाय रोवण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे कोकणावर नियंत्रण ठेवण्यासाठी विजापूर सुलतानास हे ठिकाण महत्त्वाचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हीच गोष्ट लक्षात घेऊन पन्हाळा १६५९मध्ये काबीज केला.

                     सन १६६०मध्ये सिद्दी जौहरने बरेच दिवस या किल्ल्याला वेढा घालून ठेवला होता. छत्रपती शिवाजी महाराज तेथून निसटल्यावर तो त्याच्या ताब्यात आला. १६७३मध्ये कोंडाजी फर्जंदबरोबर सैन्य पाठवून भेदनीतीचा उपयोग करून छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला परत ताब्यात घेतला. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर हा किल्ला औरंगजेबाकडे आला. सन १६९२मध्ये विशाळगडाचे काशी रंगनाथ सरपोतदार यांनी पन्हाळा परत घेतला. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर १७०१मध्ये याचा ताबा औरंगजेबाकडे गेला. या वेळी औरंगजेब पन्हाळ्यावर स्वतः उपस्थित होता.त्या वेळी २८ एप्रिल रोजी इंग्रजांचा वकील सर विल्यम नॉरीस याने औरंगजेबाची गाठ घेतली. तेव्हा त्यांच्यात अत्यंत गुप्त वाटाघाटी झाल्या होत्या; पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही. काही दिवसांतच रामचंद्रपंत अमात्य यांनी धनाजी व संताजी यांच्या साह्याने हा किल्ला पुन्हा छत्रपती ताराराणी बाईसाहेबांकडे आणला. १७०७ पासून कोल्हापूर संस्थानची राजवट येथून सुरू झाली. सन १७८२मध्ये राजधानी पन्हाळ्यावरून कोल्हापूरला हलविण्यात आली.

                   थंड हवेचे ठिकाण असणारा हा किल्ला आहे. चार दरवाजामार्गे कोल्हापूर बाजूने शहरातून वाहनाने थेट किल्ल्यावर जाता येते. वारणानगर मार्गही याच रस्त्याला येऊन मिळतो. तीन दरवाजामार्गे गडावर जाण्यासाठीचा दुसरा मार्ग तीन दरवाजातून जातो. हा दरवाजा तीन मजली असून याचे बांधकाम शिसे ओतून केलेले आहे.

☘ पन्हाळगडावरील प्रमुख ठिकाणे ☘

 • वीर शिवा काशिद पुतळा : 

पन्हाळ्यावर प्रवेश करताना नगरपालिकेच्या चौकीपाशी हा पुतळा दिसतो.हाच परिसर म्हणजे चार दरवाजा.या रस्त्याने खाली उतरले कि वीर शिवा काशिद यांचे नेवापुर हे गाव दिसते. छत्रपती शिवाजी महाराज  आणि स्वराज्यासाठी वीर शिवा काशिद यांनी प्राणार्पण केले

 • वीर शिवा काशीद समाधी : 

चार दरवाज्याजवळच किल्ल्यात प्रवेश करताना दर्शन होते ते वीर शिवा काशीद यांच्या समाधीचे. (आता हा दरवाजा भग्नावस्थेत आहे.) शिवा काशीद हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिसत होते. आपण सिद्दी जौहरच्या हाती पडल्यावर जिवंत राहणार नाही, हे माहीत असूनही आपल्या राजाच्या रक्षणार्थ शिवा काशीद यांनी धोका पत्करला व प्रति शिवाजी होऊन पालखीने सिद्दी जौहरची छावणी गाठली. ही गोष्ट सिद्दीच्या लक्षात येताच शिवा काशीद यांचे शीर धडावेगळे झाले. या बलिदानाला तोड नाही. वीर शिवा काशीद अमर झाले.आपली मान येथे आदराने झुकतेच.

 • बाजीप्रभू :-

तुम्ही पन्हाळ्यात प्रवेश करताच तुम्हाला बाजी प्रभु देशपांडे यांचा आवेशपुर्ण पुतळा दिसतो. शिवाजी महाराज विशाळगडाच्या दिशेने गेल्यावर बाजीप्रभूंनी घोडखिंडीत सिद्दीचे सैन्य थोपवून धरले होते. लढाई करीत असतानाच त्यांना वीरमरण आले. त्यांच्याबरोबर संभाजी जाधव (म्हणजे प्रसिद्ध धनाजी-संताजीपैकी धनाजीचे वडील) व फुलाजीप्रभू हे बाजीप्रभू देशपांडे यांचे बंधू यांनाही वीरमरण आले.शिवाजी महाराजांनी इ. स. १६५९ साली पन्हाळा गड जिंकला होता.

 • तीन दरवाजा  : 

एकापाठोपाठ  तीन दरवाजे असून याच्या बांधकामात शिसे धातू वापरलेला दिसतो “तीन  दरवाजा” किल्ल्याच्या दुहेरी प्रवेशद्वारांपैकी एक होता . अजून दोन दरवाजे म्हणजे  “चार दरवाजा” आणि “वाघ दरवाजा”.  चार दरवाजा ब्रिटीशांनी वेढा घातला तेव्हा नष्ट झाला. हा पश्चिमेकडील सर्वांत महत्त्वाचा दरवाजा. दरवाज्यावरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे. कोंडाजी फर्जंद यांनी येथूनच अवघ्या ६० मावळ्यांनिशी हा किल्ला जिंकला होता.

 • अंधार बावडी :

जेव्हा जेव्हा सैन्याने एखाद्या किल्ल्याला वेढा घातला तेव्हा त्यांची पहिली कारवाई म्हणजे किल्ल्याच्या मुख्य पाण्याचे स्रोत विषबाधा करणे. अश्या प्रसंगावर तोड म्हणून आदिलशहानच्या काळात अंधार बावडी बनवली गेली. ही तीन मजली विहीर पन्हाळा किल्ल्यासाठी एक जल स्रोत होती.तीन दरवाज्याच्या वरच्या बाजूला माळावर तीन कमानीची, काळ्या दगडांची एक वास्तू दिसते.ही वास्तू तीनमजली आहे. सर्वांत तळाला पाण्याची खोल विहीर आहे, तर मधला मजला चांगला ऐसपेस आहे. त्यातून तटाबाहेर जाण्यासाठी खिडकीवजा चोर दरवाजा दिसतो.

 • अंबरखाना  :

 किल्ला हे लष्करी केंद्र असल्यामुळे धान्य साठवण्याची गरज असे.पन्हाळ्यासारख्या प्रचंड पसरलेल्या किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात शिबंदी असे,येथे पूर्वी बालेकिल्ला होता. याच्या सभोवती खंदक आहे. येथेच गंगा, यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्यकोठारे आहेत. सुमारे २५ हजार खंडी धान्य त्यात मावत असे. याशिवाय सरकारी कचेऱ्या, दारूगोळ्याची कोठारे आणि एक टाकसाळ येथे होती.

 • सोमेश्वर लिंग सोमेश्वर तीर्थ 

महर्षी पराशरमुनी करवीर क्षेत्री आले होते याची कथा अगस्तीमुनी माता लोपामुद्राला सांगत आहेत.पराशरमुनी यांनी गयाश्राद्ध,प्रयाग,काशी या त्रीस्थळांचे दर्शन घेऊन अष्टलिंगाचे दर्शन घेवून करवीर निवासनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले त्यानंतर करवीर पासून वायव्येस असलेला ब्रह्मगिरी पर्वत म्हणजेच आजचा दुर्ग पन्हाळा परिसर या ठिकाणी आले.पुर्वी ब्रह्मदेवांनी प्रजा निर्मिती साठी तपश्चर्या केली होती व त्या ठिकाणी सोमेश्वर नावाने शिवाचे लिंग स्थापन केले होते,सर्व तीर्थे आणून सोमालय तीर्थ निर्माण केले या तीर्थाला व गिरीला असे वरदान दिले की इथे जो कोणी तप करेल तो सर्व पापातून मुक्त होईल ज्याची कामना आहे ती पूर्ण होईल.सोमेश्वर लिंगा पासून जवळच श्री ब्रम्हेश्वराचे शिवलिंग आहे.महर्षी पराशरमुनींंनी श्री सोमेश्वराची पूजा करून तिथे एक आश्रम बांधला पत्नी सत्यवती सह राहू लागले अशी कथा करवीर महात्म्य अध्याय क्रमांक नववा व अठरावा या मध्ये आहे.शिवछत्रपती श्री शिवाजी महाराजांनी श्री सोमेश्वराची पूजा केली व शिवलिंगाला फुले वाहिली आहेत.कोल्हापूर पासून सोमेश्वराचे मंदिर साधारण 18 ते 19 किलोमीटर अंतरावर आहे,हे मंदिर तहसील कार्यालयाच्या समोर आपल्याला पाहता येईल. प्राचीन असे हे मंदिर आहे,मुख्य रस्त्याच्या साधारण दहा ते पंधरा फूट खाली हे मंदिर आहे व शेजारीच सोमेश्वराचे तीर्थ आपल्याला पहायला मिळेल.पायरया उतरून आपण मंदिरांमध्ये पोहोचतो.मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला नंदी व स्वतंत्र शिवाचे लिंग दिसते,मुख्य गाभार्‍यात श्री सोमेश्वराचे शिवलिंग आहे. मुळ मंदिर आहे तसे ठेवून मंदिराची इतर डागडुजी केली आहे.प्राचीन मंदिर व या परिसरामध्ये अनेक तिर्थे यांची अनुभूती घेण्यासाठी कोल्हापूर पासून काहीच अंतरावर असल्यामुळे हे मंदिर व येथील तिर्थे अवश्य पहावे.

 • रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी :

 सोमेश्वर तलावापासून थोडे पुढे गेल्यावर दोन समाध्या दिसतात. त्यातील उजवीकडची समाधी रामचंद्रपंत अमात्यांची व बाजूची त्यांच्या पत्नीची आहे.

 • रेडे महाल : 

समाधीच्या बाजूला एक आडवी इमारत दिसते. त्यास रेडे महाल म्हणतात. वस्तुतः ही घोड्यांची पागा होती; मात्र त्यात नंतर जनावरे बांधत. म्हणून त्याला रेडे महाल म्हणत

 • वाघ दरवाजा : 

हे किल्ल्याचे अजून एके प्रवेशद्वार आहे.एखाद्या वाघासारखाच हा दबा धरुन बसला आहे

 • तबक उद्यान पक्षी अभयारण्य :

 येथे तुम्हाला विविध प्रकारचे पक्षी देखील आढळतील. येथे ५ रु. प्रवेश फी आहे. ईथे नक्की भेट द्या. गार्डन मध्ये लहान मुलांसाठी खेळ आहेत. तसेच पन्हाळा किल्ल्याची प्रतिकृती येथे केली आहे. विविध प्रकारची वृक्ष ईथे बघायला मिळतील. नगरपालिकेचा दर्जा मिळाल्यावर (सन १९५४) पन्हाळ्यावर बगीचे विश्रामगृह, तबक उद्यान, नेहरू उद्यान, नागझरी ही ठिकाणे विकसित करण्यात आली आहेत. तबक उद्यान वनखात्याच्या अखत्यारीत असून, शासनाने विकासाकरिता ८२ लाख ७८ हजार रुपये मंजूर केले आहेत.

 • दुतोंडी बुरुज :

  एकाच बुरुजात एकमेकाला चिकटून दोन बुरुज अशी वैशिष्ट्यपुर्ण याची रचना आहे.

 • सज्जा कोठी :

इ.स. १५०० मध्ये इब्राहिम आदिल शाह यांनी बांधलेली सज्जा कोठी ही दुमजली इमारत आहे.  खाली दरी पाहता यावी आणि शत्रूवर नजर राहावी म्हणून सज्जा कोठी बांधली गेली.राजवाड्यावरून पुढे गेल्यावर ही कोठीवजा इमारत दिसते. ही कोठी इब्राहिम आदिलशाह यांनी सन १५००च्या सुमारास मुघल शैलीत बांधली. याच ठिकाणी शिवाजी महाराजांनी संभाजी महाराज  मोघलांकडून परत आल्यावर त्यांची भेट घेतली.याच इमारतीत संभाजी राजांना शिवाजी महाराजांनी स्थानबद्ध केले होते. महाराजांच्या मृत्यूची बातमी येताच ते येथूनच निसटले व रायगडाकडे गेले होते. शिवरायांची गुप्त खलबते येथेच चालत.

 • कलावंतिणीचा महाल :

आदिलशाहीच्या ताब्यात हा किल्ला असताना रंग महल  म्हणून याचा  वापरण्यात आला होता.

 • राजदिंडी :

 पश्चिम बाजूने ही दुर्गम वाट गडाखाली उतरते. याच वाटेचा उपयोग करून शिवाजीमहाराज सिद्दी जौहरच्या वेढ्यातून निसटले. म्हणून याला राजदिंडी असे नाव पडले. येथून ४५ किलोमीटर अंतरावरील विशाळगडावर जाणारी एकमेव वाट आहे. याच दरवाज्यातून महाराज विशाळगडावर पोहोचले.

 • राजवाडा :

 हा छत्रपती महाराणी ताराबाईंचा वाडा असून, प्रेक्षणीय आहे. यातील देवघर बघण्यासारखे आहे. आज यात नगरपालिका कार्यालय, पन्हाळा हायस्कूल व मिलिटरी बॉइज हॉस्टेल आहे.

 • महालक्ष्मी मंदिर :

राजवाड्याजवळील नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजूस महालक्ष्मी मंदिर आहे. हे गडावरील सर्वांत प्राचीन मंदिर आहे. ते साधारण १००० वर्षांपूर्वीचे असावे, असे त्याच्या बांधणीवरून वाटते. राजा गंडारित्य भोज याचे हे कुलदैवत होय.

 • संभाजी मंदिर : 

ही एक छोटी गढी असून, येथे संभाजी मंदिर आहे.

 • धर्मकोठी   :

संभाजी मंदिरापुढे गेल्यावर ही एक झोकदार इमारत दिसते, ती धर्मकोठी. येथून गरिबांना दानधर्म केला जात असे. सरकारमधून धान्य आणून येथे यथायोग्य दानधर्म करत.

 • पराशर गुहा :

 पराशर मुनींची गुहा येथे आहे.यालाच लगुडबंद असे म्हणतात. एकाच्या आत एक अश्या पाच खोल्या असलेल्या या ठिकाणी महर्षी पाराशर यांचा निवास होता, असे सांगतात. करवीर पुराणात यांचा उल्लेख पन्नगालय म्हणजे सर्पांचे निवासस्थान असा येतो. महाराष्ट्राचे आद्यकवी मोरोपंत यांनी येथेच त्यांचे काव्यलेखन केले, असेही सांगितले जाते.पन्हाळ्याच्या दक्षिण टोकावर हे ठिकाण आहे.ईथून पुढे काली बुरुज आणि सुप्रसिध्द गायिका लता मंगेशकर यांचा बंगला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top