श्री क्षेत्र नृसिंहवाडी । Narsihvadi

कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी हे एक प्रसिध्द तीर्थक्षेत्र आहे. नृसिंहवाडी म्हणजे दत्तसंप्रदायची राजधानीच. कृष्णा-पंचगंगेच्या संगमावरती वसलेले कोल्हापूर जिल्ह्यातील छोटेसे गाव नृसिंहवाडी. श्री क्षेत्र नरसोबावाडी म्हणूनही या देवस्थानाची ख्याती आहे. पुरातन काळी इथे घनदाट जंगल होते. नरसिंह सरस्वती स्वामी हे भगवान दत्ताच्या १६ व्या अवतारांमधील एक. कुरूंदवाड ही त्यांच्या तपश्चर्येची जागा. इ. सन १०३४ ते १९८२ या दीर्घ कालावधीमधे, रामचंद्र योगी, नारायण स्वामी, मौनी महाराज, टेंबे स्वामी, महादबा पाटील या तपस्वी जनांच्या समाधी ‘वाडी’ येथे बांधल्या गेल्या. हया ठिकाणी कृष्णा-पंचगंगेच्या संगमावरती असलेल्या मंदिरास ५०० ते ६०० वर्षांची परंपरा लाभली आहे.
     श्री दत्तगुरूंच्या अवतारामुळे नृसिंहवाडीचा परिसर पावन झाला असून, त्यांच्या स्वयंभू पादुकांची पूजा अर्चा येथे अखंड सुरू असते. ‘श्रीपादश्रीवल्लभ’ हा श्रीगुरू दत्तमहाराजांचा पहिला अवतार तर ‘नृसिंहसरस्वती’ हा ‘दुसरा अवतार’ समजला जातो. श्री दत्तगुरूंचे साक्षात तिसरे अवतार मानले गेलेले श्री नृसिंह सरस्वती यांनी औदुंबर वृक्षांनी बहरलेल्या या अरण्यभूमीत १२ वर्षे वास्तव्य केले व त्यांनीच हा परिसर सुफल करून सोडला.
     अमरापूर या नावाने या क्षेत्राचा महिमा गुरू चरित्रात वर्णिलेला आढळतो. श्री नृसिंहसरस्वती औदुंबरचा चातुर्मास संपवून भ्रमंतीस निघाले असता संचार करता करता ते याठिकाणी येऊन पोहोचले. त्यावेळी या ठिकाणी औदुंबर वृक्षाची बनेच बने होती. दत्तभक्तांच्या आग्रहपूर्वक विनंतीवरून स्वामींनी आपले पुढील वास्तव्य येथेच केले. सुमारे १२ वर्षे नृसिंह सरस्वती स्वामींे वास्तव्य याच ठिकाणी होते व त्याचमुळे या क्षेत्राला नृसिंहवाडी अर्थात नरसोबावाडी असे नामाभिधान प्राप्त झाले. स्वामींनीच या ठिकाणी श्री दत्त पादुकांची स्थापना केली. या क्षेत्राला कृष्णा-पंचगंगेच्या संगमामुळे व औदुंबर वृक्षांच्या घनदाट छायेमुळे मुळातच एक प्रकारची प्रसन्नता आलेली होती. त्यातच स्वामींच्या वास्तव्यामुळे त्यात आणखीनच पावित्र्याची भर पडली, येथील आकर्षकता वाढण्यास मदत झाली.याठिकाणी तपश्चर्या केल्यानंतर ते औदुंबर, गाणगापूर आणि त्यानंतर कर्दळीवनात गेले आणि त्याच ठिकाणी त्यांनी अवतारसमाप्ती केल्याचा पुराणात उल्लेख आढळतो. दत्त माऊलींच्या स्पर्शाने पुनित झालेल्या या क्षेत्राची ख्याती सर्वदूर पसरली आहे. दररोज हजारो भक्तगण महाराजांच्या पादुकाचरणी नतमस्तक होतात. दोन नद्यांच्या संगमामुळे विस्तारलेले नदीचे पात्र, संथ पाण्यामधील नौकाविहार, स्वच्छ-सुंदर घाट, नदीपात्राला लागून वसलेल्या मंदिरामध्ये सुरू असणारा घंटानाद, अखंड नामजप… असा माहोल भक्तगणांना भारावून टाकतो.
        नृसिंहवाडीचे क्षेत्र कृष्णा व पंचगंगा या दोन नद्यांच्या मधोमध सुमारे एक चौरस मैल परिसरात पसरले आहे. गावची लोकसंख्या सुमारे चार हजारापर्यंत आहे. कृष्णेच्या प्रशस्त अशा घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली सुंदर व मनोरम असे मंदीर आहे. मंदिरातच स्वामींनी स्थापन केलेल्या दत्तपादुका आहेत. वाडीहून गाणगापूरला जाताना योगिनींच्या आग्रहावरून स्वामींनी वालुकामय पाषाणाच्या या पादुकांची स्थापना केली. त्यावरील सततच्या अभिषेकाने त्या झिजत नाहीत. म्हणून त्याची घडण चंद्रकांत पाषाणाची असावी असे म्हणतात.
          सांप्रत उभे असलेले मंदीर विजापूरला अदिलशहा या मुसलमान बादशहाने बांधले आहे. विजापूरच्या बादशहाच्या मुलीचे डोळे गेल्यामुळे तिला अंधत्व आले. तेव्हा बिदरच्या बादशहाच्या सांगण्यावरून बादशहा नृसिंहवाडीस आला. त्याने श्री गुरूंचे दर्शन घेतले व नवस बोलला. पुजाऱ्याने अंगारा दिला तो त्याने मुलीच्या डोळयाला लावला असता, तिला दृष्टी प्राप्त झाली. त्यामुळे बादशहा आनंदित झाला. त्याने कृष्णेच्या पैलतीरावरील औरवाड व गौरवाड ही दोन गावे देवस्थानच्या पूजेअर्चेसाठी इनाम दिल्याची नोंद आढळते. सध्या उभे असलेले श्री गुरुमंदीर विजापूरच्या मुसलमान बादशहाने बांधले असल्याने त्यावर कळस नाही, तर लांबट आकाराची उंच अशी वास्तू आहे आणि त्यासमोरच कृष्णेचा विस्तीर्ण घाट व कृष्णा नदी संथ वाहत आहे. याहून विशेष म्हणजे श्रींच्या पादुकांवरील वस्त्रही त्याच रिवाजाचे आहे. याचाच अर्थ गुरूचरित्रात उल्लेख असल्याप्रमाणे सर्व जातीधर्माचे लोक याठिकाणी एकाच भावनेने एकत्र येतात. श्रीजनार्दन स्वामींच्या आज्ञेवरून एकनाथ महाराजांनी याठिकाणी घाट बांधला आहे. हा घाट पाहण्याजोगा आहे. येथील साधुसंतांच्या समाध्या आणि छोटी-छोटी मंदिरे पाहताना मन प्रसन्न होते.
        मधोमध श्रीगुरू ज्या औदुंबर वृक्षाखाली बसत असत तो वृक्ष आणि त्याखाली कृष्णा नदीसन्मुख त्या मनोहर पादुका आहेत व त्यापुढे थोडी मोकळी जागा आहे. त्याच ठिकाणी पुजारी बसतात व आतील गाभाऱ्यात पादुकांचे पूजन करतात. या गाभाऱ्याचे दार अतिशय लहान आहे. पादुका ज्या सभागृहात आहेत त्याच्या दर्शनी भागावर चांदीचा अलंकृत पत्रा मढविला आहे. मधोमध गणेशपट्टी, त्यावर आजूबाजूला मयूर व जय-विजय आणि त्यांच्या वरील बाजूस नृसिंह सरस्वती महाराजांची प्रतिमा उठवलेली आहे. पुजारी येथे आसनस्थ होऊन पूर्जा-अर्चा करतात, त्यांच्या एका बाजूला श्रीगणेशाची भव्य मूर्ती स्थापिली असून तिचीही पूजा होते.
       या मंदिराचे आणखी एक वैशिष्ठ म्हणजे केवळ त्रिकाळपुजेवेळीच मंदिरामध्ये झांज किंवा घंटा वाजते. इतरवेळी‍ ही वाद्ये वाजवायची नाहीत असा नियम आहे. भक्तगणांना एकचित्ताने ध्यान, जप करता यावा, असे यामागचे कारण असावे. पौर्णिमेला हजारो भक्तगण दर्शनासाठी लोटतात. नित्य उपासनेमधे सोन्याचा मुकुट मूर्तीला घालून, पाने ग्रहण करण्याचा विधी असलेली, रोज पहाटे होणारी ‘महापूजा’ पाहण्यासारखी असते. चातुर्मास वगळता रोज रात्री देवाच्या पालखीची मिरवणूक निघते. हया मिरवणूकीच्या पूर्वी निरनिराळया मंत्रांचे उच्चारण होते, तेंव्हाचे मंगल, धार्मिक वातावरण प्रभावशाली असते.
    पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या ‘भक्त मंडळा’मार्फत, हया मंदिराची सर्व व्यवस्था ठेवली जाते. दत्त संप्रदायाच्या वस्तूंची दुकाने तसेच मिठाईची दुकाने नरसिंहवाडीला आहेत.  कान्यगत अवसर असताना, तसेच प्रत्येक पौर्णिमेस इथे जत्रा भरते. पंचक्रोशीतील लोक पायी चालत येऊन पादुकांचे दर्शन घेतात. शनिवार हा दत्तमाऊलींचा जन्मदिवस असल्याने शनिवारीही गर्दी होते. दत्तजयंतीच्या दिवशी तर लाखो लोकांची उपस्थिती असते. दत्तमाऊलींचे स्थान म्हटले की श्वान आलेच, त्याचप्रमाणेच याठिकाणीही श्वानांचा मुक्तसंचार असतो. भक्तगण त्यांना खाऊ-पिऊ घालतात. वाडीचे पेढे, कवठाची बर्फी आणि बासुंदी तर प्रसिध्दच आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top