२०० ते ८०० फूट रूंद अशा वेगवेगळ्या १० पठारांचे मिळून बनलेले मसाई पठार हे पाचगणीच्या टेबल लँड पेक्षाही मोठे आहे.पन्हाळ्यापासून अवघ्या सात किलोमीटरवर असणाऱ्या या पठारावर जाण्यासाठी बुधवारपेठ, आपटी, म्हाळुंगे मार्गे जावे लागते.मसाई पठाराला जाताना जंगलातून जावे लागते.पूर्वी या ठिकाणी शाहूकालीन चहाचे मळे होते.थोडा घाट चढून वर गेले की म्हाळुंगे गावातून मसाई पठारावर पोहोचता येते. हिरव्यागार गवताची शाल पांघरलेल्या मसाई पठारावर वारे प्रंचड वेगाने वाहते.वाहनांच्या मळलेल्या वाटांवरूनच मार्ग शोधावा लागतो.पठारावर मसाई देवीचे छोटेसे एक मंदिर आहे मसाई देवीच्या नावावरून या पठाराला मसाई पठार नाव पडले आहे.पठारावर जांभ्या दगडात खणलेले जुने तलाव देखील आहेत.एका बाजूला इसवी-सन पूर्व तिसऱ्या शतकातील पांडवकालीन लेणी आहेत.पावसाळ्या मध्ये पठारावर विविध प्रकारच्या ५० ते ६० अल्पजीवी वनस्पती उगवतात यामध्ये किटकभक्षी वनस्पती, रानतेरडा, गेंदफूल, कंदील फूल, सोनकी फूल,ग्राउंड ऑर्किड आढळतात.याचबरोबर ५० प्रकारचे विविध पक्षी पाहायला मिळतात.छत्रपती शिवाजी महाराज हे विशालगड ला जाताना याच मार्गे गेले होते.जुलै महिन्यात विविध संस्था या पन्हाळा - पावनखिंड मोहिम आयोजित करतात यामुळे या महिन्यात अनेक पर्यटक येत असतात.