सात कल्पांमध्ये ( 4 युगाचे एक कल्प ) सात वेगवेगळ्या नावांंना धारण कारणारे क्षेत्र अनादी काळापासून श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. ज्या ज्या लोकांची येथे राज्य होते त्यावरूनच या क्षेत्राला ब्रम्हालय,शिवालय,यक्षालय,पद्मालय,राक्षसालय, करवीरालय अशी नावे मिळाली.अखेरीला कोल्हासुर वधानंतर या क्षेत्राला कोल्हापूर असे नाव प्राप्त झाले.
पंचगंगा काठावर ब्रह्मपुरी येथे झालेल्या उत्खननात इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील या वस्तू सापडल्या.1947 साली सांकलिया यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उद्यानात अनेक रोमन आणि ग्रीक बनवण्याच्या वस्तू सापडल्या त्या आजही टाऊन हॉल वस्तुसंग्रहालयात आपण पाहू शकतो.याचा अर्थ 2300 वर्षांपूर्वी कोल्हापूरचा व्यापार या देशांची होत होता असा अंदाज करता येतो.त्या काळात क्रूर राजांची राजवट होती त्यानंतर बदामीचे चालुक्य,शिलाहार आणि मग 12 व्या शतकाच्या सुमारास यादव राजांची राजवट होती. तेव्हापासून स्वराज्यस्थापनेपर्यंत येथे इस्लामी सत्ता होती.छ. शिवाजी महाराजांच्या निर्वाणानंतर 1750 त्यांच्या सूनबाई मोगलमर्दिनी रनरागिनी मर्दिनी ताराराणी यांनी स्वतंत्र करवीर सिंहासनाची स्थापना केली. त्यावेळेस राजधानी पन्हाळावर होती.ती 1785 साली कोल्हापूरात आणली आणि तिथून पुढे करवीरच्या इतिहासाची सुवर्ण सुरू झाले.
कागलच्या घाटगे घराण्यात छ. शाहू महाराजांचा जन्म झाला त्यांचे मुळ नाव यशवंत. ते चौथे शिवाजी महाराजांनंतर ते करवीर सिंहासनाला दत्तक आले. ते सिंहासनाधिष्ठीत झाले आणि करवीरच्या भाग्याचा सूर्य आकाशात तेजाने तळपू लागला.
मूळचं हे जगदंबेचे स्थान,आदिशक्तीचं हे नगर यश,कीर्ती,वैभव,विद्या,कला,क्रीडा,
अनेक लोकोपयोगी कल्याणकारी निर्णय घेणारा छत्रपतींनी स्वातंत्र्य आधीच लोकशाही प्रणाली या संस्थानात राबवायला प्रारंभ केला. सन 1947 आली भारत स्वतंत्र झाल्यावर श्रीमंत शहाजी महाराज यांनी आनंदाने संस्थान विलीन केल आणि तेव्हापासून करवीर संस्थान भारताचा भाग झाले.
पौराणिक इतिहास
श्री क्षेत्र करवीर हे जगदंबेच आवडत लिला विहार स्थान. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तीन रुपात आदिशक्ती या क्षेत्रात निवास करते.असं म्हणतात की, विश्वाच्या निर्मितीनंतर ती श्री विष्णुनी स्वतः काशी आणि करवीराची निर्मिती केली. पूर्वी एकदा भगवान शंकर आणि देवीमध्ये आपआपल्या क्षेत्राच्या मोठेपणाबद्दल वाद निर्माण झाला. तेव्हा भगवान विष्णूने तराजू घेऊन या दोन्ही क्षेत्रांची तुलना केली तेव्हा करवीर क्षेत्र एक जव एवढ्या भारानं श्रेष्ठ ठरलं. त्याचे कारण हे की, करवीर क्षेत्री मृत्यूनंतरचा मोक्ष तर आहेच पण जगण्याची समृद्धी म्हणजे भुक्तीसुद्धा आहे. या क्षेत्राला कोल्हापूर नाव मिळण्यामागची कथा अशी –
ब्रह्मदेवास गय, लवण आणि कोल्ह हे तीन मानसपुत्र. त्यातील गयासुराचा अंत उत्तर भागात गया क्षेत्री झाला. लवणासुर विदर्भात लोणार सरोवराजवळ मारला गेला.तर त्याच्या बंधुला म्हणजे कोल्हासुराला ब्रह्मदेवांनी केशी राक्षसाबरोबर युद्ध करण्यासाठी राक्षसालयात म्हणजे आताच्या कोल्हापुरला पाठवले.केशी बरोबरचे युद्ध जिंकून कोल्हासुर इथला राजा झाला.कोल्हासुराची पत्नी कदंबा (हिच्या नावानेच कळंबा गाव वसले) हिला चार पुत्र झाले.करवीर, विशाल, कुलांधक आणि लज्जासूर. या चार पुत्रांकडे राज्य देऊन कोल्हासूर वनात तपाला बसला. इकडे असूर धर्माला अनुसरून या चार पुत्रांनी प्रजेला त्रास द्यायला सुरवात केली. तेव्हा भगवान शंकरानी आताच्या डाकवे गल्ली करवीरासुराचा वध केला व त्रिशुल शिंगोशी मार्केटजवळ कोष्टी गल्लीत ठेवले त्यामुळे तेथे करवीरेश्वर व शूलेश्वर ही लिंगे स्थापन झाली.व त्याच्या नावाने या गावाला करवीर नाव दिले. विष्णूंनी शिंगणापुरात विशालासुराचा वध केला. तिथे विशालतीर्थाची निर्मिती झाली. ब्रह्मदेवांनी लज्जासूर व इंद्राने कुलांधकाचा वध केला.
आपले चारही पुत्र देवांनी मारले याचा राग येऊन कोल्हासूर परत आला. त्याने पुन्हा देवीचे तप केले आणि १०० वर्षांचे राज्य मागून देवीला या क्षेत्रातून जाण्यास सांगितले. कोल्हासुराला वर देऊन देवी करवीर सोडून हिमालयात गेली. (कदाचित वैष्णोदेवी हेच ते क्षेत्र असावे कारण तिथेही तिन्ही देवींच्या पिंडी आहेत.)त्यानंतर कोल्हासुराने १०० वर्षे इथल्या प्रजेला अतिशय त्रास दिला.हे पाहून देवांनी श्री महालक्ष्मीला साकडे घातले ती हिमालयातून देव केदारेश्वर, महर्गलेश्वर, उज्वलांबा अशा ९ कोट संख्या आणि भैरवांना घेऊन निघाली.करवीर क्षेत्राच्या सीमेवर म्हणजे श्रीयालय (३२ शिराळे) गावी राहिली. १०० वर्षांची मुदत संपताना देवी कात्यायनी तिला नगरीत आणण्याकरता सामोरी गेली या आनंदात तिने जिथे मंगलवाणे वाटली तिथे मांगले गाव वसले.
कोल्हासुराने करवीरच्या चार दिशांना चार असूर नेमले हाते. पूर्वेला रक्तलोल, दक्षिणेला रक्तबीज, पश्चिमेला रक्ताक्ष आणि उत्तरेला रक्तभोज.
देवीने करवीर क्षेत्रावर पूर्वेकडून आक्रमण केले. पूर्वेच्या रक्तलोलाला मारुन देवी उजळाई अर्थात उज्वलांबा देवीने करवीर भागात क्षेत्राच्या रक्षणाची जबाबदारी घेतली. या पर्वतामध्ये त्रिशूलाने गुहा करून महालक्ष्मीने सर्व सैन्याला आश्रय दिला. दक्षिणेच्या रक्तबीजाचा वध भैरव आणि कात्यायनीने केला. पश्चिमेचा रक्ताक्ष, सिद्ध म्हणजे गणपती आणि बहुकभैरवाच्या हातून मारला गेला.उत्तरेचा रक्तभोज मारण्यासाठी ब्रह्मा, विष्णु, महेश जगदग्नीचा रवांश अर्थात क्रोधांश आणि सूर्याचे तेज यांचा एकत्रित अवतार धारण करणाऱ्या देव केदार अर्थात ज्योतिर्लिंगाचे आगमन झाले. त्यांची शक्ती असणाऱ्या चोपडाई अर्थात चर्पटांबेने रक्तभोज मारला.देव केदारांनी रत्नासुराचा वध केला.अशा सर्व असुरांचा संहार करत श्री महालक्ष्मी करवीरात प्रवेश करती झाली.
सर्व देवांनी कोल्हासुराबरोबर घनघोर युद्ध केले. सर्व देवांना कोल्हासूर भारी पडला. शेवटी भगवान शंकर यांच्या युद्ध कौशल्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला वरदान मागायला सांगितले.त्यावेळेस जगदंबेने माझ्यावर राग न धरता १८ हाताचे प्रचंड रुप धारण करून माझा देहनाश करावा अशी इच्छा कोल्हासुराने मागितली.त्याप्रमाणे जगदंबा १८ हाताचे महालक्ष्मी रुप घेऊन आली. (याच रणचंडिका रुपाला आराधी लखाबाई म्हणतात) अखेरीला अश्विन शुद्ध पंचमीला कोल्हासूराचा वध झाला. मरतेसमयी त्याने तीन वर मागितले. एक या क्षेत्राला माझे नाव असावे दुसरा माझ्या बंधूच्या नावाने या क्षेत्राला गया क्षेत्राचे पावित्र्य यावे आणि तिसरा म्हणजे दरवर्षी तू माझ्या नावाने कोहळा बळी द्यावास. त्याप्रमाणे या नगराला कोल्हापूर नाव मिळाले.या रणसंग्राम लक्ष्मीतीर्थाच्या काठावर म्हणजे आताच्या आयोध्या टॉकीज परिसरात झाला. तिथे जवळच गया गदाधराचे मंदिर आहे. तिसऱ्या वरानुसार दरवर्षी अश्विन शुद्ध पंचमीला त्र्यंबुली पुढे कोहळा फोडला जातो.
क्षेत्र करवीर हे अतिशय पावन क्षेत्र आहे. येथे पद्माळा तीर्थाच्या काठावर श्री नरसिंह, कात्यायनी जवळ श्री परशुराम, रावणेश्वर परिसरात श्री राम जानकी आणि करवीरात अनेक ठिकाणी भगवान श्रीकृष्णांचा पदस्पर्श झाला आहे. भगवान विश्वेश्वर महादेव काशी सोडून करवीरी आले ते श्री महालक्ष्मीच्या उजवीकडे राहून भक्तांना मोक्ष देतात. ब्रह्मदेवांचेसुद्धा एक मूर्तीसह मंदिर पंचगंगा तीरावर आहे.कपिलेश्वर भगवान तर कोल्हापुरचे ग्रामदैवत, कर्दम, अनुभुती, लोपामुद्रा, अगस्ती, पराशर, सत्यवती अशा अनेक ऋषी दांपत्यांच्या वास्तव्याने ही नगरी सुशोभित झाली आहे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे माता अनुसयेचे करवीर हे माहेरघर.त्यामुळे स्मर्तृगामी भगवान दत्तात्रेय न चुकता माध्यान्ही करवीरात भिक्षेला येतात.
अशा या करवीर क्षेत्राच्या निव्वळ स्मरणानेदेखील भक्तगण करवीर निवासाचे पुण्य पावतील असे श्री महालक्ष्मीचे वचन आहे.