आली गौराई पाहुणी

व्रतप्रिय अशा आपल्या समाजात एक फार छान गंमत आहे पुरूष कर्तृक व्रतात विशेष असे पाठभेद बघायला मिळत नाहीत पण जी व्रत नारी कर्तृक अर्थात स्त्रीया करतात त्यातले प्रथा परंपरा यातले भेद शोधायला गेलं तर एक मोठा प्रबंध तयार होईल‌ संस्कृती ची जपणूक ही स्त्रीयांनी सांभाळलेली एक अलवार बाजू. त्यांच्या या मायापाशातून देव ही सुटत नाहीत. आणि त्यात जर ती पार्वती सारखी मानिनी देवता असेल तर काय बोलायचं?
वास्तविक भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर जेष्ठा गौरी च आगमन होतं. आता ही गौरी कोण आणि तिचं रूप कसं हे प्रांतवार निराळं असतं त्याची आपण गंमत बघू.
पश्र्चिम महाराष्ट्र विशेषतः कोल्हापूर भागात या दिवसात येणाऱ्या तेरड्याची पूजा गौरी म्हणून होते. इथं गौरी म्हणजे गणपतीची आई ती एकटी येत नाही तिच्याबरोबर तीची थोरली बहीण आणि धाकटी सवत गंगा येते‌ . पाणवठ्यावर जाऊन भरलेल्या कळशीत सात खडे टाकून त्यावर चाफ्याच्या पानांनी बांधलेला तेरड्याचे डहाळे ठेवायचे. पाणवठ्यावर पान सुपारी काकडीचे काप हळदीकुंकू वाहून वाजत गाजत घरी यायचं. ती येतानाच गाणी म्हणत खेळत येते. अपवाद म्हणून काही घरात ती तोंडांत पाण्याची गुळणी धरून मौन धरून येते पायावर पाणी घालून ओवाळून आत घेतली की चूळ भरून बोलते. सगळ्या घरात फिरत मग शेवटी ठरलेल्या जागी बसते तिच्या फेरीच्या मार्गावर हळदीकुंकवाचे पायाचे ठसे उठवलेले असतात. विशेषतः देशस्थ ब्राह्मण घरात सुगडाच्या गौरी असतात. त्यातली एक गौर श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी च बसलेली असते. इतर सर्व घरात आजच दोन्ही गौरी येतात. गौरीचा उल्लेख बोलीभाषेत गौर किंवा गवर असा होतो. गाण्यात गवराबाई हे मुख्य पात्र . गौरी आल्या की त्यांना मिसळ पालेभाजी म्हणजे शेपू भोपळी चवळी तांदळी पातरी अशा सगळ्या पाल्याची एकत्र भाजी फळभाजी एखादी . अळूची किंवा पाटवडी भाकरी असा शिदोरीचा नैवेद्य दाखवतात.आमच्या ओळखीच्या एका घरी तर गौरी भाकरी खाऊन झोपवतात ( अक्षरशः डहाळे काढून आडवी झोपवतात ) आणि मग उन‌ खाली आलं की चहा पण देतात. थोडक्यात एक सासरी नांदणारी लेक माहेराला आली की काय करेल ते सगळं गौराई साठी करायचं.


कराड सातारा भागात साधारण अशीच पद्धत पण तुळजापूर सोलापूर भागापासून पुढे अगदी पार विदर्भा पर्यंत यांना महालक्ष्मी म्हणतात. इथं त्या गणेशाची माता शिवपत्नी नसतात तर विष्णू पत्नी लक्ष्मी आणि तीची जेष्ठ म्हणजे थोरली बहीण अलक्ष्मी मानतात. इकडे तेरडा सुगड नसतो इकडे त्यांचे पिढ्यानपिढ्या सांभाळलेले मुखवटे असतात. अलक्ष्मी खरंतर अमंगला पण या दिवसात तिचं पूजन करतात. अशा या दोघी बहिणींसोबत त्यांची बाळं पण बसवली जातात. जेष्ठा नक्षत्रावरच त्यांच पूजन आणि मुख्य सोहळा म्हणजे सवाष्ण भोजन.
कोकणातही तेरड्याची गौर येते आज गौरा आली संध्याकाळ होईल तशी तिला नटवायची घाई होते मग परंपरेने चालत आलेल्या पद्धतीनं नवे साज चढवून गौरा नटून उभी राहते आणि तिला बघून आयाबायांचा जीव सुखावतो.

श्रीमातृ चरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीकः

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top