श्री.छत्रपती संभाजी नगर तरुण मंडळ

मंगळवार पेठ

स्थापना - १९६०

रजिस्टर नं - F ८०७८

अध्यक्ष - श्री. अजित सासने

                श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ हे कोल्हापुरातील एक जुने व नाविन्यपूर्ण मंडळ आहे. या मंडळाच्या वतीने सुरुवातीपासूनच अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात व पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो.या मंडळाचे कार्य स्वातंत्र्यपूर्व काळात १९४० पासून आहे. १९४० सालापासून मंडळाच्या वतीने सार्वजनिक श्री गणेशोत्सव साजरा केला जातो. १९६० साली सहकारी तत्त्वावरील चालणारे मंडळ म्हणून अशी मंडळाची नोंदणी झाली. पुर्वी आतल्या गल्लीत असणाऱ्या मंडळाच्या इमारतीमध्ये गणपतीची स्थापना होई. सन १९८१ पासून संभाजीनगर चौकामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व भव्य प्रमाणात साजरा करण्यात येऊ लागला. माजी नगरसेवक स्व. बाबासो सासने यांनी  सहकाऱ्यांच्या साथीने हे मंडळ नावारुपाला आणले.

या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे मंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंत मंडळाची मूर्ती शाडूपासूनच तयार केली जाते. मंडळाच्या वतीने वर्गणी मागितली जात नाही. भाविकांनी स्वेच्छेने दिलेल्या लोकदेणगीतूनच सर्व उत्सव साजरे केले जातात. सध्या गणेश मूर्तीची उंची सव्वासात फुट आहे. मंडळाच्या वतीने संभाजीनगर चौकामध्ये वाहतुकीला अडथळा न करता भव्य मंडप उभारला जातो. दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारची आकर्षक सजावट केली जाते. मागच्या तीन वर्षापासून गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशीच मंडळाच्या वतीने गणेशमूर्ती आणली जाते. गणेश आगमनावेळी पारंपारिक धनगरी ढोल, झांजपथक, लेझीम पथक आणले जाते. मूर्ती चौकामध्ये आल्यानंतर स्थानिक लोकांकडून मूर्तीची भक्तीभावाने पुजा केली जाते. स्त्रियांच्या वतीने पाणी वाहिले जाते. यानंतर मंडळाच्या मंडपात मूर्ती बसवली जाते. फिल्मी गीते न वाजवता भक्तीगीतांच्या तालावर १० दिवस भक्तीभावाने बाप्पाची पुजा केली जाते.

मंडळाचे अजून एक वैशिष्ट म्हणजे मंडळाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते रोज रात्री ठीक ८ वाजता आरती केली जाते. जर मान्यवर यावेळी वेळेवर उपस्थित राहिले नाही, तरीही आरतीच्या वेळेस बदल केला जात नाही. आरतीसाठी हजारो भाविक उपस्थित असतात. यामुळे गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी , महिलांची सुरक्षा, गैरवर्तणूक टाळण्यासाठी या सर्व गोष्टी लक्षात घेता मंडळाच्या वतीने स्वखर्चाने सिक्युरिटी गार्ड तैनात करतात. तसेच संपूर्ण परिसर हा सी.सी.टी.व्ही. नियंत्रणाखाली असतो. मंडळाच्या वतीने १० दिवस अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. यामध्ये मोफत रोपवाटप, स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी भजनी मंडळे, तसेच विविध भाव भक्तिगीतांचे कार्यक्रम सादर केले जातात. या गणेश मूर्तीला भाविक भक्ती भावाने नारळाचे तोरण अर्पण करतात. साधारण नारळाची तोरणे ३ ट्रक भरतात. ते नारळ प्रसाद म्हणून वाटले जातात. अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी मंडळाच्या वतीने होमहवन केले जाते व प्रसादाचे वाटप केले जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी ६ वाजता विसर्जन मिरवणूकीची सुरवात होते. श्री गणेशांची मूर्ती सोबत आकर्षक पालखी मिरवणुकीमध्ये सहभागी असते. या पालखीमध्ये मंडळाची पुजेची पितळेची मूर्ती असते.

स्थानिकांच्या वतीने परिसरामध्ये भव्य रांगोळी काढली जाते. यावेळीही स्त्रियांच्या वतीने पाणी वाहिले जाते. मंडळाच्या चौकातून फिरुन ही मिरवणूक मुख्य मिरवणुकीत सहभागी होते. गणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपारिक धनगरी ढोल वादन, झांज पथक, लेझीम वादन केले जाते. तसेच मंडळाच्या वतीने गणेश मूर्तींच्या फोटोंचे मोफत वाटप केले जाते. विसर्जन मिरवणूकीमध्ये मंडळाच्या वतीने अखंडपणे प्रसादाचे वाटप केले जाते. मंडळाकडून मिरवणूकीमध्ये कधीही डाॅल्बी वाजवला जात नाही. पारंपरिक वाद्यांच्या तालावरच मिरवणूक काढण्यात येते. शिस्तबद्ध मिरवणूकीसाठी मंडळाला अनेक पारितोषिके मिळाली आहेत. मंडळाच्या वतीने दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थी दिवशी चौकामध्ये आरती केली जाते.याशिवाय दरवर्षी सामाजिक बांधिलकी म्हणून मंडळाकडून विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात. दुर्गम भागातील शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप, दत्तक विद्यार्थी योजना, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, अवयव दान योजना, चित्रकला स्पर्धा, तसेच बालकल्याण संकूल, अवनी, महापालिकेच्या उपक्रमांना सहकार्य इ. संस्थांना निधी दिला आहे. यापुढेही असेच लोकोपयोगी उपक्रम राबवत गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.

आपल्या मंडळाची माहिती आमच्या वेबसाईट वर टाकायची असल्यास खालील फॉर्म भरा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top