बऱ्याच वेळा अस होत काही सुंदर अशी ठिकाण आपल्या जवळपासच्या भागातच दडलेली असतात पण माहितीच्या अभावामुळे ती आपण कधी पाहिलेली नसतात. असच एक ठिकाण होत ते म्हणजे टिक्केवाडी व पंडीवरेच्या पिछाडीस जंगलातील डोंगरावर असणार भोंगीऱ्यातील स्वयंभू महादेवाचं देवस्थान. तिथून जवळच असणारे भाटीवडे हे आमचे गाव पण आम्ही कोल्हापुरातच स्थायिक. वर्षातून दोन तीन वेळा दसरा , यात्रा किंवा माही च्या निमित्ताने गावाकडे येणे जाणे होतेच पण ज्या रस्त्याने गावाकडे जातो येतो त्या भागातच इतके सुंदर ठिकाण असेल याची कधी कल्पना हि नव्हती व माहिती देखील. पण श्री युवराज लाड – सरनोबत सरांच्या भुदरगड पर्यटनाच्या पाऊलखुणा या पुस्तकातून या ठिकाणाची माहिती मिळालीच. मग काय ठरला प्लॅन हे ठिकाण पाहायला जायचा तो ३० एप्रिल २०१९ ला. अचानक प्लॅन ठरल्याने सोबतीला यायला एकच हक्काचे साथीदार विजयराव काताळे तयार झाले. निघालो सकाळी कोल्हापुरातून मी विजयराव आणि आपली शाईन एस. पी . १२५. या भटकंती मध्ये आम्ही दोन ठिकाण पाहणार होतो

तालुका - भुदरगड

..................................................

मार्ग - कोल्हापूर - इस्पुर्ली - शेळेवाडी - बिद्री - मुदाळतिट्टा- कुर -

..................................................

गावाचे नाव - टिक्केवाडी

..................................................

योग्य काळ - वर्षभर

..................................................

पहिले होते टिक्केवाडी च्या पिछाडीस असणारी अष्टभुजाई देवी व मंदिर परिसर आणि दुसरे होते ते भोंगीऱ्यातील स्वयंभू महादेव देवस्थान. कोल्हापूर – इस्पुर्ली – शेळेवाडी – बिद्री – मुदाळतिट्टा- कुर – टिक्केवाडी असा साधारण 50 ते 52 किलोमीटरचा प्रवास करत आम्ही पोहोचलो ते टिक्केवाडीच्या पिछाडीस असणाऱ्या अष्टभुजाई देवीच्या मंदिर परिसरात ( आता या सर्व प्रवासाचे वर्णन व या मंदिर परिसरारचे वर्णन , माहिती व येथील आख्यायिका हा सर्व अनुभव मी माझ्या प्राचीन आख्यायिकेची साक्ष देणार अष्टभुजाई देवी मंदिर या मागील लेखामध्ये दिला आहे तो सविस्तर वाचावा कारण हे ठिकाण पाहिल्यानंतर पुढचा प्रवास करावा लागतो ) अष्टभुजाई देवीचं मनोभावे दर्शन घेतले देवळात दर्शनासाठी आलेल्या ग्रामस्थांकडे भोंगीऱ्यातील महादेवाच्या देवस्थानाकडे जाणाऱ्या मार्गाची व्यवस्थित माहिती घेतली आणि हर हर महादेव म्हणत वाटचाल सुरु केली. या ठिकाणाकडे जाण्यासाठी २ ते ३ वेगवेगळे मार्ग आहेत. आम्ही टिक्केवाडीतील अष्टभुजाई देवाच्या मंदिराच्या मागील बाजूने जाणाऱ्या मार्गाने जाणार होतो. मंदिराच्या मागच्या बाजूलाच लालभडक मातीभरलेला एक कच्चा रस्ता होता. या रस्त्यावरून काही टू व्हीलर गाड्यांची ये जा चालू होतीच. हा रस्ता पुढे पंडिवरे गावास जाऊन मिळतो. विजयरावांच्या ब्यागेत पाण्याची एक बॉटल भरून घेतली होतीच आणि मग काय गावकर्यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे मंदिराच्या मागच्या बाजूने उजव्या हातास जंगलात जाणार्या पायवाटेने तिकडे जायचे होते आणि त्याप्रमाणे आम्ही चालायला सुरवात केली. त्या रस्त्याने साधारण आम्ही १० ते २० पावले चाललो असेल तोवर उजव्या हातास जंगलात जाणारी एक पायवाट नजरेस पडली. या जंगलातील पायवाटेनेच आम्हाला वरती डोंगर माथ्यावर असणाऱ्या स्वयंभू महादेवापाशी जायचे होते. आता सोबत कोणी वाटाड्या नाही कि वाटेवर कोण भेटेल याची शक्यता नाही. आम्ही आपले सापडेल तोच आपला मार्ग देव काय आपल्याला चुकवणार नाही अशी मनात एक भाबडी अशा धरून जंगलातील प्रवास सुरु केला. घनदाट जंगल सुरवातीस मोठे मोठे वृक्ष तर काही ठिकाणी लहान पण भव्य अशी झाडांची गर्दी होती या जंगलात. यातूनच मळलेली अशी सुंदर वाट.

संपूर्ण जंगलात भयाण अशी शांतता होती. तर कुठेतरी किर किर किड्यांचा किंवा पक्षांचा आवाज या शांततेला छेद देत होता. त्यातच वाटेवर पडलेल्या पाचोळ्यावर आमच्या पडणाऱ्या पावलांमुळे होणाऱ्या आवाजाची एक वेगळीच लय या शांततेच्या वातावरणात घुमत होती. मोर , लांडोर, टिटवी , साळींदर , रानडुक्कर , ससे , कोकीळ , साळुंकी सहित विविध पशु पक्ष्यांचे दर्शन या भागात होतच असते. थोडे चालल्यानंतर सुरु झाली ती जंगलातील चढाई. दुपारची वेळ होती त्यात मोक्कार ऊन होते पण गर्द वनराई मुळे त्याची तीव्रता एवढी जाणवत न्हवती. थोड्या अंतरावर गेल्यावर आम्हाला जांभूळ पाण्याचे ठिकाण पण पाहायला मिळाले पण त्यात पाण्याची मात्र कमतरता जाणवली. घनदाट जंगलातील या चढ्या वाटेने साधारण २० ते २५ मिनिटात आम्ही पोहोचलो या डोंगराच्या वरच्या टप्याजवळ. आता ईथे गर्द वनराई संपली होती छोटी छोटी झाडे झुडपे सुरु झाली होती. हा सर्व भाग नैसर्गिक वनराईने व्यापलेला आहे. कडक उन्हाळा असून पण मस्त असा गारवा जाणवत होता. या भागात करवंद, आंबे , जांभूळ , आळु असा रानमेवा तर भरपूर प्रमाणात. आता या वरच्या टप्प्यामध्ये मात्र अनेक पायवाट फुटल्या होत्या पण गावातील लोकांनी सांगितल्या प्रमाणे आम्ही डाव्या हातास जाणाऱ्या पायवाट चालण्यासाठी पकडल्या. वाटेत जाताना रानमेवा करवंदाची बरीच झाडे होती. त्याला लागलेली काळीभोर करवंद खायचा काय मोह काय आवरता आला नाही. थोडा वेळ मस्त करवंदाची मेजवानी मारली आणि चालू लागलो . पुढे ५ मिनिटांनी एक चांगला असा मळलेला मोठा कच्चा रस्ता आडवा आला आणि लक्षात आले कि आता ईथुन पुढे जवळपासच कुठेतरी हे ठिकण असणार . डाव्या हातास भुदरगड चा लांबचा पल्ला दिसत होता तर उजव्या हातास या डोंगराचा दगडी माथा. आमची वाटचाल आम्ही पुढे चालू ठेवली आणि पुढच्या ५ मिनिटातच आम्ही पोहोचलो ते या स्वयंभू महादेवाच्या ठिकाणी. पायथ्यापासून ईथे येण्यासाठी साधारण आर्धा पावून तास ते एक तास तरी लागला होताच. या डोंगराच्या एका कड्यास लागूनच झाडीमध्ये हे ठिकाण होते. समोर पहिले तर ईथे छप्पर टाकून खोलीवजा बांधकाम केल्याचे पाहायला मिळाले. पाहताच वाटले कि या ठिकाणी पण जीर्णोद्धार करून हे ठिकाण नव्याने विकसित केले आहे त्यामुळे प्राचीन असे काय पाहायला मिळणार नाही. पण काही मिनिटातच आमचा हा भ्रम दूर झाला. समोरील शेडचा लोखंडी दरवाजा उघडून आत गेलो आणि समोर पाहतो ते डोंगराच्या कपारीत खोदलेली भली मोठी अशी गुहा. याच गुहेत होत ते स्वयंभू महादेवाचं देवस्थान.या ठिकाणाला येथील स्थानिक लोक भोंगीऱ्यातील महादेव म्हणतात. आता भोंगीरा म्हणजे काय असे अनेकांना वाटणारच तर ग्रामीण भागात अशा गुहेसारख्या भागास किंवा गुहांना भोंगीरा असे म्हणतात. बॅगेतील पाण्याचे दोन घोट घेतले आणि गुहेसमोरील नव्याने बांधण्यात आलेल्या मंडपात थोडा वेळ बैठक मारली. या ठिकाणी आल्यावर एवढ्या वाटचालीचा थोडा थकवा कुठल्या कुठे निघून गेला होता. कमालीची शांतता ईथे अनुभवायला मिळत होती एक वेगळीच प्रसन्नता व मनशांती मनाला मिळत होती. समोरील गुहेत शंभू महादेवाची नैसर्गिक स्वरूपातील पिंड होती या पिंडीसमोरील दगडास नंदी सारखाच आकार होता.आम्ही गुहेत जाण्यास निघालो तोवर माशांचा एक मोठा घोळकाच आवाज करत उठला. नशीब त्या मधमाशा नव्हत्या तर त्या साध्या माशा होत्या त्या आपणास काही इजा करत नाहीत याची खात्री होताच आम्ही आत गुहेत गेलो. आत जाऊन श्री शंभू महादेवाचे मनोभावे दर्शन घेतले त्या समोर नतमस्तक झालो आणि पुन्हा मागे वळालो.

गुहेचे व्यवस्थित निरीक्षण केले असता सध्या या शिव पिंडीच्या भोवती सिमेंटचे थोडे काम करण्यात आले आहे. पिंडीशेजारी एक त्रिशूल असून गुहेबाहेर लहान लहान घंटा लावल्या आहेत. तर गुहेत काही छोटी छोटी भुयारे देखील आहेत. बाकीची भुयारे तर थोड्या अंतरावर बंदिस्त आहेत पण यातील स्वयंभू पिंडीच्या शेजारचे एक भुयार मात्र खूप लांब व खोल असल्यासारखे वाटते मात्र ते किती लांब आहे व किती खोल आहे याची मात्र कुणालाच कल्पना नाही. या भागात या संदर्भात एक दंतकथा देखील सांगितली जाते ( ती कितपत खरी आहे किंवा खोटी याबाबतीत मात्र काही सांगता येत नाही ) कि काही वर्षांपूर्वी एक तेली हे भूयार पाहण्यासाठी आत गेला होता मात्र नंतर तो पुन्हा कुणालाच दिसला नाही. आता यावर विश्वास ठेवायचा कि नाही ठेवायचा हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न . बाहेरून गुहेचे स्वरूप पहिले तर कातळात खोदलेले एक मोठे मुख्य भुयार त्याच्या उजव्या बाजूस एक देवळी वजा छोटे भुयार. दोन्ही बाजूस दोन छोट्या देवळ्या व गुहेच्या आत मध्ये छोटी छोटी चार ते पाच भुयारे अशा प्रकारचे स्वरूप आहे. गुहेबाहेर दारासमोर सध्या काही वर्षात स्थानिक गावकऱ्यांनी व लोकांनी कमरे एवढ्या भिंतीचे बांधकाम केले असून समोरील भागात फरशी बसविण्यात आली आहे. लोखंडी शेड उभारून त्यावर पत्रे देखील बसवण्यात आले आहेत. मंदिर परिसरातील आणखी काही जिर्णोद्धाराचे काम देखील करण्याचा विचार ग्रामस्थांचा असून त्या कार्यासाठी मदत करण्यासंदर्भातील फलक देखील येथे लावण्यात आला आहे. भविष्यात या ठिकाणी नवीन बांधकाम पाहायला मिळणार यात शंका मात्र नाही. पण एक विनंती आहे कि ईथे कोणतेही काम करत असताना या ठिकाणच्या वृक्षांना , झाडांना कोणतीही इजा पोहोचवली जाऊ नये. कारण त्याच्या सानिध्यातच या ठिकाणचे सौन्दर्य अधिक खुलून दिसते. हि पिंडी केव्हा अस्तित्वात आली या विषयी मात्र कोणतीच कल्पना नाही किंवा कोणता कालखंड देखील उपलब्ध नाही. पण या शंभू महादेवाची पुजा मात्र फार प्राचीन काळापासून नित्यनियमाने केली जात आहे असे स्थानिक लोक सांगतात. आज देखील या ठिकाणी पुजा अर्चा मोठ्या भक्तिभावाने केली जाते. तसेच अज्ञातवासाच्या काळात पांडवांचे येथूनच मार्गक्रमण झाले असावे असे देखील येथील स्थानिक लोक सांगतात. या गुहांची रचना पाहता पांडव कालीन किंवा त्या आधीच्या काळातील हे खोदकाम असण्याची शक्यता जास्त वाटते. पावसाळ्यात या स्वयंभू पिंडीवर कातळातून नैसर्गिक जलअभिषेक होत असतो. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. टिक्केवाडी, पंडिवरे व पंचक्रोशीतील लोक मोठ्या भक्ती भावाने यामध्ये सहभागी होतात. टिक्केवाडी, पंडिवरे, लोटेवाडी च्या यात्रेनिमित्त देवांची पालखी याठिकाणी जाते. श्रावण महिन्यातील दर सोमवारी भजन, कीर्तन, उपासना या ठिकाणी चालते. हा सर्व परिसर व्यवस्थित पाहून शंभू महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढे. कारण या गुहेच्या वरती विस्तीर्ण असे मोठे पठार देखील आहे. ते आम्हाला पाहायचे होते. तेथूनच गुहेच्या बाजूने जाणाऱ्या थोड्या अडचणीच्या वाटेतुन आम्ही पुढे गेलो.थोडा दगडातील चढाईचा टप्पा चढून आम्ही पोहोचलो ते त्या विस्तीर्ण पठारावर. या महादेवास सड्याचा महादेव असे देखील म्हटले जाते कदाचित या मोठ्या अश्या सड्याच्या पठारामुळेच त्यास हे नाव असावे. पठार तसे मोठे होते एखादे खेळाचे मोठे ग्राउंड असावे असा मोठा आकार होता. एवढ्या उन्हात देखील येथे वाऱ्याची येणारी झुळूक मात्र थंडगारपणा जाणवून देत होती. आम्ही पठाराच्या बाजूने चालत चालत पठार पाहू लागलो. पोटात थोडी भूक लागली होती पण सोबत काहीच आणले नव्हते. इतक्यात समोर जांभळांनी गच्च भरलेलं झाड दिसले. हे झाड त्या डोंगरातील कड्याच्या बेचक्यातच उगवले होते त्यामुळे आम्हाला झाडावर चढायची गरजच पडली नाही हात पुढे केला कि जांभळाचा घड हाताला लागत होता. छोटी छोटी पण मस्त गोड अशी जांभळं भरपूर खाल्लीत. तिथून पुढे गेलो तोवर करवंदीच्या जाळ्या तिथे पण भरपूर करवंद त्यावर पण मारला ताव थोडी करवंद सोबत घेऊन जाण्यासाठी देखील घेतलीत. संपूर्ण पठार फिरून पहिले. पावसाळ्यात या पठारावरचा नजारा या भागातील वातावरण मात्र नक्कीच अल्हाददायक असेच असणार यात मात्र शंका नाही. इतक्या उंचीवर असलेल्या या पठारावरून एकीकडे भुदरगड तालुक्याचा बराचसा भाग तर एकीकडे राधानगरी तालुक्याचा बराचास भाग नजरेच्या टप्यात येत होता. पठाराच्या एका कोपऱ्यातून स्वयंभू देवस्थान देखील समोर बसवलेल्या पत्र्याच्या शेड मुळे उठून दिसत होते तर समोर दूरवर दिसणारे पंडिवरे गाव व बसूदेव पठार पण सुंदर असे दिसत होते. संपूर्ण पठार पाहून मस्त पोटभर जांभुळ ,करवंदी असा रानमेवा खाऊन आम्ही पुन्हा पठारावरून खाली उतरून महादेवाच्या भोंगीऱ्याजवळ आलो. महादेवाचे पुन्हा दर्शन घेतले आणि निघालो पुन्हा माघारी अष्टभुजाई देवीच्या मंदिराकडे . जाताना सर्व उतरण असल्याने व घरी जाण्याची घाई असल्याने आम्ही जंगलातील या वाटेने साधारण २० मिनिटातच खाली अष्टभुजाई देवीच्या मंदिराजवळ पोहोचलो. मंदिरासमोरील पाण्याच्या टाकीतील पाण्याने तोंड धुवून घेतले आणि थंडगार पाण्याने तहान भागवून घेतली. इतक्यात तिथे एम ऐ टी गाडीवरून बर्फाची आईसक्रीम विकणारा एक माणूस आला. अशी आईसक्रीम खेडेगावातील जत्रेतच खायला मिळतात. आणि हि कांड्या असलेली आइसक्रीम खायची एक वेगळीच मजा असत्या मग काय ५ रुपये वाली १० रुपये वाली अशा ४ आइसक्रीमच्या कांड्या घेतल्या विजयराव आणि मी दोघांनी तिथं बसून हाणल्या. आजचा दिवस या दोन ठिकाणांची भटकंती करण्यात भन्नाट असाच गेला होता. झाडाखाली लावलेली आपली शाईन एस. पी. चला चला म्हणत हुती. मग काय मारली किक आणि निघालो टिक्केवाडीहून ते थेट पोहोचलो बिद्री साखर कारखान्याजवळ भूक लागलीच हुती मग काय मस्त पैकी गरमागरम कांदाभजी , मिर्ची भजी खाल्ली दोन घोट चहाचे घेतले आणि निगालो परतीच्या वाटेला कोल्हापूरच्या दिशेने……. कोल्हापूरकरांनी व सह्याद्री भटक्यांनी एकदा तरी या आडवाटेवरच्या दोन्ही ठिकाणास आवर्जून भेट द्यावी…

स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
Keep This In Mind Before Visit Places

________________________

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top