कणेरी हे कोल्हापूर पासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर आहे.या गावात हा सिद्धगिरी मठ आहे.या मठाला सुमारे चौदाशे वर्षांची परंपरा आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह चार राज्यांच्या सीमावर्ती भागात रेवणसिद्ध, अमोघसिद्ध, मूरसिद्ध, करीसिद्ध, हालसिद्ध, वेताळसिद्ध यासारखे अनेक सिद्ध होउन गेले आहेत. त्यांच्या नावांचे संप्रदायही निर्माण झालेले आहेत. यापैकीच काडसिद्ध हे सिद्धपुरुष आहेत. या संप्रदायाचे मूळ स्थान म्हणजेच कणेरी मठ. बालब्रह्मचारी उत्तराधिकारी या मठाचा अधिपती म्हणून निवडला जातो. सातव्या शतकापासूनची ही परंपरा आहे. त्यानुसार सध्याचे अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज हे ४९ वे मठाधिपती आहेत. देशभरात मुंबई, पुणे, रत्नागिरी, गोवा, उत्तर कर्नाटकातील काही गावांसह ३५० हून अधिक ठिकाणी काडसिद्धेश्वरांची मठ-मंदिरे आहेत. संन्यासी परंपरा असणाऱ्या या मठाच्या अनुयायांचा मोठा वर्ग आहे.
राजे-महाराजांच्या काळात मठांना अनेक एकरात जमीन मिळालेली होती, मात्र इंदिरा गांधी पंतप्रधान असताना मठाच्या जमिनी सरकारजमा झाल्या. परंतु १९५२ मध्ये मठाचा ट्रस्ट झाल्याने कणेरीचा मठ आजही कार्यरत आहे. तीनशे एकरात पसरलेल्या या मठाचा मूळ उद्देश धर्मप्रसाराचा आहे. पहाटे पाच वाजता, सकाळी अकरा वाजता, दुपारी दोन वाजता आणि चतुष्काल पूजा संपन्न होत असते. याशिवाय मंदिरात नित्य भजन, रुद्राभिषेक आणि अन्नछत्र सुरू असते. दासबोध प्रमाणग्रंथ आणि त्रिकाळ भजन हे या संप्रदायाचे वैशिष्ट्य आहे.
कणेरी गावात प्राचीन अस महादेव मंदिर आहे.महाशिवरात्रीला महाराष्ट्रातून व कर्नाटकातून येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात.मठाकडून धर्म, आरोग्य, शिक्षण, उद्योग आणि शेती या पंचसूत्रीवर विविध उपक्रम राबविले जातात. यात गोशाळा, आनंदाश्रम, गुरुकुल यासारखे महत्त्वांकाक्षी प्रकल्प सुरू आहेत.
काय पाहाल
कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर यांच्या प्रयत्नातून २००६ मध्ये सिद्धगिरी या नावाने म्युझियम सुरू झाले.आठ एकराच्या परिसरात म्युझियम असून त्यामध्ये एखादे गावच स्थापन केल्याचे पहायला मिळते.तीन टप्प्यामध्ये विकसीत करण्यात आलेल्या म्युझियममध्ये आरोग्य, विज्ञान, गणित अशा क्षेत्रांमध्ये विविध ऋषींनी दिलेले योगदान शिल्पांच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे.त्याचबरोबर सध्या दुर्मिळ होत असलेली पारंपारिक ग्रामीण संस्कृती विविध माध्यमातून दाखवण्यात आली आहे. ग्रामीण भागात पूर्वीपासून चालत आलेली बारा बलुतेदार ही व्यवस्था शिल्पांच्या माध्यमातून साकारली आहे. केवळ पुस्तकांमधून वाचण्यात येणारी बारा बलुतेदारी नेमकी काय? हे शिल्पांमधून पहावयास मिळते. कोष्टी, कुंभार, चांभार, न्हावी, लोहार, शिंपी, सोनार यासह पिंगळा, वासुदेव यांचीही शिल्पे यामध्ये आहेत. शेती व त्यामध्ये काम करणारे शेतकरी यांची हुबेहुब शिल्पे पर्यटकांना आचंबित करत असतात. शेतामध्ये बैल, गाय, म्हैशी यांच्याबरोबरच लगोरी, सूरपारंब्या, लंगडी हे पारंपारिक खेळांचे प्रदर्शनही मूर्तींमधून करण्यात आले आहे.
कसे जाल ?
कोल्हापूर बस स्थानकापासून साधारण १५ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.
काही महत्वाच्या गोष्टी
संग्रहालयाची वेळ
सकाळी ०९ ते सायंकाळी ६.००
प्रवेश शुल्क - प्रौढांसाठी 100 ₹ आणी मुलांसाठी २०० ₹
संग्रहालयात पार्किग सुविधा आहे.
( संग्रहालयात फोटो घेण्याची परवानगी नाही )