शिवाजी पूल
कोल्हापूर आणि पन्हाळा या दोन ठिकाणांना जोडण्यासाठी तत्कालीन कोल्हापुर दरबार यांनी १८७४ ते १८७८ या कालावधीत हा पूल बांधला. मेजर वॉल्टर मॉर्डन डफेट रॉयल इंजिनीअर्स या कंपनीच्या देखरेखीखाली राजश्री रामचंद्र महादेव आणि कंपनीने चार वर्षांत पूल बांधला.पूल बांधणीच्या काळात दोन पोलिटिकल एजंटची कारकीर्द पूर्ण झाली.जी. एस. अँडरसन यांच्या कारकीर्दीत पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली तर एफ.श्वेंडरच्या कारकीर्दीत पूल पूर्ण झाला.यावेळी संस्थांनाचे कारभारी रावबहाद्दूर महादेव वासुदेव बर्वे होते.नंतर चौथ्या शिवाजींचे नाव या पुलाला देण्यात आले.’चौथे शिवाजी महाराज यांची कारकिर्द सन १८७१ ते १८८३ अशी राहिली.महाराजांच्या कारकिर्दीत कोल्हापूर शहर व राज्यात काही नवीन व लोकोपयोगी बांधकामे करण्यात आली.
संस्थान काळातील अनघड असा हा शिवाजी पूल आहे.त्यासाठी पाषाण शिळांचा वापर केला गेला.शिवाजी पुलाच्या उभारणीत वडार, पाथरवट, गवंडी व स्थापतींनी कमानींचा प्रत्येक की-स्टोनवजा पाषाण घडवताना,त्याची अॕक्युरेसी राखलेली पाहता येते.या कमानीखालून जाताना थक्क व्हायला होते. नॅनो-स्केलपेक्षा कमी फरकाने, त्याचा आस घडवताना त्यांच्या कौशल्याची व मेहनतीची दाद द्यावी वाटते.प्रचंड अर्धगोलाकृती व्हेनेशियन कमानी नसूनही,त्या बसक्या दीर्घ वर्तुळाकृती आहेत.इतक्या वर्षांच्या कालावधीत त्यांची प्लेसमेंट तसूभरही बदलली नाही की सांधमोड हलली नाही.याशिवाय चार कोपऱ्यात रोमन अल्कोव्ह उभारुन,त्याला टस्कन स्तंभाने मढवून हे एका अर्थाने तोरणच सुशोभित केले गेले आहे.या पुलाच्या कमानी वर दगडी माशाची एक जोडी कोरली आहे.पावसाळ्यात ज्यावेळी पुराचे पाणी या माशाला लागते त्यावेळी मच्छिन्द्री झाली असे म्हणले जाते.त्यावेळी कोल्हापुर मधील अनेक जन पुराचे पाणी पाहायला बाहेर पडतात.नवीन पूल बांधल्यामुळे सध्या हा पूल वाहतुकीसाठी बंद आहे.