कोल्हापूर पासून पूर्वेला १७-१८ किलोमीटरवर या गावात प्राचीन मंदिर आहे. मंदिराची रचना किमान ३०० वर्ष तरी जुनी आहे. तीन खणी मंदिरात (गाभारा, अंतराल मंडप ,मुखमंडप) भगवान स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहेत. हजारो घरांचा कुलस्वामी असलेल्या या नरहरीच वेगळेपण बघायला मिळत तसेच लक्षात येईल की हे केवळ विष्णूंच रूप नाही तर याच मूर्ती त भगवान शिवांचाही अंश आहे.
आपण क्रमाने ही वैशिष्ट्ये पाहू
१) अंतराल मंडपातील नंदी
सर्वांना माहीत आहेच की नंदी हे शिवाचे वाहन आहे पण सांगवडे गावच्या या नृसिंहासमोर एक प्राचिन नंदी आहे.
२) लक्ष्मी देवीचे स्थान
लक्ष्मी म्हणजे विष्णूंची पर्यायाने नृसिंहाची पत्नी देवपत्नी चे स्थान देवांच्या डावी कडे असते (पहा: म्हाळसा खंडोबा रामसीता ) पण इथे लक्ष्मी माता देवांच्या उजवी कडे आहे कारण या रूपात शिवही आहेत.
३) उपासनेचा वार : सोमवार
नृसिंह उपासना ही मुख्यतः शनिवारी केली जाते पण सांगवडे येथे सोमवार ला खूप महत्त्व आहे इतक की भक्त श्रावणात मोठी गर्दी करतात नृसिंहाच्या नावाने मुंजा वाढतात.
४) आगळी ललकारी.
जेव्हा जेव्हा नृसिंहाची पालखी निघते तेव्हा जी ललकारी दिली जाते ती *शिवहरी* अशी आहे यावरून लक्षात येईल की मंदिर निर्मात्यांना देवांच्या या समन्वयात्मक रूपाची जाणिव होती.
५) रूद्राचा अभिषेक
इथे देवांना अभिषेक घालताना रूद्र सुक्ताचा पाठ करतात. एरव्ही नृसिंह देवांना पुरुष सुक्त किंवा पंचसुक्त पवमानाने अभिषेक केला जातो.
६) भाविकांच्या देव्हाऱ्यातील अश्वारूढ भैरव स्वरूपी मूर्ती
इथे भाविक आपलं कुलदैवत म्हणून श्री नृसिंहाची घोड्यावरची मूर्ती बसवतात.
७) वैशाखा बरोबर चैत्रातला उत्सव
तर जेव्हा हिरण्यकश्यपूला मारूनही देव शांत होईनात तेव्हा भगवान शंकराने त्यांना शांत करायला उग्र शरभ भैरवाचे रूप घेतले तर या रूपातून भद्रकाली (जटेश्वरी) प्रत्यंगिरा (फिरंगाई) प्रगट झाली . या शरभाने नृसिंहाला युद्धाला आव्हान दिले. दोघांनाही परस्परांचे कपटवेष ( सिंह आणि शरभ) ओढून काढले आणि हरी हर एकाकार झाले हेच गंडभेरूण्ड नृसिंह
हिरण्यकश्यपूला मारूनही नृसिंह भगवान शांत होईनात साक्षात लक्ष्मी माता देखील देवाला समोर जाऊ शकेनात तेव्हा भगवान शंकरांनी वीरभद्राला पाठवले त्याने उग्र असं भेरूण्ड ( जे म्हैसूर सरकारचे राज चिन्ह आहे) म्हणजे दोन मुखाच्या गरूडाचे रूप घेऊन नृसिंहाला शांत करण्यासाठी प्रयत्न केले पण ते ही जमेना तेव्हा शंकरांनी शरभ म्हणजे पंख असलेल्या उग्र विक्राळ सिंहाचे रूप घेतले या दरम्यान देवी भद्रकाली ( जी सांगवड्यात जटेश्वरी / जखुबाई म्हणून पुजली जाते) आणि सिंह मुखी देवी प्रत्यंगिरा( फिरंगाई) या देखील मदतीला धावून आल्या. शरभ आणि नृसिंहाचे प्रचंड युद्ध झाले. आता प्रत्येक पुराणात या युद्धाचा निकाल वेगळा दिला आहे. काही पुराणं म्हणतात शरभेंद्राने नृसिंहाचा पराभव केला तर काहींच्या मते नृसिंहाने शरभाला हरवलं .
वास्तविक हे युद्ध जय पराजया पेक्षा विश्वाच्या पालक आणि संहारक अशा दोन शक्तीनी ( अनुक्रमे विष्णू आणि महेश) यांनी भानावर यावे म्हणून होते. शेवटी दोघांनी एकमेकांचे हे कपट वेष ओढून काढले ( नृसिंहाचे सिंह कातडे शिवांनी वस्त्रा सारखं नेसल म्हणूनच त्यांना शार्दुलचर्मांबरम् म्हणतात.) तर शिवाचे शरभ रूप ओढून काढतानाच्या या रूपाला गण्डभेरूण्ड नृसिंह म्हणतात या रूपात देवांना आठ मुखं आहेत ती अशी
सिंह मुख्य मुख नृसिंह
वराह
भेरूण्ड
हयग्रीव घोडा
भल्लुक अस्वल
वानर हनुमान
गरूड
वाघ
या आठ मुखासह मांडीवर शरभ महादेव समोर लक्ष्मी असं हे रूप आहे. हे उग्र रूप आपल्या इथे तांदळा म्हणजे स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहे. एकाच वेळी त्यांच्या उग्र आणि प्रेमळ अशा दोन्ही प्रकारच्या रूपाची अनुभुती पुजारी मंडळीसह अनेक भक्तांनी आजवर प्रत्यक्ष घेतलेली आहे