कोल्हापूरपासून साधारण ३४ ते ३५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पाट पन्हाळा या गावाजवळ असणारे कापलिंगेश्वर हे ठिकाण. काही दिवसापूर्वी एका प्रदर्शनात मिलिंद गुणाजी यांचे गूढरम्य महाराष्ट्र हे पुस्तक खरेदी केले व ते वाचत असताना ह्या ठिकाणाची माहिती मिळाली.कोल्हापूर पासून एवढ्या जवळच व निसर्गरम्य असे ठिकाण व या ठिकाणचे अप्रतिम शब्दात वर्णन त्या पुस्तकात केले होते त्यामुळे मला ते ठिकाण पाहण्याची एक अनामिक ओढ लागली होती.एक दोनदा त्याची तयारी हि केली पण काही कारणास्तव तिकडे जाण्याचे रद्द झाले.पण एके दिवशी असेच सुट्टीच घरी निवांत बसलो असता पुन्हा कापलिंगेश्वरचा विचार डोक्यात आला व आता मात्र ठरवले कि आज काही करून जायचे.विशाल चव्हाण ह्या माझ्या सवंगड्यास फोन केला व कापलिंगेश्वरच्या भ्रमंतीची कल्पना दिली.तो हि लगेच तयार मग काय निघालो कोल्हापुरातून कापलिंगेश्वराच्या वाटेला. ( कोल्हापुर– कळे- बाजार भोगाव- पाट पन्हाळा ) साधारण पावून ते एका तासात पोहोचलो पाटपन्हाळा गावात.
नदीचा पूल ओलांडून गावात जाताच शाळेला जाणारी काही पोर दिसलीत. त्यांच्याकडे कापलिंगेश्वराची विचारपूस केली त्यांनी व्यवस्थित माहिती दिली. गावाच्या माळावर शाळा आहे तिथून जायचे कापलिंगेश्वरला. गाडी सरळ माळाकडे वळवली वाटेत शेतावर जाणारे शेतकरी बांधव होते त्यांच्या कडे पुन्हा विचारपूस करत एकदाच पोहोचलो पाट पन्हाळा गावच्या शाळेजवळ. शाळेच्या जरा पुढे एका घरात मावशींकडे विचारणा केली तर त्यांनी गाड्या त्यांच्या दारात उभ्या करा व ह्या कच्या रस्त्यानं सरळ चालत जावा हा रस्ता जंगलातून सरळ देवळाच्या उंबऱ्याला जातोय.वाटत शेताला जाणारी मानस दिसलीत तर ती आणि सांगतीलच. मावशींनी सांगितलेली माहिती ऐकून गाडी त्यांच्या दारात उभी करून आम्ही ती रानातली पायवाट पकडली व चालू लागलो.कापलिंग डोंगराची उंची समुद्रसपाटीपासून साधारण २५०० फूट असावी. पाटपन्हाळा गावातून कापलिंगला जायला दोन मार्ग आहेत दोन्हीही पाऊलवाटा एक गावच्या दक्षिणेकडून आंबेशेत पायरदंड- तळी असा मार्ग व दुसरा वेताळमाळ – घाटशिळीचा टेक टाक्याच पाणी असा आहे हा मार्ग पहिल्या मार्गापेक्षा थोड्या कमी अंतराचा आहे पण आम्ही दोन्ही पैकी बहुतेक आम्ही दुसऱ्या मार्गाने जात होतो. भक्तांचा कायम राबता या मार्गावर असल्याने वाट चांगलीच मळलेली व मोठी होती. प्रथम शेतवाडीच्या कडेने चालत चालत माळरानावर आलो.
गवतातून जाणारी हि वाट व आजूबाजूला हिरवागार निसर्ग खूपच छान वाटत होते. थोड्या वेळाने एक मोठ्या झाडाखाली एका उभ्या दगडाला हार घालून पूजा करण्यात आली होती. समोर घंटा पण अडकवली होती. कदाचित ह्या ठिकाणास वेताळमाळ म्हणत असावेत. तिथूनच पुढे वडाच्या झाडाला सुवासिनींनी वटपौर्णिमेदिवशी गुंडाळले दोरे दिसत होते. तिथून पुढे जरा गेल्यानंतर मात्र जंगल सुरु झाले.वाट थोडी चढी व दमछाक करणारी होती तो टप्पा पूर्ण झाला व मग मात्र घनदाट जंगल सुरु झालं या मार्गावर करवंदीच्या जाळी,जांभूळ,उंबर,आंबा,हिरडा, बेहडा,आवळा असे अनेक प्रकारच्या झाडांनी व्यापले होते. या वाटेवरून गेल्यानंतर थोडेसे विरळ जंगल लागले व त्यानंतर पुढे जाताच होती ती कापलिंगेश्वर महादेवाची टेकडी. गावातून इथपर्यंत यायला साधारण १ ते सव्वा तास लागला होता. खूप तहान हि लागली होती पण कापलिंगचा मंदिर परिसर पाहून आम्ही आमची तहान पण विसरून गेलो .संपूर्ण टेकडी मोठ्या मोठ्या व उंच झाडांनी व्यापली होती व मधोमध कापलिंगेश्वराचे मंदिर कोकणातील मंदिराप्रमाणे दिसत होते. मंदिर पूर्वाभिमुख होते. पायातील बूट बाजूला उतरून आम्ही मंदिरात प्रवेश केला. मंदिराचा सभामंडप हा लाकडी खांबावर उभारला होता व दोन्ही बाजूचे बांधकाम वीट सिमेंटच केलेलं होत.छपरावर पत्रा बसवला होता. नुकताच दसरा झाला होता त्यामुळे आपट्याचे पाने सभामंडपात पडली होती. सभामंडपातून पुढे लागतो तो मुख्य गाभारा. ह्या गाभार्याच्या भिंती घडीव दगडामध्ये चुन्यात बांधकाम केलेल्या आहेत. भिंतीची रुंदी साधारण दोन फूट व गाभारा साधारण सहा बाय सहा फूट आकाराचा असावा.गाभाऱ्यात कापलिंगेश्वराचे शिवलिंग होते. त्याच्या मागेच अनेक असे उभे दगड पुजून ठेवले होते.भाविकांनी नवस फेडण्यासाठी देवाला विहिलेले अनेक पितळी घोडे, शिवलिंग एका कोनाड्यात उभे करून ठेवले होते. कापलिंगचे हे शिवलिंग एका छोट्या खड्यात उभे केले होते व बाजूने सिमेंटचा कोबा बनवला होता.सभामंडपात एका छोट्याश्या कळशीमध्ये पाणी होते ते पाणी घेऊन मी कपलिंगेश्वराची पूजा केली. तोपर्यंत विशाल काही फुले घेऊन आला ती फुले वाहून कपलिंगेश्वराला मनोमन वंदन व प्रार्थना करून आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. मंदिरासमोर सुंदर असा अंगण आहे. व त्या अंगणात मंदिरासमोर असणाऱ्या एका झाडाखाली छोटीशी नंदीची मूर्ती आहे. त्या मूर्तीवर छोटेसे पत्र्याचे शेड हि बसवले आहे. बाजूला एका झाडावर असलेला सरडा आम्हाला निरखून पाहत होता माझे तिकडे लक्ष गेले मी त्याला माझ्या कॅमेरा मध्ये लगेच क्लिक करून त्याला बंदिस्त केले.
आजूबाजूचा शांत व गारवा असलेला परिसर मनाला एक वेगळ्याच प्रकारचे समाधान देत होता. दरवर्षी महाशिवरात्रीला पंचक्रोशीतील भाविक येथे प्रचंड प्रमाणात येतात. रात्रभर भजन कीर्तनाने जागरण करून दुसऱ्या दिवशी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होते.श्रावण महिन्यात दर सोमवारी गावातील लोक पुरण पोळीचा नेवेद्य घेऊन कापलिंगेश्वराकडे जातात व तिथेच उपवास सोडतात.आश्विन शुद्ध पंचमी दिवशी पाट पन्हाळची गावदेवीची पालखी सकाळी कापलिंगेश्वराकडे येते आणि दुपारी १२ नंतर पुन्हा पालखी गावात आणली जाते. तेव्हा गावातील घरांसमोर सुंदर रांगोळ्या घालून पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जात. सर्व परिसर पाहून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो तहान खूप लागली होती व येताना आम्ही सोबत पाणी न घेता आलो होतो पटापट चालत साधारण पावून तासात पुन्हा गावात आलो मावशींच्या कडून पाणी घेऊन तहान भागवली व लागलो परत कोल्हापूरच्या वाटेला.महाराष्ट्रातील काही गूढरम्य ठिकाणांपैकी एक असलेल्या या ठिकाणास सह्याद्री भटक्यांनी एकदा तरी आवश्य भेट द्यावी.