कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील चंदगडपासून ३५ कि.मी. अंतरावरील हा शिवनिर्मित किल्ला. गोव्याच्या पोर्तुगिजांवर वचक ठेवण्यासाठी याची निर्मिती शिवरायांनी 1675 साली केली आहे. सह्याद्री पर्वताच्या रांगेतील एका उंच शिखरावर हा बांधलेला आहे. समुद्रसपाटीपासून ६१० मीटर उंचीवरील पारगडाभोवतीचे जंगल नानाविध वृक्षराजींनी व जंगली जनावरांनी आणि पशु-पक्षांनी भरलेले आहे. ह्या हिरवाईमुळे कोणत्याही तूत गडास भेट देता येते. शिवकाळापासून किल्ल्यावर आजही वस्ती आहे. किल्ला चढून जाण्यासाठी ३६० पायर्यांची एक अरूंद चढावाची वाट आहे. किल्ल्याचा विस्तार ४८ एकर क्षेत्रफळाचा असून पूर्व, पश्चिम व उत्तरेला नैसर्गिक अशी ताशीव कडय़ाची तटबंदी असून दक्षिणेला थोडय़ा उतारानंतर प्रचंड खोल दरी आहे. गडावर शिवकालीन जीर्णोध्दारात झालेले भवानी माता मंदिर आहे. याशिवाय गडावर महादेव मंदिर, मारुती मंदिरही आहे.
पारगडावर फेरफटका मारताना आपणास चार तलाव, शिवकालीन बर्याचशा मुजलेल्या स्थितीतील १८ विहिरी, दगडी तटबंदी, तटबंदी व त्यावरील अनेक ठिकाणी केलेले बुरुजाचे बांधकाम, काही समाधी स्थाने, शिवकालीन पाणी पुरवठा करणारी कुडे, तोफा इत्यादी ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन होते. संपूर्ण गड व्यवस्थित फिरण्यास दोन तास पुरतात. गडावर मुक्काम करायचे ठरवल्यास भवानी मातेचे मंदिर किंवा येथील शाळेत त्याची सोय होवू शकते. इ.स. १६८९ मध्ये हा गड जिंकण्याचा मोगलानी अयशस्वी प्रयत्न करून पाहिला होता. १७४९ मध्ये कोल्हापूर छत्रपतींनी हा किल्ला इनाम-जहागीर म्हणून सदाशिवराव भाउंना दिला होता. पारगड जवळचा तिलारी धरण परिसर इको टुरिझम झोन म्हणून विकसित करण्याचे प्रयास सुरू आहेत.