सह्याद्रीच्या डोंगर रांगात निसर्गसौंदर्याने नटलेले अनेक ठिकाणे आहेत त्यापैकीच एक म्हणजे मोरजाई देवी चे पठार.मोरजाई देवीच्या नावावरून या पठाराला मोरजाई पठार म्हणून ओळखले जाते.मोरजाई देवीचे स्थान हे गगनबावडा तालुक्यांमध्ये आहे.कोल्हापूरातून गगनबावडा कडे जाताना सांगशीची फाटा लागतो.सांगशी मध्ये आपल्याला सुंदर अशी एक स्मारकशिला पहायला मिळतो ती स्मारकशिला आवर्जून पहावी.इथून पुढे कुंभी नदीचा परिसर लागतो कुंभी नदी पार करून आपण बोरबेट मध्ये पोहोचतो.मोरजाई देवीचा पायथा म्हणजेच बोरबेट होय.बोरबेट पासून मोरजाई देवी ला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.पहिला मार्गावरून जाण्यासाठी पायर्या चढून आपण देवीला जाऊ शकतो तर दुसरा मार्ग गावापासून काही अंतरावर एक पायवाट आहे.पाय वाटेने आपण देवीला गेल्यास जंगल भ्रमंती चा आपण आस्वाद घेऊ शकतो.
Previous
Next
जांभ्या खडकापासून पठार बनलेले आहे.पठार हे विस्तीर्ण असल्यामुळे येथून सूर्योदय व सूर्यास्ताचे दर्शन सुंदर असे होते.पावसाळ्यामध्ये येथील वातावरण खूप सुंदर असते.पठारापासून खूप छोटे मोठे दगड आपल्याला दिसून येतील.पठारावरून साधारण पाच ते दहा मिनिटांमधे आपण गुहेजवळ पोहोचतो.गुहेकडे जाताना आपल्याला एक कमान दिसून येईल.दोन उभे दगड आणि त्यावर एक आडवा दगड अशी या कमानीची रचना आहे.एक मनुष्य जाईल इतकी याची उंची आहे.कमान ही जांभा खडकांमध्ये आहे तर उजव्या बाजूला आपल्याला एक कातळामध्ये खोदून काढलेली टाकी दिसुन येईल.पावसाळ्यामध्ये या टाकी मध्ये पाणी असते.विहिरीच्या समोरच समाधी सारखे दोन चबुतरे दिसतात.मुख्य कमानी पासून पुढे गेल्यानंतर आपल्याला जांभ्या खडाकामध्ये घडवलेली दिपमाळ दिसुन येते.मंदिराचा परिसर हा जांभ्या खडकाच्या तटबंदीयुक्त आहे. पुढे गेल्यानंतर मंदिराची प्रवेशाची दुसरी कमान दिसुन येते.पठारावर तिन गुहा आहेत.मुख्य गुहेत प्रवेश करताना श्री गणेशाची मुर्ती दिसुन येते.उजव्या बाजूला श्री मोरजाई देवीचे मुर्ती आहे.
मोरजाई देवीची मूर्ती ही चतुर्भुज आहे,देवीची मूर्तीची उंची साधारण तीन ते साडेतीन फूट उंच आहे.देवी मोरावर बसलेली आहे.देवीच्या उजव्या वरच्या हातात त्रिशूल तर डाव्या वरच्या हातात वाटी आहे.देवीची मुर्ती नव्याने स्थापित केली आहे.जुनी मुर्ती ही 16 हातांची होती असे अभ्यासक सांगतात.रथसप्तमी दिवशी देवीचा उत्सव असतो.मोठ्या प्रमाणात भाविक या पठारावर दाखल होतात.देवीचा नैवेद्य गोडा आहे.देवीचे शिखर गुहेच्या वर बांधून काढलेला आपल्याला दिसून येतो.मंदिरातून बाहेर आल्यानंतर दोन छोटी देवळे दिसुन येतात.पहिल्या देवळीत श्री हनुमानाची नमस्कार मुद्रेत मुर्ती दिसते,साधारन एक फुट उंचीची ही मुर्ती आहे.तर दुसर्या देवळीत साधिकेची मुर्ती आहे.गुहेच्या कोपर्यात 6 इंच इतकी श्री गणेशाची मुर्ती आहे.
मोरजाई ही अनेक मराठा कुटूंबाची कुलदेवता आहे.पठारावर अनेक दुर्मिळ वनस्पती आहेत अनेक वैद्य आजही या ठिकाणाला भेट देतात यामुळे मोरजाई देवीला आरोग्य देणारी देवता म्हणून संबोधले जाते.मोरजाई देवी ही पठारावर आहे याबरोबर तुमजाई व वाघजाई देवींचे स्थान पठारावर आहे यामुळे या तिनी देवतांचे त्रिकूट आपल्याला पहायला मिळेल.
देवीच्या मंदिराच्या समोर अनेक सतीशिळा आहेत.साधारन 40 ते 45 इतक्या सतीशिळा व दोन ते तीन वीरगळ आहेत.तसेच पहिल्या गुहेतून बाहेर आल्यानंतर शेजारी दुसरी गुहा आहे त्या गुहेत सात सतीशिळा आहेत तर तिसऱ्या गुहे मध्ये चार मूर्ती आहेत.युद्धात कामी आलेल्या विरांसाठी,गोरक्षण करताना धारातिर्थी पडलेल्या विरांची स्मारके म्हणजेच विरगळ होय.तसेच जुन्या काळी पतीच्या निधनांतर सती जाण्याची म्हणजेेच जिवंतपणी अग्नीदाह करवून घेण्याची प्रथा होती.त्या स्त्री च्या आठवणी रहाव्यात या साठी सतिशिळा घडविल्या गेल्या.
नवरात्र उत्सवात अनेक भाविक येथे मोठ्या प्रमाणामध्ये मंदिरात भेट देतात तसेच दर मंगळवारी व शुक्रवारी या मंदिरात भावीक येत असतात.गगनबावडा परिसरात असलेल्या या मंदिराला अवश्य भेट द्यावी व येथील परिसर सुशोभित ठेवावा ही विनंती.