खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर । Kopeswar Temple
कोल्हापूर जिल्ह्याला भेट देणारे पर्यटक दक्षिण काशी कोल्हापूरचे महालक्ष्मीचे मंदीर, महाराष्ट्नचे लोकदैवत श्री जोतिबा, निसर्गरम्य पन्हाळा विशाळगड, दाजीपूरचे अभयारण्य इत्यादी प्रसिध्द पावलेल्या स्थळांना भेटी देत असतात. आणखी काही पाहण्यासारखे राहून जात असेल अशी पुसटशी शंकाही त्यांना येत नाही, पण असे एक अप्रसिध्द पण वास्तुशिल्पाचा मति गुंग करणारा खजिना असलेले ठिकाण आहे; ते म्हणजे खिद्रापूर आणि तेथील कोपेश्वराचे प्राचीन मंदिर, इतिहासाच्या अभ्यासकांना हे अप्रतिम वास्तुशिल्प परिचित असले तरी इतर पर्यटकांच्या दृष्टीने मात्र हे भांडार अप्रसिध्द असल्याने अपरिचित राहिले आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या भेटीवर येणाऱ्या पर्यटकांनी या प्राचीन आणि प्रगल्भ वास्तुशिल्पाचा आनंद लुटण्यासाठी थोडीशी वाकडी वाट करून खिद्रापूरला भेट दिलीच पाहिचे असे आवर्जून सांगावेसे वाटते. पुस्तकांतून दिलेले साचेबंद पर्यटन करण्यापेक्षा थोडी आजूबाजूला नजर टाकली तर अशा कितीतरी निर्भेळ आनंदाच्या खजिन्यांचा शोध घेता येईल. खिद्रापूरच्या कोपेश्वराचे मंदीर तर इतके अप्रतिम आहे की, हे मंदीर पाहिल्यानंतर इतके संुदर शिल्प उपेक्षित रहावे याची खंत वाटल्यावाचून राहात नाही.
खिद्रापूर हे भूतपूर्व कोल्हापूर संस्थानातील शिरोळ तालुक्यातील पूर्वेकडील शेवटचे गाव. येथे कृष्णा नदी उत्तर दक्षिण वाहिनी असून या नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर गावाच्या पूर्वेस हे कलापूर्ण कोपेश्वर देवालय आहे. खिद्रापूरला जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. सांगली – खिद्रापूर या मार्गे यावे. सुमारे ३ हजार पर्यंत लोकसंख्या असलेल्या खिद्रापूरचे ‘ कोपेश्वर ‘ हे ग्रामदैवत आहे.
जैन मंदिर
हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर, खिद्रापूर मंदिराच्या समकालीन आहे. जैन मंदिर गावाच्या पश्चिमेस आहे. खिद्रापूरपेक्षा थोडे छोटे आहे. पण आपले स्वतंत्र अस्तित्व आणि परंपरा जपणारे आहे. मंदिराला तीन प्रशस्त दालने, आणि पायापासून छताची उंची साधारणत: २० फूट आहे. या मंदिरात साडे-सहा ते सात फूट उंचींचे आदिनाथांचे भव्य शिल्प आहे. या मूर्तीच्या सौदंर्याने अनेक मुनी, पर्यटक, श्रमण आकर्षित होतात आणि थोडे दिवस येथे तप करुन जातात. असे ही म्हटलं जातं की, या मूर्तीच्या दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात. ‘दक्षिण भारत जैन इतिहास’ या पुस्तकातून डॉ. विलास संघवे यांच्या टिपणावरून मिळणारा या मंदिराचा इतिहास असा आहे की, शिलाहार राजे गंडरादित्य यांचा महासामंत (सेनापती) निंबदेवरस यानं हे जैन मंदिर बांधलं. सामंत निंबदेवरस हा जैन धर्मीय सामंत होय. तो नाकीरस व चंपाबिकाचा द्वितीय पुत्र होय. याला भिल्लरस व काबरस नावाचे दोन कर्तबगार भाऊ होते. निंबदेवरस याला एक बहिण होती. तिचे नाव कर्णादेवी. हीच कर्णादेवी गंडरादित्याला दिली होती. राजाची राजमाता नागलादेवी ही सुध्दा धार्मिक होती. याचकाळी शिलाहार राजवंशजांनी १०८ जैन मंदिरे बांधली. त्यापैकी कोल्हापूर परिसरातील हे जैन मंदिर. इ.स. ११०५ ते इ.स. ११४० पर्यंत शिलाहारांची राजवट होती. त्या काळात भरभराटीस आलेली ही शिल्पकला, जशी जतन झाली पाहिजे.