कोल्हापूरच्या दक्षिणेला साधारणपणे 40 किलोमीटर अंतरावर ती आप्पाचीवाडी नावाचं विख्यात गाव आहे. दरवर्षी अश्विन महिन्यात पौर्णिमेला अश्विनी नक्षत्रावर सुरू होणारी यात्रा आणि मुख्य म्हणजे या यात्रेतली भाकणूक हा सबंध दक्षिण महाराष्ट्र आणि सीमा भागासाठी उत्सुकतेचा विषय असतो. वाडीकुर्लीच्या माळावर घुमट मंदिर, खडक मंदिर, वाडा अशा तीन मंदिरांच्या रूपात विराजमान हलसिद्धनाथांच्या दर्शनाला लाखो भाविक गर्दी करत असतात. ढोलांचा निनाद भंडाऱ्याची उधळण या सगळ्या सह होणारी यात्रा भक्तांच्या श्रद्धेचा विषय आहे. या यात्रेच्या प्रसंगी साक्षात हालसिद्धनाथ महाराज वाघापूरच्या डोणेबंधूंन कडून भविष्य कथन करून घेतात अशी भाविकांची श्रद्धा आहे पण हे हलसिद्धनाथ म्हणजे नेमके कोण? याची फार त्रोटक माहिती मिळते.
ईश्वरावतारी संत बाळूमामा यांचे आराध्य असणारे हालसिद्धनाथ म्हणजे मरळसिद्धांचे गुरु अर्थात रेवणसिद्ध यांचच एक रूप. कानडी मध्ये हाल म्हणजे दूध नाथ सिद्धांची दुधावर असलेली आवड म्हणून यांना हालसिद्धनाथ असे म्हणतात तर करवीर क्षेत्रातल्या नाथ सिद्धांची परीक्षा बघणाऱ्या माई नावाच्या योगिनीला शासन करणारे म्हणून काडसिद्ध असेही त्यांना म्हटले जाते. प्रचलित कथेप्रमाणे मरळ सिद्धांचा होणारा छळ दूर करण्यासाठी हालसिद्धनाथ रूपाने अवतीर्ण झाले नंतर करवीरात येऊन मरळ सिद्धांसह सिद्धांची परीक्षा घेणाऱ्या माई नावाच्या योगिनीने दिलेले सव्वाखंडी विष सहज प्राशन केले आणि सर्व सिद्धांची मुक्तता करून योगिनी ला भस्म केले परंतु या विषप्राशनामुळे त्यांच्या अंगाचा दाह होऊ लागला म्हणून त्यांनी जगदंबेला हाक मारली तीच जगदंबा भागुबाई नावाने आली तिने हालसिद्ध नाथांच्या शरीराचा शांत केला व नाथांच्या बाजूला विराजमान झाली
त्यानंतर घोसरवाड भागात येऊन त्यांनी शिंदे देसाई नावाच्या इनामदारांपैकी सावित्रीबाई यांच्यावर कृपा केली पण तिथे त्यांच्या साधनेवर व रूपावर शंका व्यक्त झाल्यानंतर त्यांनी त्या क्षेत्राचा त्याग केला पुढे आपले अवतार कार्य करण्यासाठी गुराख्याचे रूप घेऊन रेवणसिद्ध निपाणीकर देसाई सरकारांच्या गाई राखू लागले,गाई राखताना ज्या वेळेला भूक लागेल तेव्हा त्यांची क्षुधा शांत करण्यासाठी गाई आपोआप दुधाच्या धारा देत असतात. तुमचा गुराखी तुमच्या गाईंचे दूध चोरून पितो अशी चहाडी केल्यावर त्यांना भाकड गाई सांभाळण्याचे काम दिले पण त्याही गाई त्यांना दूध पाजत असत यानंतर काही लोकांनी कपटाने रूईच्या झाडाचा चिक दूध म्हणून दिला तोही पिऊन तिथून निघून हालसिद्धनाथ कुरली गावाजवळ माळावरती येऊन थांबले. तिथे येण्यापूर्वी नावेतून न येता भंडारा टाकून घोंगड्या वरून नदी पार करण्याच्या त्यांची लीला प्रसिद्ध आहे. अशा अनेक लीलांमुळे त्यांची प्रसिद्धी सर्व दूर पसरली त्यातच निपाणीकर देसाई सरकारांसह अनेक मातब्बर मंडळी त्यांचे भक्त झाले भक्त जनाचा अखंड उद्धार करून हालसिद्धनाथ चैत्र महिन्याच्या हस्त नक्षत्रावर ज्योतिबा यात्रे दिवशीच समाधीचे निमित्त करून गुप्त झाले.
समाधीला जाण्यापूर्वी नाथांनी सोन्याची वाटी हातातील काठी भंडाऱ्याची पिशवी आपले कांबळे निशाण हे भक्त जनांना वाटून दिले व यात्रेचे मानही दिले याच मानाबरोबर पट्टणकोडोलीच्या नारायण पुजारी यांचे वाघापूर येथील सावत्र घराणे डोणे यांच्या घराण्यात दरवर्षी रोहिणी नक्षत्रावर भाकणूक करण्याचा मान दिला.तेव्हापासून आजही अप्रकट रूपाने हालसिद्धनाथ भक्तजनांवर कृपा करत असतात.दरवर्षी लाखो भक्त त्यांच्या कृपाशीर्वादाची प्रचिती घेत असतात.
श्रीमातृ चरणारविंदस्य दास प्रसन्नसशक्तिकः
( संदर्भ स्मृतिमंजुषा, संकलक प्रशांत पाटील नेसरीकर )
🛵 कसे जाल ? 🚗
जाण्याचा मार्ग – कोल्हापूर – कागल – आप्पाचीवाडी