छत्रपती प्रमिलाराजे इस्पितळ ( सी.पी.आर )
ही वास्तू म्हणजे कोल्हापूरच्या आरोग्य सेवेचा १३३ वर्षांचा जिवंत वारसा आहे.या इस्पितळाचं आताच नाव छत्रपती प्रमिलाराजे इस्पितळ.छत्रपती शहाजीराजे यांच्या या पत्नी व सध्याचे श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या त्या आई.इस्पितळाचे मूळ नाव किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल.इंग्रज साहेबाचे नाव लोकांना म्हणायला यायचं नाही म्हणून लोक या दवाखान्याला मोठा म्हणजे थोरला दवाखाना म्हणू लागले.नंतर या इस्पितळाला प्रमिलाराजेंचे नाव देण्यात आले पण ते शॉर्टकटच्या जमान्यात सीपीआर झाले.ही वास्तू १३३ वर्षांपूर्वीची आहे.गॉथिक शैलीतली दगडी बांधकामाची हि इमारत आहे.ज्याने नवीन राजवाडा बांधला ( न्यू पॅलेस ) त्याच मेजर चार्ल्स माँट या स्थापत्यकाराने ही वास्तूही बांधनी केली आणि बांधकाम खर्चाचे जे बजेट धरले होते त्यापेक्षा चक्क २२७ रुपये कमी खर्चात ही वास्तू बांधून पूर्ण झाली.आज सीपीआर मध्यवर्ती ठिकाणी आहे,पण १८८१ साली हे ठिकाण म्हणजे गावाचं टोक.येथील परिसराला चौफाळ्याचा माळ म्हणूनच ओळखले जायचे
मेजर चार्ल्स माँट यांनी गॉथिक वास्तू शैलीवर आधारित या वास्तूचा आराखडा तयार केला.मुंबईच्या रामचंद्र महादेव आणि कंपनीने बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट घेतले. मार्तंड वामन शास्त्री व शेरॉर अभियंते देखरेखीवर होते.या वास्तूला अपेक्षित खर्च तीन लाख पाच हजार चारशे चाळीस रुपये होता,पण प्रत्यक्षात २२७ रुपये खर्च कमी झाला.सदरची ही वास्तू दगडी तीन मजली आहे.इमारतीचे उंच छत, दगडी भिंती, लाकडी जिने, इटालियन फरशी, मोठ्या मोठ्या खिडक्या, रुंद व्हरांडे यांमुळे ही वास्तू हवेशीर आहे.या वास्तूच्या समोर बाग,सभोवती झाडी यामुळे येथील वातावरण सुंदर आहे.काही अंतरावर रुग्णांसाठी स्वयंपाकघर,कर्मचाऱ्यांसाठी कौलारू घराची रांग असे चित्र होते आज या वास्तूतली रुग्ण सेवा बंद आहे.नवीन इमारतीत ही सेवा सुरू आहे.