चक्रेश्वरवाडी । Chakreswarwadi
येथील शिलावतरुळाची टेकडी आणि तपसा हे क्षेत्र असा दोन अडीच कि.मी.चा परिसर म्हणजे अभ्यासकांसाठी आणि जिज्ञासू पर्यटकांसाठी मोठा खजिना आहे. शिला वतरुळाच्या टेकडीवर पश्चिम बाजूच्या परिसरात विशिष्ट टप्प्यावर शिलावतरुळे असलेले असंख्य पाषाण आहेत. टेकडीवरील शिलावतरुळे किंवा क्षितीजवतरुळ म्हणजे अश्मयुगीन सामुहिक दफनभूमी असण्याची शक्यता आहे. या शिलावतरुळातून अवकाशाच्या अद्भूत आणि विराट दर्शनाची अनुभूती घेण्यासारखीच आहे.गावाच्या मध्यावर रस्त्याच्या डावीकडे चक्रेश्वराचे हेमाडपंथी मंदिर लागते. गावालगतच्या टेकडीवरील चक्राकार शिळांवरुनही या गावाचे नामकरण चक्रेश्वरवाडी झाले असावे. गावाच्या मुख्यरस्तावरुन येणारा रस्ता थेट मंदिरात पोहोचतो येथील मंदिर रचना मुखमंडप, सभामंडप,अंतराळ व गर्भगृह अशी असुन ते त्रिमुखी पुर्वाभिमुखी आहे. मंदिराच्या सभामंडपात दिपमाळेकडे मुख असणारी गणेशाची मुर्ती असुन त्याचे दर्शन आपण मंदिरात प्रवेश करताना होते. त्याच्या मागील तीन नंदी महादेवाचे पिंडीकडे तोंड करुन उभे आहेत. गर्भगृहात रेखीव पिंड आहे. सभागृहात भैरव, कार्तिक स्वामी. महिषासुरमर्दिनी,इ देवतांच्या मुर्ती आहेत. येथे टप्प्यांची रचना असलेले शिखर आढळुन येते. मंदिरासमोर सुबक अष्टकोनी हत्ती व घोड्याच्या मुखांनी अलंकृत गणेशाची मुर्ती असणारी दिपमाळ आहे.प्रतिवर्षी चार – पाच मे रोजी कोवळे सुर्यकिरण शिवलिंगास स्पर्श करते. याच दिवशी शुन्य सावलीचा अनुभव दुपारी १२.३० वाजता दिपमाळेशेजारी घेता येतो. मंदिराच्या स्थापनेच्या काळात मुखमंडप खुला असावा कालांतराने त्याचे बाजुस भिंत घातल्याचे दिसुन येते.या मुखमंडपातील व्दाराजवळील अस्पष्ट शिलालेखावरुन मंदिराचा जिर्णोद्धार वा बांधणी इ. स. १४९९ मध्ये झाली असण्याची शक्यता आहे, मंदिर पंचायतन आहे. वाकोबा. विठठल-रुक्मीणी, महालक्ष्मी अशा देवतांची मंदिरे शेजारी आहेत. येथे महालक्ष्मी मंदिरात महासरस्वती, वीरभद्र, महाकाली सोबत सप्तमातृका असुन त्या वाहनांवर विराजित आहेत. मंदिराच्या डाव्या बाजुस वीरगळ, विविध पिंडी, जुना शिलालेख तसेच गधेगळ आहेत. तसेच उजवीकडे वीरगळ, नागशिळा आहे.
पश्चिम महाराष्टातील प्रत्येक गावात वीरगळी, नागशिळा, सतीशिळा आढळतात. कोल्हापुरच्या बीड व त्याच्या शेजारील गावात मोठ्या प्रमाणात वीरगळी आहेत. गधेगळी या मात्र कोकण परिसरात आढळुन येतात. त्यांचा कालखंड शिलहार राजवटीचा मानला जातॊ. जो शिळेवरील विहीत केलेला नियम हुकुम यांचे पालन करणार नाही त्यांना दगडावर चित्रीत केलेप्रमाणे अभद्र शापवाणी (स्त्रि गधे मैथुन शिक्षा) वचने कोरली आहेत.अशा दोन गधेगळी या मंदिराच्या परिसरात आहेत. मंदिराच्या उजवीकडे चौकोनी पुष्यकरणी असुन ती बारामहिने पाण्याने भरलेली असते तीच गंगाबाब. तेथुन पुढे भुंगिरा आहे (भुंगीरा म्हणजे जमीनी खालील गुहा)त्याचे उत्खनन झालेनंतर एतिहासिक पुराव्यात भर पडेल. या मंदिराच्या डावीकडे अदिलशाही शैलीतील दर्गा आहे. पुढे गावातील ग्रामपंचायतीसमोरील मैदानात दगडी गुंड्या आहेत (गोलाकार गोळ्यसारखे मोठे दगड) या होळी, गावातील जत्रा तसेच रंगपंचमी दिवशी गावातील लोक पाच सात अशा विषम संख्येत प्रत्येकी एका बोटावर उचलण्याचा प्रघात बरीच वर्षांपासुन चालत आलेला आहे. याची माहिती मंदिराचे सध्याचे पुजारी सुरेश गुरव यांनी दिला. त्यामागेही काही खास कारण असण्याची शक्यता आहे, जे आज कालऒघात विस्मृतीत गेले आहे.टेकडी चढुन खालुन दिसणा-या झाडाच्या खाली असणा-या मंदिराजवळ येऊन पोहोचतॊ. यास छत नाही हे ठिकाण शिवालय म्हणुन ओळखले जाते. येथे दोन वर्तुळाकार दगड असुन त्यावर मेगलिथिक बांधकाम शैलीप्रमाणे (500 BCE) दगडी रचना त्यावर वर्तुळ, कंकाळ, प्राणी मनुष्याकृती कोरल्या आहेत. तेथेच पुढे कोडबाव आहे, अभ्यासकांचे मते हे ज्वालामुखी मुख असावे गावातील प्रचलित दंतकथेनुसार या ठिकाणी पुर्वी ज्वालामुखी वाहत होती पुर्वजांनी येथे कपडे घालुन ती बंद केली कदाचित प्राचिन काळी ज्वालामुखी बाबत योग्य माहिती ज्ञात नसल्याने ज्वालामुखी थंड झालेनंतर ही कथा प्रचलित झाली असावी. पुढे या टेकडीवरील सर्वात उंच ठिकाणी शिलावर्तुळ आहे त्यावर उभे राहिल्यास आकाश धरणीला पुर्व – उत्तर ४० कि.मी. व दक्षिण-पश्चिमेस २५ कि.मी. अंतरावर असल्याचे भासते. अवकाश संशोधनाकरता ही जागा उपयुक्त असल्याचे अनेक खगोल शास्त्रज्ञांचे मत असुन त्याबाबत अभ्यास सुरु आहे. येथुन सुर्योदय सुर्यास्त अनुभवणे ही एक पर्वणीच आहे. शिलावर्तुळे म्हणजे दगड गोलाकार रचनेत मांडले जातात. अशी शिलावर्तुळे नागपुर, माहुरझरी इथे आढळली आहेत तेथे झालेल्या संशोधनानुसार ती अश्मयुगीन दफ़नभुमी असावी मृत व्यक्ती पुरल्यानंतर तेथे गोलाकार दगडरुपी स्मारक उभारले जायचे. हेही शिलावर्तुळ अश्मयुगीन स्मारक असावे.
अशाप्रकारे अश्मयुग, मोर्यकाळ, यादवकाळ ते आजअखेरीच्या इतिहासाचे चक्रेश्वरवाडी साक्षीदार आहे. तसेच चक्रेश्वरवाडी दुधगंगा व भोगावती नदीच्या मध्ये असुन येथुन कोकणात जाताना नदी पार करण्याची गरज नसल्याने हा जुना व्यापारी मार्ग असल्याचे वरील पुराव्यांनी अधोरेखित केले आहे. एकमात्र नक्की काळोघात प्रत्येक ठिकाणाचा वापर बदलत गेला.