सिंधुदुर्गातील घाटमाथ्यावर जाण्यासाठी चार घाट मार्ग आहेत. त्यापैकी आंबोली, फोंडा आणि गगनबावडा यांचा वापर सर्वाधिक होतो. तर भुईबावडा घाट काहीसा दुर्लक्षितच राहीलेला आहे. मात्र निसर्गप्रेमीसाठी विशेषत: कोल्हापूर - राधानगरी परिसरातून या घाटात वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी पहायला मिळते.कमी रहदारी, निसर्गसंपन्न प्रदेश, ठिकठिकाणी संततधार पडणारे धबधबे आणि दाट धुक्यांच्या सानिध्यातील हा घाट सौंदर्याच्या बाबतीत थोडा उजवाच आहे. सिंधुदुर्गातून जाताना खारेपाटणच्या अलिकडे मुंबई-गोवा महामार्गावरून रस्ता आहे, तर वैभववाडी तालुक्यातून गगनबावडा घाटात जातानाही थोडीशी वाट वाकडी करून भुईबावडा घाटातून जाता येते. घाटाची लांबी अवघी ९ ते १० कि.मी. असली तरी नैसर्गिक विविधतेमुळे घाटाचे सौंदर्य अधिकच खुलून निघते.
छोट्या-मोठ्या धबधब्याच्या साथीने पुढे जाताना खडकांच्या कपारीत पहीलाच मोठा धबधबा आणि लगत छोटे जलप्रवाह आपले स्वागत करतात.या ठिकाणी पार्किंगसाठीही विस्तीर्ण जागा आहे. रस्त्यासाठी फोडलेल्या या खडकांमधून जागोजागी पाणी वाहते. थंडगार पाण्यात बसून अगदी सुरक्षितपणे धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुटता येतो.घाटमाथा जसजसा जवळ येवू लागतो तशी धुक्याची चादर अधिकच दाट होते.पावसांच्या सरी, सोसाट्याचा वारा आणि धुक्याची पळापळ पाहताना एक वेगळाच आनंद घेता येतो. भुईबावडा घाट जिल्ह्याच्या एका टोकाला असला तरी अलिकडे वर्षा पर्यटनासाठी त्याला पसंती मिळते आहे.धुके कमी असेल तर श्री गगनगिरी महाराजांच्या मठाचे विहंगम दृश्य या घाटातून पहायला मिळते.सिंधुदुर्गातून सुरू होणारा हा रस्ता गगनबावडा एसटी स्टँडजवळ येवून पोहोचतो.संपूर्ण घाटरस्त्याची ही सैर अवघ्या ३०-४० कि.मी. मध्ये पूर्ण करता येते.घाट संपल्या नंतर ऐनारी या गावामध्ये ऐनारी गुहा पाहता येतील.