आज शारदीय नवरात्र महोत्सवाचा पहिला दिवस अर्थात घटस्थापना. परंपरेला अनुसरून करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई ची पहिली बैठी पूजा, हंसा वर बसलेली ब्रम्हाणी रुपात बांधण्यात आलेली आहे
दुर्गा सप्तशती तल्या कथा भागाप्रमाणे चंड मुंड वधानंतर रागावलेल्या शुंभ आणि निशुंभ यांनी उदायुध कंबू कोटीवीर्य धौम्र कालक दौऱ्हृद कालकेय अशा अनेक दैत्यांना युद्धासाठी जाण्याची आज्ञा केली. इतका वेळ कौशिकी च्या रूपाने रणा मध्ये उभ्या असलेल्या जगदंबेला सहाय्य करण्यासाठी सर्व देवांच्या शरीरातून त्या त्या देवाची शक्ती प्रगट झाली त्यापैकी एक म्हणजे ब्रम्हाणी.
ब्रम्हाणी म्हणजे ब्रह्मदेवाची मूर्तीमंत शक्ती हातामध्ये जपमाळा कमळ कमंडलू आणि वेद धारण करणारी ही शक्ती हंसावरती विराजमान आहे. ब्रह्मदेवांना पितामह अशी संज्ञा आहे. पितामह अर्थात आजोबा. चराचर जीव सृष्टी ब्रह्मदेवांच्या मानसिक संकल्पा पासून प्रगट झाली आहे या नात्याने ब्रह्मदेव संपूर्ण सृष्टीच्या निर्मितीचे कारण ठरतात या जीवसृष्टीला निर्माण करण्याची ब्रह्मदेवाची शक्ती अर्थात ही ब्रम्हाणी. ब्रह्माणी च्या वर्णनाप्रमाणे ती हंसावर बसून आकाशातून संचार करत हातातल्या कमंडलू च्या जलाने दैत्यांना निस्तेज करते असे वर्णन सप्तशती मध्ये वाचायला मिळते यावरून ब्रम्हाणी ही मूर्तिमंत सा सामर्थ्याची आणि पुनरूत्पादनाची देवता आहे हे समजून येते देवी कवचामध्येसुद्धा ब्रह्माणीने वीर्याचे रक्षण करावे अशी तिला विनंती केली आहे यावरून सृष्टी निर्मितीच्या बीजाचे सामर्थ्य हे ब्रह्माणीने च्या कृपेने प्राप्त होते. हे समजून येते. नवरात्र हा केवळ देवी उपासनेचा सण नसून स्वतःचे शारीरिक मानसिक आत्मिक सामर्थ्य वाढवण्याचा काळ आहे हे जाणून या मातृकांपैकी सृजनाची देवता असणाऱ्या ब्रम्हाणी रूपात आज करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई सजली आहे असुरांचे पुनर्निर्मितीचे तेज स्वतःच्या कमंडलू च्या जलाने नष्ट करणारी ब्रम्हाणी रुप नारायणी आपल्या सर्वांचे रक्षण करो हीच जगदंबा चरणी प्रार्थना
श्री मातृचरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीकः