शालिनी पॅलेस
पर्यटकांचे व कोल्हापुरकरांचे आवडते ठिकाण म्हणजे रंकाळा तलाव व रंकाळा चौपाटी.या रंकाळा तलावाच्या पश्चिम काठावर,कोल्हापूर संस्थानच्या राजकन्या श्रीमंत शालिनी राजे यांच्या प्रीत्यर्थ,इ. सन. १९३१-३४ दरम्यान आठ लक्ष रूपये खर्च करून शालिनी महालाची बांधणी करण्यात आली.शहाजी छत्रपती महाराज व प्रमिलाराजे यांच्या शालिनी कन्या,सध्याचे शाहू छत्रपती महाराज यांच्या या आई.छत्रपतींच्या कन्या श्रीमंत शालिनीराजे यांचे नाव या वास्तूला देण्यात आले.या राजवाडय़ाची भव्य वास्तू मध्ययुगीन पद्धतीची आहे.ही इमारत दुमजली असून आयताकृती आहे.तिच्या चारही बाजूच्या कोपर्यावर चार चौकोनी मनोरे असून त्यांच्यावर घुमट आहेत. मुख्य दरवाजाच्या दर्शनी बाजूला आणखी एक चौकोनी मनोरा असून तो इतर मनोर्यांपेक्षा उंच आहे. या चौकोनी मनोर्यावर अनेक कोन असलेला आणखी एक मनोरा असून त्याला सुबक बांधणीच्या स्तंभाचा आधार आहे.या मनोर्याच्या वरच्या बाजूला घुमट आहे.काचेचे नक्षीकाम व मनो-यावरचे घडयाळ यामुळे या वास्तूचे सौदर्य खूप सुंदर दिसते.
या वास्तूच्या बांधकामात काळया दगडामधे कोरलेले नाजूक नक्षीकाम आहे.तसेच इटालियन संगमरवराचा नक्षीकामाकरिता उपयोग केला आहे.महालाचे दरवाजे लाकडाचें असून,त्यात बेल्जियमची काच वापरून,त्या काचेच्या दरवाज्यावर कोल्हापूरच्या महाराजांची प्रतिमा आहे.राजवाडय़ाच्या अंतरंगात अनेक दालने असून अत्यंत कलात्मकरित्या उत्तम सजावटीने सजवली आहेत.भव्यता, देखणेपण व वास्तुशिल्पातला एक अभ्यासनीय नमुना म्हणून शालिनी पॅलेसची ख्याती आहे.पॅलेसच्या बाहेर सुंदर गार्डन आहे.काही काळ या ठिकाणी हॉटेल सुरू झाले.त्यानंतर अनेक चित्रपटांचे चित्रीकरण इथे झाले.सध्या हि वास्तू आतून पाहण्यासाठी बंद आहे.