कोटीतीर्थ । Kotitirth
अगस्ती मुनी व माता लोपामुद्रा पंचगंगेच्या तीरावर निवास करून दुसऱ्या दिवशी माता लोपामुद्रा सह श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन केले.त्यानंतर काशी विश्वेश्वर श्री रंकभैरव,महर्गल,कुंडलेश्वर, कुक्कुटेश इ. देवाचे दर्शन केले व मनकर्निका तीर्थावर स्नान केले.श्री रंकभैरव,महर्गल,कुंडलेश्वर ही मंदिरे सध्या महालक्ष्मी परिसरामध्ये आहेत तर कुक्कुटेश्वराचे मंदिर टाऊनहाँल परिसरामध्ये आहे.अंतगृह यात्रेचा संकल्प करून ब्रम्हेश्वराची पुजा केली,सध्या ब्रह्मेश्वर लिंग हे निवृत्ती चौकापासुन काही अंतरावर पहायला मिळेल.करवीर क्षेत्राच्या पूर्वेस अर्ध कोसावर असलेल्या मलापकर्षण तीर्थांत स्नान व मलापकर्षणेेेेेश्वराची पुजा केली.मळलेली वस्त्रे टाकून व दुसरी वस्त्रे नेसुन कोटीतीर्थावर आले. कोटीतीर्थ हे गोमती संगमाच्या पूर्वेस व मलापकर्षण तीर्थाच्या पश्चिमेस आहे सध्याचा हा परिसर उद्योग नगरातील भारत बेकरी ची पाठीमागची बाजू, मंदिरामध्ये कोटेश्वराचे शिवलिंग आहे.कोटीतीर्थाचे महात्म्य सांगण्याबद्दल लोपामुद्रेने विनंती केली त्यानंतर अगस्तीमुनी ही कथा सांगू लागले,पूर्वी कोटीतीर्था चे नाव पुष्करेेेेेश्वर होते,येथे स्नानाने व पिंडदानाने पितरांना मुक्ती मिळते.पूर्वी तेहतीस कोटी देव व सहासष्ठ कोटी असूर यांची याठिकाणी लढाई होवून दैत्यांनी देवांना पराभूत केले असता देवांनी श्री महालक्ष्मीची प्रार्थना केली त्यानंतर श्री महालक्ष्मी आपले गण,रंगभैरव,महर्गल,सिद्धबटुक,काळ वेताळ,नवकोटी सख्यांसह कात्यायनी योगिनी यांनी घेवून आली.महालक्ष्मीने दैत्यां बरोबर युद्ध केले तेव्हा दैत्यांचा पराभव होवून ते असुर दशदिशेस पळत सुटले.हे पाहुन देवीेने असुरांना अभय दिला.असुर देवीला म्हणाले भगवती आता आम्हाला आमच्या जिवाची आशा नाही,आलेल्या मृत्यूने स्वर्गाची दारे खुली होतात,आमची एकच इच्छा आहे की तुझ्या हातून आम्हाला मृत्यू यावा म्हणजे आम्हाला मुक्ती मिळेल हे ऐकून महालक्ष्मी देवी म्हणाली की तुमचे शौर्य पाहून मी संतुष्ट झाले आहे तर इच्छित वर मागा,असुर म्हणाले देवी या पुष्कर तीर्थावर तु आमचा वध कर हे तीर्थ कोटीतीर्थ म्हणून प्रसिद्ध होऊ दे,सर्व तीर्थामध्ये हे तीर्थ श्रेष्ठ होउ दे,पिंडदानाने पितरांना गती मिळू दे तथास्तु म्हणून देवीने त्यांना मुक्ती दिली व तेव्हापासून कोटीतीर्थ हे शिवलिंग व येथील तीर्थ प्रसिद्ध झाले अशी कथा करवीर महात्म्य अध्याय क्रमांक एकोनतीस मध्ये आहे.कोटेश्वर मंदिर ला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत मुख्य प्रवेशद्वार हा उद्यमनगरातून भारत बेकरी च्या पाठीमागे एक रस्ता आहे तो थेट मंदिरापाशी जातो तर दुसरा मार्ग हा श्री स्वामी समर्थ मठ येथून आहे,मंदिरामध्ये प्रवेश करताच उजव्या बाजूला आपल्याला श्री हनुमानाची दोन फुट उंचीची दगडामध्ये कोरलेली सुंदर अशी मूर्ती आहे, तसेच श्री गणरायाची मूर्ती आहे.पायर्या उतरून आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो शेजारीच आपल्याला कोटेेेेेेेश्वराचे तीर्थ पाहायला मिळते,मंदिर हे प्राचीन असून जुने मंदिर आहे तसेच ठेवून मंदिराची डागडुजी केली आहे.मंदिरामध्ये श्री कोटेश्वराचे शिवलिंग आहे.मंदिर हे पूर्व दिशेला आहे तर शिवलिंगाची दिशा नेहमीप्रमाणे उत्तरेला आहे. मंदिराभोवती खूप झाडे असल्यामुळे येथील येथील परिसर सुंदर आहे.मंदिराच्या बाहेर आपल्याला चार वीरगळी पहायला मिळतात.सध्या कोल्हापूर मध्ये काहीच तीर्थे शिल्लक राहिले आहेत कोल्हापूरातील नागरिकांना इतकीच विनंती आहे की येथील ही प्राचीन तीर्थे आहे तशीच व्यवस्थित
राहू देत.कोल्हापूर पासून काहीच अंतरावर असल्यामुळे हे मंदिर व येथील तिर्थ अवश्य पहावे व येथील परिसर अबाधित ठेवावा.