आली गौराई पाहुणी - 3
रात्रीची जेवणं झाली की हळू हळू एकमेकींना हाका घालायला सुरुवात होते. खरंतर प्रत्येकजण या हाकेची वाटच बघत असते. एरव्ही थांब माझ्या बाळाला… ची कारणं देणाऱ्या सगळ्या लहान थोर चिमण्या भुर्रकन दारात गोळा होतात. फुगडी, काथवट कणा, गाठोडे अशा लहान मोठ्या खेळांना सुरूवात होते. तोवर इकडं जाणत्या बायका कान उघडायला सुरूवात करतात. ही कान उघाडणी म्हणजे भानोरा वाजवणे. गौरीच्या कानावरचा पदर थोडासा बाजूला करतात एका परातीवर राख किंवा रांगोळी घालून त्यावर लाकडी रवी आणि उलाथन मागं पुढं ओढतात. एक छान घुमारा घुमतो कापूर लागतो एव्हाना झिम्म्याचे फेर गाणी टिपेला पोचतात. बारा वाजतात तसं लक्ष गौरीच्या येण्याकडे लागतं. श्रद्धा म्हणा अंधश्रद्धा म्हणा पण या खेळाचा हा एक मोठा भाग गौरीचा संचार. आणि गौर संचरते पुन्हा आगत स्वागत होतं काय ल्यालीस? कशी आलीस ? असं सगळं विचारून तिला खेळवतात. खेळता खेळता गौरी गणपती जवळचा गणोबा खेळायला आणते. गण्या फू म्हणत आपलं बाळ घेऊन खेळायला लागते. अपत्य प्राप्तीची ओढ असणाऱ्या महिला पदर सावरून घेतात खेळता खेळता गौरी गणोबा एखादीच्या ओट्यात घालते. जीला मिळाला ती तृप्त होते. अशा अनेक समजूती या खेळाशी जोडलेल्या . सगळ्या सखी साजणींना उत्तरं देऊन पहाटे संचार उतरतो. दुसरा दिवस उजाडतो तोच मुळात निराश स्वर घेऊन. दोन दिवस फुललेला गौरीचा चेहरा आज उतरलेला बघून पाय आपोआप कोनाड्यात गच्च भरलेल्या हळदीकुंकवाच्या वाट्यांकडे धावतात आणि नजर त्यावर गौरीच्या बोटांच्या खुणा शोधते. असं म्हणतात गौरा खेळत असतानाच शंकर दारात उभा असतो चल म्हणून तीचं खेळून झालं की ती जाते पहाटेच उरते फक्त मूर्ती. मग सुरू होते दोरे घ्यायची घाई. घरच्या रिती प्रमाणे खारीक खोबरे पान भोपळ्याच फुल पान अशा वस्तूंच्या गाठी मारून दोरे घेतले जातात. खरंतर हे व्रत तीन अष्टमीचं भाद्रपद शुक्ल , कृष्ण आणि अश्र्विन शुक्ल तीन अष्टमीला देवीची पूजा करून घागरी फुंकायच्या आणि अश्र्विन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी अर्थात भूमीपूजनाच्या दिवशी ते दोरे शेतात विसर्जित करायचे. या व्रतात भरपूर फरक पडून आता कृष्ण अष्टमीला कुणी देवी बसवत नाही तर अश्र्विन शुक्ल अष्टमीला फक्त चित्पावन कुटुंबात मुखवट्याची पूजा होते. सकाळी आरती झाली की वोवसा उघडला जातो सुगडातलं धान्य मोजून घेतलं जातं. काल भरताना होत त्याहून चिमुटभर का होईना अधिक येतं अशी समजूत आहे. त्याच तांदळाचा भात त्यावर दही घालून शिदोरी बांधली जाते. दुपारची जेवणं होऊन चार ची वेळ झाली की मन कातर होतं कापत्या स्वरात आरती होते. या आरतीनं जगन्नियंत्या बरोबर जोडलेला मानवी नात्यांचा बंध विरघळतो आता ते पुन्हा देव आणि आपण भक्त ! पुन्हा पुन्हा आपण म्हणत राहतो पुढच्या वर्षी लवकर या …