लक्ष्मी-विलास पॅलेस
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मस्थळ अशी ओळख असलेली लक्ष्मीविलास पॅलेस हि वास्तू कसबा बावड्याच्या कागलवाडी नावाने ओळखल्या जाणाऱ्या परिसरात आहे.या वास्तूंच्या रूपाने कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहूंचे कार्य स्थायी, शाश्वत स्वरूपात कायम आहे.नदीच्या लगत थोडे उंचावर असलेल्या या परिसरात कौलारू,मजला नसलेली ही प्रशस्त इमारत वाड्यासारखी आहे.अर्ध गोलाकार व्हरांड्याला षटकोनी आकाराचे खांब, त्याच आकाराला जोडणाऱ्या भव्य खिडक्या आणि मोठे दरवाजे असलेले अर्ध गोलाकार दालन आहे.पश्चिमेकडून पोर्चमधून या दालनात प्रवेश करता येतो. त्यामागे तीन-चार पायऱ्यांवर पुन्हा एक दालन तिन्ही बाजूला दरवाजे आणि खिडक्या आहेत,ही खोली छ. शाहू महाराजांचे जन्म ठिकाण होय.डाव्या बाजूला एक मोठे दालन आणि उजव्या बाजूस इतर तीन-चार मोठी दालने असणारी हि जोड इमारत आहे.यात कुस्तीच्या आखाड्याची खोली आहे.तसेच परिसरात इतर आणखी तीन इमारती असून, त्या या पॅलेसचा भाग आहेत.ही इमारत नेमकी कधी बांधली,याचा तसा तपशील मिळत नाही.
छत्रपती शाहू महाराजांचे आजोबा राजाराम महाराज यांना राजवाड्याच्या बाहेर शिक्षण मिळावे, म्हणून हा बंगला बांधला होता.तो नंतरच्या काळात कागलकर घाटगे यांना देण्यात आला.२६ जून १८७४ रोजी छ. शाहू महाराजांचा जन्म झाला. १८७६ मध्ये त्यांचे बंधू पिराजीराव यांचा जन्म झाला.अवघ्या एका वर्षात १८७७ मध्ये त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले आणि २० मार्च १८८६ रोजी त्यांचे वडील जयसिंगराव यांचे निधन झाले.छ. शाहू महाराजांचे व पिराजीराव यांच्यातील भावांचे नाते अगदी सुरवातीपासून शेवटपर्यंत जवळकीचे व आदर्श राहिले.