चक्रेश्वर वाडी कोल्हापूरपासून साधारण ४१ किलोमीटर अंतरावरील गाव राधानगरी मार्गे किंवा गारगोटी मार्गे असे दोन मार्ग या गावास जातात.आता शिवगडाच्या भ्रमंतीच्या निमित्ताने या भागात आल्यामुळे तिकड जायचे ठरवले.चक्रेश्वरवाडीकडे या गावातील पांडवकालीन शिवमंदिराविषयी मी आदी ऐकून होतो.कसबा तारळे – गुडाळवाडी – खिंडी व्हरवडे या मार्गाने आम्ही जात होतो. वाटेत एक छोटासा घाट हि लागला तिथून राधानगरीचे अप्रतिम सोंदर्य दिसत होते.आजूबाजूचाही निसर्ग हि अप्रतिम होता.साधारण १० किलोमीटरचा प्रवास करत आम्ही पोहोचलो चक्रेश्वरवाडीत. गावाच्या सुरवातीसच एक आजोबा भेटले गाड्या थांबवून त्यांच्या कडे पांडवकालीन मंदिर कुठे आहे याची विचारपूस केली.पण त्यांनी सांगितले को खूप जुन्या काळातील ती दगडे आहेत व त्या दगडांवर चक्रासारख्या काही खुणा कोरल्या आहेत. त्यामुळेच ह्या गावास चक्रेश्वरवाडी असे नाव पडले असेही त्यांनी सांगितले.बाकी त्यांनी आणखी थोडी माहिती सांगितली पण खेडेगावांमध्ये दंतकथा हि खूप असतात अशीच थोडीफार माहिती त्या आजोबांनीही सांगितली.आम्ही प्रथम गेलो पांडवकालीन शिवमंदिरामध्ये हे मंदिर जुने व हेमाडपंथी स्वरूपाचे होते. एका छोट्या दरीच्या कड्यावर हे मंदिर उभे होते. मंदिराच्या समोरच भव्य मोठी अशी दीपमाळ उभी होती. त्यानंतर थोडे खाली पायऱ्या उतरून गेले कि आपण मंदिरात जातो. मंदिरात प्रवेश करताच डाव्या हातास एका छोट्या मंदिराच्या गाभाऱ्यात देवी देवतांच्या अनेक मूर्ती ठेवलेल्या आहेत. तिथूनच पुढे मंदिरात प्रवेश करताच प्रथम दर्शन होते ते गणपती बाप्पांचे. अतिशय सुंदर अशी गणरायाची मूर्ती सभामंडपातील नंदीच्या पाठमोरी बसलेली आहे. ह्या सभामंडपात नंदीच्या एकसलग अशा ३ मूर्ती आहेत व त्यांच्या मागे गणपती बाप्पा. मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून हेमाडपंथी रचनेच्या अनेक खांबांवर उभा आहे. सभामंडपातील उजव्या हातास पुन्हा ३ मुर्त्या उभ्या आहेत. त्यानंतर मुख्य गाभाऱ्यात श्री शंभू महादेवाचे शिवलिंग आहे .
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
मंदिराच्या बाहेर डाव्या हातास एक पिण्यायोग्य पाण्याचा कुंड आहे. त्याशेजारीच पुन्हा एक छोटे मंदिर आहे. त्या बाहेरही काही शिळा व नागेश्वराची मूर्ती आहे. तसेच मंदिरासमोरील एका सिमेंटच्या कठड्यावर काही ४ ते ५ शिवपिंडी ठेवलेल्या आहेत. आम्ही शंभू महादेवाचे दर्शन घेतले व बाहेर आलो.तिथे मंदिराच्या इतिहासाविषयी काही लोकांकडे विचारणा केली पण कुणाकडूनच समाधानकारक उत्तर मिळाले नाही. मंदिरातून बाहेर आलो व समोर उभ्या असलेल्या काही मंडळींना त्या अश्मयुगीन दगडांविषयी विचारणा केली त्यांनी समोरच बोट करून एक छोटी टेकडी दाखवली त्या टेकडीवर ते खडक होते.आम्ही मुख्य रस्त्यास आलो समोरच एक दगडी विहीर होती तिथूनच एका कच्चा रस्ता टेकडीकडे जात होता. आम्ही गाड्या घेऊन गेलो त्या रस्त्याने पण गाड्या निम्म्या वाटेपर्यंतच गेल्या. तिथून पुढे मात्र चालत गेलो. टेकडीवर पोहोचताच एक छप्पर नसलेले छोटे दगडी बांधकामातील देऊळ दिसले. देवळाशेजारीच एक मोठे व उंच झाड आहे. ह्या टेकडीवरील हे एकच सर्वात उंच झाड आहे. खालून गावातून सुद्धा लोक ह्या झाडाची खून सांगतात व त्याखाली हि दगडे आहेत अशी माहिती देतात. ह्या झाडाभोवती दगडी कट्टा हि बनवण्यात आला होता. देवळासमोर लांबलचक व मोठ्या दगडांची रास लावून चौकोन तयार केला आहे.आजूबाजूस सर्व लहान लहान झुडपे आहेत.या मंदिराच्या आत पहिले तर दोन मोठी दगडे जमिनीत रुतली होती व त्या दगडांवर काही ठिकाणी पूर्ण गोल व काही ठिकाणी अर्धवट गोल असे चक्राच्या स्वरूपात कोरले होते. तिथे कुणीतरी फुले वाहून पूजा हि केली होती तर काही पितळी घोड्याच्या लहान मूर्ती हि ठेवल्या होत्या आम्हाला नेमके काय ते समजलेच नाही. मग आम्ही बाकीची दगडे शोधू लागलो पुस्तकामध्ये त्या दगडांचे व त्यावरील काही वेगळ्या प्रकारच्या खुनांचे फोटो होते.
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
आम्हाला ती दगडे पाहायची होती. टेकडीचा आकार लहान होता पण खूप झाडी होती.आम्ही शोधत टेकडीच्या मधोमध पोहोचलो तिथे दगडांचे गोल असे उंचवट्यासारखे काही बनवले होते ते हि न समजण्यासारखे. खूप वेळ शोधाशोध केली पण ती दगडे काही सापडली नाहीत. समोरच शेतामध्ये काही मोर मात्र दिसले. पुन्हा त्या छप्पर नसलेल्या मंदिराजवळ पोहोचलो. वेळ हि खूप झाला होता अजून तापसा लेणी हि पाहायची होती. त्यामुळे खाली जाऊ लागलो व उताराच्या वाटेस थोर अंतर गेल्यावर एका दगडावर काही खुणा दिसल्या. आम्ही लगेच तिथे पोहोचलो व पाहू लागलो तर तेथील सर्व दगडांवर वेगवेगळ्या प्रकारच्या खुणा अर्ध चक्रे काढली होती हि सर्व दगडे टेकडीवरील त्या मंदिराच्या मागील बाजूस उतारतीस होती. आम्ही पुस्तकात जे फोटो पहिले होते तशा प्रकारचीच सर्व दगडे होती ती. या ठिकाणाविषयीची आम्हाला मिळालेली माहिती अशी कि चक्रेश्वरवाडी या गावात अशमयुगीन, तसेच प्राचीन संस्कृतीच्या विविध टप्प्यातील अवशेष सापडले आहेत येथे प्राचीन शिवलिंगाचे अवशेष सापडले आहेत.चक्रेश्वरवाडी तसेच शिलावर्तुळाकार टेकडी व तापसा गुंफा हा अडीच कि.मी. चा परिसर अभ्यासकांसाठी खजिना आहे. या शिलावर्तुळाकार टेकडीवर शिलावर्तुळाकार असलेले अनेक दगड आढळतात हि टेकडी आशमयुगीन दफनभूमी असण्याची शक्यता आहे. आणखी काही दगडे पाहायची होती. पण सूर्य मावळतीला लागला होता पुन्हा नंतर कधी तरी यायचे हा विचार करून परत गावात आलो. व लेण्यांची विचारणा केली तर माहिती मिळाली कि लेणी थोड्या लांब अंतरावर होती व गाडी हि जात नव्हती चालत जाण्यास साधारण २० मिनिटे लागणार होती व तेवढ्यात अंधार हि पडला असता म्हणून मग पुन्हा नंतर परत एकदा या गावात भटकंतीला यायचे हे मनात पक्के केले व लागलो पुन्हा परतीच्या प्रवासाला कोल्हापूरकडे ..
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});