सोमेश्वर लिंग सोमेश्वर तीर्थ । Someshwar
महर्षी पराशरमुनी करवीर क्षेत्री आले होते याची कथा अगस्तीमुनी माता लोपामुद्राला सांगत आहेत.पराशरमुनी यांनी गयाश्राद्ध,प्रयाग,काशी या त्रीस्थळांचे दर्शन घेऊन अष्टलिंगाचे दर्शन घेवून करवीर निवासनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले त्यानंतर करवीर पासून वायव्येस असलेला ब्रह्मगिरी पर्वत म्हणजेच आजचा दुर्ग पन्हाळा परिसर या ठिकाणी आले.पुर्वी ब्रह्मदेवांनी प्रजा निर्मिती साठी तपश्चर्या केली होती व त्या ठिकाणी सोमेश्वर नावाने शिवाचे लिंग स्थापन केले होते,सर्व तीर्थे आणून सोमालय तीर्थ निर्माण केले या तीर्थाला व गिरीला असे वरदान दिले की इथे जो कोणी तप करेल तो सर्व पापातून मुक्त होईल ज्याची कामना आहे ती पूर्ण होईल.सोमेश्वर लिंगा पासून जवळच श्री ब्रम्हेश्वराचे शिवलिंग आहे.महर्षी पराशरमुनींंनी श्री सोमेश्वराची पूजा करून तिथे एक आश्रम बांधला पत्नी सत्यवती सह राहू लागले अशी कथा करवीर महात्म्य अध्याय क्रमांक नववा व अठरावा या मध्ये आहे.शिवछत्रपती श्री शिवाजी महाराजांनी श्री सोमेश्वराची पूजा केली व शिवलिंगाला फुले वाहिली आहेत.कोल्हापूर पासून सोमेश्वराचे मंदिर साधारण 18 ते 19 किलोमीटर अंतरावर आहे,हे मंदिर तहसील कार्यालयाच्या समोर आपल्याला पाहता येईल. प्राचीन असे हे मंदिर आहे,मुख्य रस्त्याच्या साधारण दहा ते पंधरा फूट खाली हे मंदिर आहे व शेजारीच सोमेश्वराचे तीर्थ आपल्याला पहायला मिळेल.पायरया उतरून आपण मंदिरांमध्ये पोहोचतो.मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला नंदी व स्वतंत्र शिवाचे लिंग दिसते,मुख्य गाभार्यात श्री सोमेश्वराचे शिवलिंग आहे. मुळ मंदिर आहे तसे ठेवून मंदिराची इतर डागडुजी केली आहे.प्राचीन मंदिर व या परिसरामध्ये अनेक तिर्थे यांची अनुभूती घेण्यासाठी कोल्हापूर पासून काहीच अंतरावर असल्यामुळे हे मंदिर व येथील तिर्थे अवश्य पहावे.