विल्सन पूल
छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकीर्दीत शाहूपुरी या नव्या व्यापारी वसाहतीला जोडणारा जयंती नाल्यावरील ( करवीर महात्म मध्ये याचा उल्लेख जिवती नदी असा आहे ) पूल बांधून अवजड वाहनांना, वाहतुकीला नवा मार्ग सुरू करून दिला. यामुळे शहराचा विस्तार होण्यास सुरुवात झाली.फेरिस मार्केट (सध्याचे शिवाजी मार्केट) पासून सुरू झालेला हा रस्ता रविवार गेट (बिंदू चौक) ते शाहूपुरी पक्का रस्ता बनविण्यात आला. तो २५ फूट रुंदीच्या तीन कमानींचा पूल जयंती नाल्यावर बांधून त्यास जोडण्यात आला.
योग्य आणि पायासाठी सुरक्षित जागा मिळावी म्हणून नाल्याची लांबी सरळ करण्यात आली.पुराच्या काळात पाण्याची फूग तीन फुटांपर्यंत येते ही बाब लक्षात घेऊन या आधीच्या स्टेशन रोडवरील पुलापेक्षा उंची अधिक ठेवण्यात आली. पुलाच्या दोन्ही परापेट्समधील अंतर ४० फूट असून ३० फूट रुंद प्रत्यक्ष रस्ता आणि दोन्ही बाजूला फूटपाथ बांधण्यात आले. या बांधकामासाठी ७० हजार रुपये खर्च आला.वाहतुकीसाठी या पुलाचे उद्घाटन मुंबई गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांच्या हस्ते १३ एप्रिल १९२७ रोजी करण्यात आले. आजही भक्कम स्वरूपात हे बांधकाम असून त्याचे स्थापत्य सौंदर्य उत्कृष्ट आहे.त्या काळातील बिडाचे रेलिंग आजही कायम आहेत.करवीर माहात्म्य मध्ये उल्लेख असलेले फलगुलेश्वर मंदिर याच पुलाखाली आहे.नाल्याच्या प्रवाहाच्या दिशेने पुढे छत्रपती संभाजी पूल आहे.