मूळ मंदिर (संस्कृत) या संज्ञेचा अर्थ घर. मराठीत तो देवालय असाही होतो. मानवी जीवनाचे नियंत्रण करणाऱ्या, त्याच्यावर कमीअधिक प्रमाणात प्रभाव पाडणाऱ्या अतिमानवी शक्ती म्हणजेच देवदेवता, अशा प्रकारची श्रद्धा जगातील अनेक समाजांत आढळते. या देवदेवतांचे प्रतीकरूपाने अथवा मूर्तींच्या रूपाने भाविकास दर्शन घडवणारे स्थळ म्हणजे मंदिर होय. मंदिरात दैवी शक्ती व सामर्थ्य यांचा प्रत्यय येतो, अशी सर्वसामान्य श्रद्धा असते. अतिप्राचीन काळापासून जगात सर्वत्र मंदिरे बांधलेली दिसतात. मात्र त्यांच्या स्वरूपात फार मोठे वैविध्य आढळते.