दक्षिण व उत्तरेकडील पश्चिम घाटाला जोडणारा सह्याद्रीमधील हा महत्वाचा जंगलपट्टा आहे. याचा निमसदाहरित जंगलात समावेश होतो. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेस असणाऱ्या राधानगरी अभयारण्याचा परिसर 351 चौ.कि.मी.चा आहे.याची समुद्रसपाटीपासूनची ऊंची 900 ते 1 हजार फूट असून येथे सरासरी पर्जन्यमान 400 ते 500 मि.मी आहे. दाजीपूरचे जंगल हे राधानगरी अभयारण्याचाच एक भाग आहे. कोल्हापूर संस्थानचे महाराष्ट्र राज्यात विलीनीकरण झाल्यानंतर 1958 ला दाजीपूर जंगलाची दाजीपूर गवा अभयारण्य म्हणून नोंद करण्यात आली. हे महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि पहिले अभयारण्य आहे. राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या भोवतीच्या जंगल परिसराला 1985 ला राधानगरी अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. येथील घनदाट जंगलाचे पट्टे डंग या नावाने ओळखले जातात. येथील डोंगरमाथ्यावर जांभ्या खडकांचे मोठे सडे आहेत. सड्यांवर व सड्यांच्या भोवताली असणाऱ्या दाट जंगलामधील जैवविविधता प्रचंड संपन्न अशी आहे