सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आंबोली घाटमाथ्याला हा घाट रस्ता आपणास घेऊन जातो. महाराष्ट्रातील महत्वाचा असा हा मार्ग आहे.पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकाला जोडणारा हा मार्ग आहे. सुमारे शंभर वर्षांपूर्वी बांधला गेलेला हा घाट मार्ग अजूनही सुरक्षित आहे.या रस्त्याने प्रवास करताना आजूबाजूचा निसर्ग पहात घाटातील नागमोडी वळणे पार करणे म्हणजे एक आनंदाचा ठेवा ठरतो.पावसाळ्यात तसेच जोडून येणार्या सुट्टीला येथे पर्यटकांचा ओघ सुरु असतो.दाट जंगले, दर्या खोर्यांचा नयनरम्य देखावा असे अमर्याद सृष्टीसौंदर्य येथून पाहता येते आणि घनदाट जंगलातून मनमुराद भटकंती करण्याचा आनंद पर्यटकांना घेता येतो.
आंबोलीतील वार्षिक पर्जन्यमान सरासरी ३५० सेंटीमीटर इतके असते. आंबोलीतील पारपोली येथील धबधबा हा सर्वात मोठा धबधबा आहे.नांगरतास धबधबा आणि हिरण्यकेशी नदीचे उगमस्थान सुद्धा आंबोलीतील पर्यटन स्थळ म्हणून पुढे आलेले आहे. महाराष्ट्रातील सह्याद्री डोंगर रांगेत असलेल्या आंबोली घाटात सर्वात जास्त धबधबे, घाटवळणाचे रस्ते यासाठी प्रसिद्ध आहे. म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्हातील आंबोली घाट हा पर्यटकांचे व निसर्ग प्रमींचे आवडते पर्यटन ठिकाण बनलेले आहे.आंबोली येथील महादेव गड, कावळे साद, शिरगांवकर, नट, सावित्री, सनसेट, पूर्वीचा वस असे असंख्य पॉईन्ट अहेत. हिरण्यकेशी नदीचा उगम येथूनच होतो. महाशिवरात्रीस तर भाविकांचा ओघ येथे वाहत असतो. असे हे आंबोलीचे ठिकाण सर्वच ऋतुत आल्हाददायक आणि हवेहवेसे वाटणारे आहे.