चंदगड तालुक्यातील तिलारी गावाचे चांगले वातावरण, बोचणारा गार वारा यामुळे याला प्रति महाबळेश्वर असेही म्हणतात.तिलारी हा परिसर अतिशय घनदाट जंगलाचा व पाणी असलेला भाग असल्याने येथे पट्टेरी वाघ, हत्ती ( कर्नाटकातून स्थलांतरित झालेले ), घाट माथ्यावर दिसणारा बिबट्या, गवा ( सकाळी ८ ते सायंकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान जंगलाच्या कोणत्याही वळणावर अथवा पाणवट्यावर दिसतो.), मोर- लांडोर, सांबर, रानकुत्री, कोल्हे, भेकर, हरीण, साळींदर हे प्राणी दिसतात. त्याचबरोबर मोठे जंगल असल्याने अनेक जातीचे दुर्मिळ पक्षीही पाहता येतात.पश्चिम घाट माथ्यावरचे व पश्चिम दिशेला वाहत जाणाऱ्या आणि पुढे गोवा मार्गे अरबी समुद्राला मिळणाऱ्या तिलारी नदीवर महाराष्ट्र शासनाने बनविलेले धरण म्हणजे तिलारी. हे ६५० मीटर उंचीवर असून दाट जंगलातील वीज निर्मिती प्रकल्प आहे.धामणे या गावात ३८.५ मीटर उंचीवर दगडी धारण आहे तर याच्या जलाशयाचा विस्तार हा तुडये, हाजगोळी गावापर्यंत आहे.या धरणाच्या पाण्याचा वापर करून कोदाळी गावाच्या जवळील घाटात भूगर्भात वीजनिर्मिती केली जाते. पूर्वी हे सहज पाहता येत होते पण आता यासाठी पूर्व परवानगी घ्यावी लागते.