आगळा सोहळा बंधू भेटीचा कोल्हापूरच्या जुन्या गावकीचा कोल्हापूर हे आदिशक्तीचे शक्तीपीठ, छत्रपतींच्या स्वराज्याची राजधानी, राजर्षी शाहूंचे पुरोगामी कोल्हापूर, कलापुर, उद्योगनगरी अशा अनेक बिरुदावलीने नटलेलं असलं तरी कोल्हापूरने स्वतःचा ग्रामीण असा बाज कायमच जपला आहे.मूळचं सहा खेड्यांचा कोल्हापूर महाराणी ताराबाई सरकारांनी राजधानीचा दर्जा दिला आणि पुढे श्रीक्षेत्र कोल्हापूर राजधानी करवीर झाले. तत्पूर्वी रावणेश्वर पद्माळा ब्रह्मपुरी अशा सहा छोट्या-छोट्या खेड्यांची स्वतंत्र अशी गावची व्यवस्था. यातच करवीर निवासिनी च्या मंदिराच्या पूर्वेला असलेल्या रावणेश्वर तळ्याच्या काठावर वसलेल्या वस्तीची ही कथा .कुठल्याही गावाला असतो त्याप्रमाणे एक तळ्याकाठचा महादेव ग्रामदेवता अर्थात मुक्तांबिका आणि क्षेत्राचे रक्षण करणारा भैरव.आजही साठमारी च्या परिसरामध्ये मुक्तांबिका मंदिर नवदुर्गा मध्ये प्रसिद्ध आहे. याच मंदिराच्या परिसरात देवीच्या उजव्या हाताला रस्त्याच्या कोपऱ्यावर एका छोट्या मंदिरात श्री काल भैरव आणि भैरवनाथ अशा दोन सुंदर मूर्ती आहेत. सिंदूर चर्चित अशा भैरवनाथांच्या मूर्तीच्या हातात खड्ग दंड त्रिशूल आणि पानपात्र.तर कालभैरव यांच्या हातात खड्ग त्रिशूळ डमरू धनुष्य असलेल्या दोन सुंदर मूर्ती इथं विराजमान आहेत. दरवर्षी नवरात्र भैरव अष्टमी या बरोबरच इथला आणखी एक आगळा उत्सव सुरु होतो तो माघ पौर्णिमा. माघ पौर्णिमेदिवशी सकाळी देवांना अभिषेक घालून अलंकार केले जातात . सगळ्यांना ओढ असते ती संध्याकाळची सूर्यास्ताच्या वेळेला देवांचे मुखवटे सजवून पालखी मध्ये विराजमान केले जातात. चांगभलं आणि वाद्यांच्या गजरात नाथांच्या पालख्या गोमतीच्या काठावर असलेल्या अर्थात गोखले कॉलेज च्या आणि हुतात्मा पार्क च्या मध्यभागी असलेल्या पुलाजवळच्या पादुकांच्या ठिकाणी म्हणजे नाथांच्या मुळ स्थानाजवळ जातात. तिथून त्या मार्गस्थ होतात ते थेट रंकभैरव मंदिराकडे भैरव अर्थात कोल्हापूरचा कोतवाल करवीर निवासिनी क्षेत्राच्या संरक्षणासाठी स्थापन केलेल्या भैरवाचा प्रधान असलेल्या या स्वरूपाची भेट घेण्यासाठी दोन्ही मूर्ती मिरजकर तिकटी मार्गाने नगारखान्यातून रंकभैरवाच्या मंदिर प्रांगणात येतात धावतच रंकोबा च्या मंदिराला पाच प्रदक्षणा घालतात आणि रंकभैरवाच्या सदरेवर विराजमान होतात .भैरवनाथाच्या पादुका गाभार्यात जाऊन रंकोबाची भेट घेतात आणि नाथांच्या वतीने पुजारी रंकनाथाची आरती करतात .त्यानंतर रंकभैरवाचे पुजारी बाहेर येऊन भैरवनाथाची आरती करतात भैरवाचे परंपरागत डवरी सदरे समोर गायन वादनाची सेवा देतात.भेटीचा सोहळा संपूर्ण करून नाथ आता आपल्या भक्तांच्या भेटीसाठी सज्ज होतात मंगळवार पेठेच्या देवणे गल्ली वगैरे जुन्या भागातून देव भक्तांची पूजा आरती स्वीकारत उशिरा मंदिरात येतात. माघ पौर्णिमा कोल्हापूर जवळ प्रसिद्ध असलेल्या गडहिंग्लजच्या काळभैरवाच्या उत्सवाचा दिवस ज्या भक्तांना गडहिंग्लजला जाणे शक्य होत नाही त्याच बरोबर मंगळवार पेठ आणि तुकाराम माळी तालीम परिसरातील सर्व भक्त हा सोहळा आनंदाने संपन्न करतात.