तलावाचे नाव- रंकाळा तलाव ( Rankala Talav )
कोल्हापुरातले पर्यटकांचे आवडते प्रेक्षणीय स्थळ म्हणून रंकाळा तलावाचे महत्त्व आहे. महालक्ष्मी मंदिरानंतर रंकाळा तलाव कोल्हापूर शहरात दुसर्या क्रमांकाचे प्रसिद्ध ठिकाण आहे.यास कोल्हापूरची रंकाळा चौपाटी म्हणूनही संबोधले जाते.रंकाळा तलाव कोल्हापूर शहराच्या मध्यभागी आणि महालक्ष्मी मंदिरापासून 2 किमी अंतरावर आहे. या रमणीय ठिकाणी संध्याकाळच्या वेळी कोल्हापूरमधील बहुसंख्य नागरीक मोठया संख्येने फिरायला येतात.रंकाळा तलाव शहराच्या टोकाला आहे त्याचे क्षेत्र सुमारे २०२.३४ हेक्टर असून सोडी जवळजवळ १०.६७ मीटर आहे.रंकाळा शेजारी शालिनी पॅलेस आहे याच्या भव्यतेने रंकाळाच्या वैभवात अधिकच भर पडलेली आहे.
रंकाळा हे नाव रंक भैरव या देवाच्या नावावरून देण्यात आलेले आहे.रंक भैरव म्हणजेच कोल्हापूरचा कोतवाल.महालक्ष्मी मंदिराशेजारी मूर्ती स्वरूपात तर मंदिरापासून काही अंतरावर जल स्वरूपात रंकभैरवाचे स्थान आहे. रंकाळा तलावातुन महालक्ष्मीच्या देवळाला आणि त्याचप्रमाणे राजा गंडरादित्य यांनी जी मंदिरे बांधली त्यांना दगडाचा पुरवठा याच रंकाळा तलावातून केला असावा.त्यानंतर आठव्या किंवा नवव्या शतकात झालेल्या एका धरणीकंपामुळे या खाणीचा विस्तार होऊन ती पाण्याने भरून गेली.तलावाला सुरेख घाट बांधून, बंधार्यावर फिरण्यासाठी सुंदर रस्ता तयार केल्याने व रंकाळा टॉवर उभा केल्याने तलावाच्या सौंदर्यात भर पडली आहे. या तळयाच्या उत्तरेस शालीनी पॅलेस तर तळयाच्या नैऋत्य दिशेस ‘पद्माराजे उद्यान’ आहे.रंकाळा तलावाजवळ बरेचसे चित्रपट चित्रित झाले आहेत.रंकाळ्य़ातील बोटींग, लहान मुलांना आकर्षित करणारी मिनी ट्रेन, झुले, घसरगुंडय़ा, फेरफटक्यासाठी देखणे घोडे इ. विविध आकर्षणे व सोबत उत्साहवर्धक वातावरण, नयनरम्य निसर्ग यामुळे सायंकाळच्या फेरफटक्यासाठी कोल्हापुरात रंकाळा अव्वल स्थानावर आहे.