आज शारदीय नवरात्र महोत्सवाची षष्ठी तिथी आजच्या तिथीला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई गरुड वैष्णवी रूपात सजलेली आहे सप्तमातृका पैकी वैष्णवी ही भगवान विष्णूची शक्ती भगवान विष्णू हे सृष्टीच्या पालनाचे दैवत ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली तर भगवान शंकर रुद्र रूपाने या सृष्टीचा संहार करतात पण सृष्टीच्या पालनाची जबाबदारी ही भगवान विष्णूंची आणि म्हणूनच अंबरीशाच्या लीलेचे कारण पुढे करून भगवान नारायण दहा अवतार घेऊन वेळोवेळी या सृष्टीचे रक्षण करतात सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या नाशासाठी देवाचे हे दहा अवतार अनादी काळापासून प्रत्येक कल्पा मध्ये होत असतात. सृष्टीचे पालन करणे म्हणजे फक्त या सृष्टीला वाढवणे नव्हे तर सर्व प्रकारच्या गुणांचा दुर्गुणांचा योग्य प्रकारे समन्वय ठेवून सृष्टिचक्र अखंड पणाने सुरू राहील याची काळजी घेणे. परब्रह्माच्या महा संकल्पा प्रमाणे सृष्टीचा उत्पत्ती वेळेला जे जे काही विधान रचले गेले आहे ते सर्व विधान यथाक्रम पूर्ण होण्याच्या दृष्टीने भगवान विष्णूंचे कार्य महत्त्वाचे आहे त्यांना या कार्यासाठी प्रवृत्त करणारी शक्ती म्हणजे वैष्णवी जी गरुडवाहना आहे .तिच्या हातातील चक्र हे गतिशीलतेच तर शंख हे नाद तत्वाचे प्रतीक आहे हातातली गदा ही क्रियाशक्ती म्हणून ओळखली जाते तर हातीचे नी लीला कमळे पूजू तयाते या उक्तीप्रमाणे भक्तांना कोड कौतुक करण्यासाठी जणू नारायणांनी स्वतःच्या हातामध्ये हे पद्म अर्थात कमळ धारण केले आहे गरुड हा वेदांचा प्रतिनिधी म्हणूनही मानला जातो एकूणच सर्व सृष्टीचे पालन करण्यासाठी नानाविध लीलांनी हा खेळ रंगवणाऱ्या दशावतार धारी भगवान विष्णूंची शक्ती वैष्णवी आपले पालन करणारी आहे. देवी कवचात म्हटल्याप्रमाणे वैष्णवी ही धर्माचे रक्षण करणारी आहे धर्म म्हणजे फक्त उपासना परंपरा नव्हे तर धर्म म्हणजे विहित कृत्य ,कर्तव्य ! आजच्या दिवशी या वैष्णवी मातृकेकडे आपण प्रार्थना करूया की आमचा सारासार विवेक जागा ठेवून आम्हाला धर्मा धर्माचे ज्ञान घडो आणि आमचे पाय सदैव धर्म पालनाच्या कर्तव्य पालनाच्या वाटेवर चालत राहोत.
श्री मातृ चरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीकः