आज शारदीय नवरात्र महोत्सवाची तृतिया युक्त चतुर्थी. आज चतुर्थी चा क्षय असल्याकारणाने उद्या पंचमी तिथि मोजली जाईल. आजच्या तिथीला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई कौमारी रूपात सजली आहे. शक्ती म्हणजे पत्नी या समजाला छेद देणारी आजची पूजा आहे कारण कुमार कार्तिकेय वगळता आपल्याकडे मातृका मंडळातील इतर शक्ती स्वरूपांची दैवतं अर्थात ब्रह्मा-विष्णू-महेश इंद्र वराह नरसिंह हे विवाहित मोजले जातात परंतु कुमार कार्तिकेय हा एकटाच अविवाहित मानला जातो अर्थात दक्षिण भारतात स्कंदाचा विवाह वल्ली आणि देवसेना या दोघींशी झाल्याच्या अनेक पुराण कथा प्रचलित आहेत परंतु इथे कार्तिकेयाचे सेनापति या नात्याने असलेले कुमार रूप अभिप्रेत आहे कुमार जो स्वतः बालवयीन आहे परंतु पराक्रमाने तो इंद्रादिकांना सुद्धा वरचढ आहे. तारकासुराचा संहारासाठी शिवपुत्रा चा जन्म होणे आवश्यक होते परंतु हा शिवपुत्र जर पार्वतीच्या उदरात वाढला तर तो त्रिभुवनात अजिंक्य होईल या इंद्राच्या ईर्ष्यायुक्त भीतीमुळे त्याने अंत:पुरात असलेल्या ईश्वर पार्वती पुढे अग्नीला याचक म्हणून उभे केले तेव्हा शिवानी स्वतःचे तेज अग्नीच्या ओंजळीत घातले जे भाग्य पार्वतीला मिळणार होते ते अग्नीने गंगा प्रवाहात सोडून दिले गंगेपासून ते तेज कृतिकांच्या उदरात गेले कृतिकांनी नऊ महिने उदरात वाहून सहा पुत्रांना जन्म दिला जन्माला येता क्षणी तो पुत्र एक आकार झाला म्हणून या अलौकिक शिव पुत्राला सहा मुख आणि बारा हात आहेत लोकापवादाच्या भीतीने सहा कृत्तिकांनी हा पुत्र गंगातीरावर च्या दर्भाच्या वनांमध्ये टाकून दिला बालकाचे रुदन ऐकून माता पार्वतीने त्याला छातीशी धरले आणि पुत्रवत त्याचा सांभाळ केला तोच हा कुमार कार्तिकेय ज्याने वयाच्या आठव्या वर्षी पार्वती कडून मिळालेल्या शस्त्रांचा आणि विद्येचा उपयोग करून तारकासुराचा संहार केला याच कार्तिकेयाची मूर्तिमंत शक्ती म्हणजे कौमारी. कार्तिकेयाने मारलेल्या पद्म नावाच्या राक्षसाला पुढे मोराचे रूप मिळाले आणि तो कार्तिकेयाचे वाहन झाला कार्तिकेयाच्या ध्वजावर कोंबड्याचे चिन्ह आहे हातात प्रतापी अशी शक्ती आहे. कमारी चे वर्णन करताना अनघा अशी उपमा तिच्यासाठी वापरली आहे अनघा म्हणजे जिला पापांचा लवलेशही स्पर्श करू शकत नाही अशी कौमारी ही वयाने बाल स्वरूपी मानली जाते तिचे हे लहान वय तिच्या पराक्रमाच्या आडवे येत नाही पण तिची निरागसता निष्पाप बुद्धी लहान बालकांची सरलता हे सगळे दैवी गुण भक्तजनांना आनंद देणारे आहेत. या गुणांमुळेच साधा मनुष्य सुद्धा परमेश्वराला लाडका होऊ शकतो तेव्हा कौमारीची ही अम्लानता तुम्हा सर्वांच्या बुद्धीमध्ये राहो हीच जगदंबा चरणी प्रार्थना
श्रीमातृचरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीकः