हरतालिका जगातली पहिली प्रेम कहाणी
अशाच एका गणपतीच्या दिवसांत कॉलेज मधे जबरदस्तीने हरतालिका पूजायला लागलेल्या एका मैत्रिणीनं विचारलं काय रे शंकरा बरोबर लग्न व्हावं म्हणून पळून जाऊन पार्वतीने तप केलं म्हणून ही पूजा असते ना ? म्हणलं होय मग म्हणाली मग आताच पोरी पळून गेल्या तर आईबापांना वाईट का वाटत? म्हणलं वाईट तर पार्वतीच्या आईबापाला पण वाटलं होतं पण शिवगौरीचा मोठेपणा यात आहे की त्यांचा निर्णय विशेषतः गौरीचा निर्णय चुकलाय असं वाटावं असे असंख्य प्रसंग आले पण तीनं कधी हिमालयाकडे आशा लावली नाही की आपल्या निर्णयाचा पश्चात्ताप केला नाही.जो आहे तो प्रसंग स्वतः निभावून नेला. कधी शक्ती वापरली कधी बुद्धी वापरली. शिवाचं मन जिंकण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न केला. आपल्या भोळ्या पतीला कुणीही फसवू शकतो हे जाणून कायम त्याच्या आजूबाजूला कुंपणासारखी राहिली. पण खऱ्या भक्तांसाठी शिवाला आर्जव घालणारी पण तीच आहे. त्याला आवडत म्हणून गौरी झालेली ती शृंगार नायिका. लोकोपकारासाठी असंख्य प्रश्न विचारून सगळं ज्ञान काढून घेणारी ती त्याला भुलवण्यासाठी भिल्लीणही होते.
नवऱ्याचा मान टिकावा म्हणून दहा महाविद्या प्रगट करून दक्ष यज्ञाचा विध्वंस करते पण जिथं आपलं मूल का नवऱ्याचा मान असा प्रसंग येतो तिथं बेलाशक प्रलयासाठी तयार होते. तो आपल्या हातचं जेवावा म्हणून अन्नपूर्णा होते. जगाला वाचवण्यासाठी विष पिणाऱ्या नवऱ्याला आई होऊन स्तनपान पण देते ही यादी न संपणारी तशीच शंकराच्या प्रेमाची असंख्य उदाहरणं.तो तिला आपली फक्त पत्नी मानत नाही तर अर्धांगिनी मानतो शक्तीचा उपमर्द करून शिव पूजतो म्हणाणाऱ्या गंधर्वाला अर्धनारीश्वर रूप दाखवतो आणि जणू सर्वांनाच सांगतो करुन पहा आम्हाला वेगळं. तिच्या बरोबर सारीपाट खेळतो पैजा लावतो हरतो रुसतो आणि एक होतो. तिच्या आग्रहावरुन ऐश्वर्यवान असा चंद्रशेखर होतो. स्वतः स्मशानजोगी पण तिला मात्र सगळ्या परींनी नटवतो. तीचं शक्ती रूप जाणून तंत्र जिज्ञासा प्रगट करतो. प्रदोष काळात तिला सिंहासनावर बसवून तीच्या समोर चाळ बांधून नाचताना त्याला वावगं वाटत नाही. मोहीनीवर भाळलो हे सांगायला लाजत नाही. तिच्या मानासाठी दक्षाचा विध्वंस करतो तिच्या विरहात जगापासून अलिप्त होऊन तीचं अर्धवट जळालेलं शरीर घेऊन फिरत राहतो. तिच्या सर्व प्रश्नांना उत्तरं देत राहतो. तीचं मूळ स्वरूप जाणून प्रेम करत राहतो. इतकं कशाला तिच्या रागात जग जळून नष्ट होईल असं वाटत तेव्हा तिने रागारागाने त्यांच्या छातीवर आपटलेला पाय ( लाथच खरं तर ती) सुद्धा तो आनंदाने भूषण म्हणून मिरवतो.हे सगळं ते दोघं एकमेकांच्या प्रेमात करतात म्हणून माझ्या तर मते ती जगातली नेव्हर एंडिग लव्हस्टोरी आहे. आणि म्हणूनच कदाचित गृहस्थाच्या प्रत्येक प्रसंगात उमामहेश्वर असतातच.
श्री मातृ चरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीक