आंबा गावातून २० किमी अंतरावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा सांगणारा विशालगड आपल्याला पाहायला मिळतो. आंबा घाट ते विशालगकडे जाताना अनुभवयास मिळते ते घनदाट जंगल, तेथील गच्च झाडी, थंड हवा हे सगळं अनुभवायला मिळतं. आंबा गावात पर्यटकांना राहण्यासाठी अनेक सोयी-सुविधांयुक्त पर्यटन केंद्र रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर उभारण्यात आलंय. वेगवेगळ्या धाटणीच्या आकर्षक बागा, सुंदर फुलं, नारळाची झाडं अशा विविध कलागुणांनी नटलेल्या आंबा गावात राहण्याची मजा वेगळीच अनुभवयास मिळते.म्हणून ज्यांना पर्यटनाची आवड आहे त्यांनी एकवेळ नक्कीच आंबा घाटाला भेट द्यावी. जंगल सफर म्हणून आंबा घाट आपणास आवडेल यात नक्कीच शंका नाही.कारण येथे निसर्गाचं सौंदर्य अतिशय विलोभनीय असून ते पहाताना माणूस अक्षरशः हरवून गेल्याशिवाय रहात नाही.महाराष्ट्र शासनान पर्यटन स्थळांच्या यादीत आंबा परिसराचा समावेश केला आहे.महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेखरु, राज्य फूल जाऊळ, राज्यपक्षी 'हरेल' पाहावयास मिळतात. आंबा - विशालगड जंगलामध्ये वाघ, सांबर, हरीण, गवा रेडा, डुक्कर, साळींदर व अन्य जंगली पशु-पक्षी पाहावयास मिळतात. आंबा, मानोली परिसरातील जंगल हे सदाहरित प्रकारात मोडत असल्याने मोठ्या वृक्षांचे प्रमाण अधिक आहे. मोठय़ा झाडांच्या ढोलीत राहणारा सर्वात मोठा उडणारा पक्षी महाधनेश (हॉर्नबिल) आंबा परिसरात हमखास दिसतो.