राजापूर तालुका हा सह्याद्रीपासून अरबी समुद्रापर्यंत पसरलेला एकमेव तालुका आहे. राजापूरवासियांसाठी कोल्हापूर ही मुख्य बाजारपेठ असल्याने ती घाटाने जोडली जावी व जवळचा मार्ग तयार व्हावा म्हणून येरडव, करक, पांगरी, अणुस्कुरा असा घाट २००२ साली तयार करण्यात आला, उंचच उंच सह्याद्रीच्या पर्वत रांगा, नागमोडी वळणे असलेला रस्ता, त्याच दरीत असलेले अर्जुना धरण. या घाटातून जाताना आपण पर्वतावर आरुढ होऊन संपूर्ण परिसराचे सौंदर्य डोळे भरून पाहू शकतो.पावसाळ्यात या परिसराचे सौंदर्य कड्या कपरीतून शुभ्र पदराप्रमाणे झरे, धबधबे वाहत असतात. ढग आपल्या अवती भवती पिंगा घालत असतात. आपण प्रत्यक्षातील स्वर्गाचा अनुभव घेत असतो.