चंदगड तालुक्यातील हा फारसा इतिहास ज्ञात नसलेला किल्ला. याला चंदगडप्रमाणेच बेळगावमार्गेही जाता येते. गडावर गावाची वस्ती असून गडावर थेट वाहनाने जाता येते. येथील प्रचंड विहीर, शिवरायांनी स्थापन केलेले अंबाबाई मंदिर, प्राचीन गुंफा पाहण्यासारख्या आहेत. येथून जवळ असलेला वैजनाथ मंदिर परिसर प्रसिध्द असून पंचक्रोशीचे तीर्थस्थळ आहे. येथील प्राचीन जोड मंदिर वैद्यनाथ व आरोग्य भवानी यांचे असून असून ते भव्य आहे. मुख्य मंदिराजवळ चवदार पाण्याचे दगडी कुंड असून तेथे जुने दत्त मंदिर आहे. गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायात या ठिकाणाचा उल्लेख असून त्याला दक्षिणेचे महाक्षेत्र म्हटले आहे. या मंदिर परिसराचे व्यवस्थापन कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवस्थानमार्फत चालते.